आमिर खानने पत्ता कट केला नसता तर, मंगल पांडेत ऐश्वर्या राय दिसली असती…

अलीकडे मराठी चित्रपट सृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या कलाकृती बनवण्याची लाटच आलेली आहे. काही चित्रपट खरोखरच दृष्ट लागावी इतके चांगले बनले होते तर काही चित्रपट मात्र फसले होते. खरं तर ऐतिहासिक चित्रपट काढणं हे मोठं कौशल्याचं आणि जिकिरीचं काम आहे.

काही वर्षांपूर्वी भारतामध्ये ऐतिहासिक चित्रपटांची संख्या खूपच कमी होती.

एकतर ऐतिहासिक चित्रपट बनतच नव्हते आणि बनले तरी प्रयत्न फसत होते. या सर्व पार्श्वभूमीवर २००५ साली दिग्दर्शक केतन मेहता यांनी अभिनेता आमिर खानला घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला सशस्त्र उठाव असलेल्या १८५७ च्या लढ्यावर ‘मंगल पांडे: द रायजिंग’ हा चित्रपट बनवला होता. प्रयत्न चांगला होता पण इतिहासाशी प्रामाणिक न राहिल्यामुळे काही बाबतीत हा चित्रपट फसला होता.

विशेष म्हणजे केतन मेहता हे १९८८ साली हाच विषय घेऊन चित्रपट बनवणार होते.

त्यावेळी मंगल पांडे च्या भूमिकेत अमिताभ बच्चन होते, पण त्याच काळात अमिताभ बच्चन राजकारणात गेल्यामुळे हा चित्रपट काही तयार होऊ शकला नाही. नंतर १९९४ साली पुन्हा एकदा याच विषयावर ‘किस्सा कारतूस का’ या नावाने एक चित्रपट बनणार होता. यात मंगल पांडे ची भूमिका संजय दत्त करणार होता. परंतु त्याच काळात त्याचे एके फोर्टी सेवन प्रकरण उघडकीस आल्यामुळे हा चित्रपट देखील डब्यात गेला.

यानंतर मात्र केतन मेहता यांनी २००५ साली ‘मंगल पांडे : द रायझिंग’ या नावाने हा चित्रपट बनवला. या चित्रपटाची नायिका खरंतर ऐश्वर्या रॉय होती. पण अनपेक्षित पणे तिचा पत्ता कापला गेला. हे कां घडलं याचा किस्सा देखील तितकाच मनोरंजक आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी एक दिवस अभिनेता आमिर खान आपल्या घरी टीव्ही पाहत होता.

टीव्ही वर बीबीसी चॅनल वरील ‘क्वेश्चन ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम तो पाहत होता. या कार्यक्रमात अभिनेत्री अमिषा पटेल भारत्तातील काही प्रश्नांच्या बाबत बोलत होती.

आमिर खानला तिचे बोलणे खूपच प्रॉमिसिंग वाटले. एक बुद्धिजीवी अभिनेत्री म्हणून त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. त्याने लगेच दिग्दर्शक केतन मेहता यांना फोन लावला आणि,” आपल्या मंगल पांडे या चित्रपटात ऐश्वर्या राय च्या जागी अमिषा पटेलला घ्या!” असा आग्रह केला. यावर केतन मेहता यांनी आमिर खानला समजावले ऐश्वर्या खूप मोठी अभिनेत्री आहे. तिला चित्रपटातून का वगळायचे? त्यावर आमिर खानचे उत्तर होते

“आमिशा पटेल हिचा आय क्यू ऐश्वर्या पेक्षा खूप चांगला आहे म्हणून मला या चित्रपटात ती अभिनेत्री हवी आहे!”

केतन मेहता यांनी कपाळाला हात मारून घेतला. पण काय करणार? आपली सिनेमाची दुनिया हिरो ओरिएंटेड असल्यामुळे त्यांना आमिर खानचा हा निर्णय ऐकावाच लागला. तरी त्यांनी आमिर खानला,” ऐश्वर्या जर नको असेल तर राणी मुखर्जीच्या नावाचा विचार करावा.” असे सुचवले परंतु राणी मुखर्जीला या चित्रपटातील ‘ज्वाला’ची भूमिका नको होती तर ‘हिरा’ची भूमिका हवी होती. त्यामुळे तिला ती भूमिका मिळाली, आणि चित्रपटात ऐश्वर्या राय चा पत्ता मात्र नाहक कट झाला. तिच्या जागी तिथे अमिषा पटेल आली.

अमिषा पटेल च्या आगमनाने काही चित्रपटाची व्हॅल्यू वाढली नाही.

चित्रपटाला अपेक्षित असे यश मिळाले नाही. अर्थात सिनेमात ऐश्वर्या राय असती तरी चित्रपटाला यश मिळाले असते का हा देखील प्रश्नच आहे! कारण चित्रपटाच्या कमकुवत पटकथा आणि चुकीचा इतिहास ही दोन कारणे देखील या सिनेमाच्या एव्हरेज सक्सेसची सांगितली जातात. सिनेमातील गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली होती तर संगीत ए आर रहमान यांचे होते.

आमिर खान तसा परफेक्शनिस्ट! या सिनेमासाठी त्याने लांब केस वाढवले होते तसेच त्याच्या मिशा देखील वाढवल्या होत्या. त्याचा हा लूक मिडीयात खूप गाजला होता. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटानंतर तब्बल चार वर्षानंतर चा आमिर खानचा हा चित्रपट असल्याने प्रेक्षकांना याबाबत खूप अपेक्षा होत्या पण त्या पुऱ्या झाल्या नाहीत!

‘मंगल पांडे’ या व्यक्तिरेखेवर सत्तरच्या दशकात देखील दिग्दर्शक केवल कश्यप यांनी धर्मेंद्र, संजय खान आणि योगिता बाली यांना घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार केला होता परंतु काही रिळानंतर हा चित्रपट डब्यात गेला. १९८३ साली शत्रुघ्न सिन्हा , परवीन बाबी यांचा ‘मंगल पांडे’ या नावाचा एक चित्रपट आला होता. परंतु या चित्रपटाचे नावच फक्त ‘मंगल पांडे’ होते. इतिहासाशी त्याचा काहीही संबंध नव्हता!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.