रिक्षावर पिक्चरचं पोस्टर लावलं म्हणून आमिर खानला रिक्षावाल्याची बोलणी खावी लागली होती…

अभिनेता अमीर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा सिनेमा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याचे प्रमोशन मोठ्या प्रमाणावर सध्या चालू आहे. सध्याचा काळ हा सिनेमाचे प्रमोशन लार्ज स्केलवर करण्याचा आहे. आजकाल या प्रमोशन साठी निराळे बजेट देखील काढून ठेवलेले असते. पण एक काळ असा होता की त्यावेळी सिनेमा तयार झाल्यानंतर प्रमोशन साठी काहीही रक्कम निर्मात्यापाशी शिल्लक नसायची.

प्रसिद्धीची माध्यमे देखील त्या काळी मर्यादित होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर माऊथ पब्लिसिटीतूनच सिनेमाचा ‘नूर’ कळायचा. एकूण काय तर प्रमोशन, पब्लिसिटी यासाठी कुणी वेगळा पैसा खर्च करत नसे.

अशीच परिस्थिती आमिर खान च्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी झाली आली होती. अमीर खान यांचा पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ २९ एप्रिल  १९८८  रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या प्रमोशनचा हा किस्सा. 

ख्यातनाम निर्माता दिग्दर्शक नासिर हुसेन हे आमिर खानचे काका. या घरातील वातावरण पहिल्यापासूनच सिनेमाचे होते. अमीर खानला देखील चित्रपटात काम करण्याची लहानपणापासूनच आवड होती. नासिर हुसेन यांच्या १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘यादोंकी बारात’ या चित्रपटात त्याने बाल कलाकार म्हणून भूमिका केली होती.

अमीरचे वडील ताहीर हुसेन यांना मात्र आपल्या मुलाने डॉक्टर किंवा  इंजिनियर व्हावे,  सिनेमात येऊ नये असे वाटायचे. पण आमिरची इच्छा मात्र सिनेमात काम करण्याची होती. त्याने पुण्याच्या एफटीआय  मध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम करण्याचा देखील प्रयत्न केला होता.

पण नासिर हुसेन त्याला म्हणाले “आपले एवढे मोठे प्रॉडक्शन हाउस असताना तुला बाहेर शिकायला जायची गरजच काय?” त्यांनी आमीरला आपला सहाय्यक म्हणून ठेवून घेतले. 

तिथून त्याच्या त्याला प्रवासाची सुरुवात झाली. १९८४ साली  प्रदर्शित झालेल्या ‘होली’ ( दि. केतन मेहता ) या चित्रपटात आमिर खानची भूमिका होती. यानंतर काही सिनेमांमध्ये त्याने नासिर हुसेन यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.  १९८७ साली  त्याचा चुलत भाऊ मन्सूर खान याने आमीर खानला आपल्या घरच्या प्रॉडक्शन मधून लॉन्च करायचे ठरवाले. ‘लैला मजनू’ , ‘रोमियो ज्युलिएट’ सारख्या दु:खद प्रेम कहाणीला आधुनिक रूप देत त्यांनी कथानक निवडले.

आमिरची नायिका जुही चावला तिला घेण्यात आले. नासिर हुसेन यांच्या चित्रपटांचा तरुणाईचा कालखंड सुरु होत असल्याने  नेहमीचे संगीतकार आर डी बर्मन यांच्या ऐवजी आनंद मिलिंद यांचा प्रवेश झाला. गीतकार मात्र त्यांचे जुनेच मजरूह सुलतानपुरी होते. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले. आता सिनेमा रिलीज होणार होता.

आमिर खान आपल्या पहिल्याच सिनेमासाठी खूपच उत्सुक आणि नर्व्हस देखील होता. आपला सिनेमा चालेल का? हिरो म्हणून आपल्याला यश मिळेल की नाही? लोक आपल्याला पसंत करतील की नाही? अशा नाना शंकानी त्याला रात्र रात्र झोप लागत नव्हती. 

या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते

आमिर खाननं मग त्याच्या मित्रांसोबत स्वत: मुंबईच्या रस्त्यावर चित्रपटाचे प्रमोशन करायचे ठरवले. त्यांनी सिनेमाची काही स्टिकर्स छापून घेतली आणि मुंबईतल्या टॅक्सी आणि रिक्षाच्या पाठीमागे ती  चिकटवून त्याचे प्रमोशन सुरू केले. रोज सकाळपासून आमिर खान आणि त्याचे मित्र रिक्षा स्टॅन्डवर जात असत.

 तिथे उभ्या असलेल्या  रिक्षा आणि टॅक्सी चालकांची परवानगी घेऊन त्यांच्या वाहनांवर ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाचे स्टिकर ते लावत आणि सांगत की “हा सिनेमा तुम्ही नक्की पहा!” चालक  विचारायचे “या सिनेमा चा हिरो कोण आहे?” मित्र सांगायचे “आमिर खान!”

त्यांचा लगेच प्रश्न साधा असायचा “ कोण आमिर खान?” 

मग आमिर खान ला समोर उभे केले जायचे. आमिर खानचा ‘मासूम’ चेहरा पाहून चालक शुभेच्छा देत .

असे प्रमोशन चालू असताना एक दिवस ते बांद्रा रेल्वे स्टेशन समोर सिनेमाचे प्रमोशन करत असताना तिथे त्यांनी एका रिक्षावर सिनेमाचे  स्टिकर लावल्यावर रिक्षावाला जाम भडकला आणि त्याने विचारले “तुमची हिम्मत कशी झाली माझ्या रिक्षावर स्टीकर  लावण्याची?”

आमिर खान आणि त्याच्या मित्रांनी चालकाची  माफी मागितली आणि सर्व प्रकार सांगितला आणि सिनेमा पाहायला नक्की या असे देखील सांगितले. पण तो रिक्षावाला काही ऐकायला तयार नव्हता त्याने त्यांच्या समोर स्टीकर उचकटून काढले आणि फाडून फेकून दिले. आमीर खान खूप नर्वस झाला. त्याला हा अनुभव नवीन होता. तसाच घरी गेला.

उद्या पासून प्रमोशन बंद असे मनोमन ठरवले. घरच्यांनीही त्याला खूप समजावले. “समाजात वावरायचे असेल, तर अशा सर्व प्रकारांना आणि व्यक्तीना सामोरं जायची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करायला हवी. अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर फोकस कर.” 

दोन-तीन दिवसाच्या नाराजी नंतर पुन्हा नव्या उत्साहात चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले. चित्रपट प्रदर्शित झाला झाला. सुपरहिट झाला. बंपर हिट ठरला. रेस्ट इज हिस्ट्री.

अमीर खानचे नाव देशभर झाले, देशातल्या तमाम तरुणाईचातो लाडका हिरो झाला. त्या रिक्षा चालकाने हा सिनेमा पहिला की नाही माहित नाही पण तो देखील तो प्रसंग आठवून स्वत:वरच चिडला असणार!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.