पिक्चरचं प्रमोशन करताना आंदोलनाला सपोर्ट करणं आमीर खानला महाग पडलं होतं…

आमीर खान त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या जिद्दीने आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने करत असतो. या प्रमोशनमध्ये त्याचा स्वतःचा मोठा सहभाग असतो. परंतु त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनमुळे त्याच्या दुसर्‍या एका चित्रपटाला मोठा धक्का बसला. आमीर खानचा हा दुसरा चित्रपट भारतातील काही राज्यांमध्ये प्रदर्शितच होऊ शकला नाही! काय होता हा किस्सा पाहू या.

२६ जानेवारी २००६ रोजी राकेश ओमप्रकाश मेहराचा ‘रंग दे बसंती हा सिनेमा प्रदर्शित झाला. याचा नायक आमीर खान होता. मेहराने स्वातंत्र्य लढ्याच्या संग्रामाला आजच्या काळातील प्रश्नांची जोड देऊन एक जबरदस्त चित्रपट बनवला होता.

या चित्रपटाचे प्रमोशन देखील मोठ्या उत्साहात आमीर खानने केले. यासाठी तो देशभर फिरला. युवकांमध्ये मिसळला. आजच्या युवकांमधील असंतोष पडद्यावर दाखवला असल्याने तरुणांनी सिनेमाला मोठी गर्दी केली. 

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो दिल्लीला गेला. त्यावेळी दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर दोन आंदोलने सुरू होती. एक आंदोलन होते भोपाळ वायु दुर्घटनेतील मृत्यू पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांचे, तर दुसरे होते नर्मदा सरोवर पीडितांचे. मोठ्या संख्येने आंदोलक तेथे आंदोलन करीत होते.

आमीर खान या आंदोलनात सामील झाला. आपल्या सिनेमाचे प्रमोशन करीत असताना त्याने या दोन्ही आंदोलनाला पाठिंबा दिला. तिथे जोरदार भाषणबाजी झाली. आमिर खानचे नाव देशभरातील मीडियामधून सर्वत्र पसरले आणि या आंदोलनाला आमीर खान सपोर्ट करतो आहे, अशी प्रतिमा तयार झाली.

भोपाळ वायु दुर्घटनेच्या आंदोलकांना सपोर्ट दिला म्हणून काहीही प्रतिक्रिया उमटली नाही; परंतु नर्मदा सरोवर आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून गुजरातमध्ये आमीर खानविरुद्ध निदर्शने सुरू झाली.

ठिकठिकाणी आमीर खानचे पुतळे जाळले गेले. त्याच्याविरुद्ध नारेबाजी सुरू झाली. त्याच्या सिनेमाची पोस्टर फाडली. ‘रंग दे बसंती’ चे शो बंद पडले.

मुद्दा आता राजकीय बनला होता. 

आमीर खानच्या चित्रपटांना गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही अशी धमकी दिली. आमीर खानने माफी मागावी अशीही मागणी जोर धरू लागली; परंतु आमीर आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि नर्मदा सरोवरच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, याची तो प्रत्येक व्यासपीठावरून मागणी करू लागला. आमीरच्या या भूमिकेने त्याच्या विरुद्ध वातावरण गुजरातमध्ये आणखी पेटत गेले.

चारच महिन्यानंतर २६ मे २००६ ला कुणाल कोहली दिग्दर्शित आमिर खान व काजोल यांचा ‘फना’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला.

देशभर हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु गुजरातमध्ये मात्र या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले गेले. हा सिनेमा गुजरातमध्ये सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स कुठेही प्रदर्शित होऊ दिला नाही. संपूर्ण गुजरातमध्ये आमीर खानच्या चित्रपटांवर अघोषित  बंदी घातली गेली. ही बंदी शासकीय पातळीवरून नव्हती परंतु सामाजिक असंतोषच एवढा होता की आमीर खान  हा चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित करू शकला नाही.

  • भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.