भारतात दुसरी दिवाळी साजरी होत होती आणि अमित शाह अटलजींवर टीका करत होते?

आज भारताच्या राजकारणात पंतप्रधान मोदीजींच्या खालोखाल ताकदवान व्यक्ती कोण असेल तर साहजिकच उत्तर येईल गृहमंत्री अमित शाह. पंतप्रधानांचा उजवा हात एवढीच त्यांची ओळख नाही तर भाजप आज देशभर पसरलाय आणि एका मागोमाग निवडणुका जिंकत सुटलाय त्याच्या मागे अमित शाह यांची संघटनात्मक व धोरणात्मक शक्ती काम करते असं म्हणतात.

आज भाजपचा चेहरा अमित शाह आणि नरेंद्र मोदी बनले आहेत.पण एक वेळ अशी आली होती जेव्हा याच अमित शहा यांनी थेट अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर  टीका करणारं पत्र लिहिलं होतं.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली.

१९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत दणदणीत विजय मिळवून भाजपचे सरकार सत्तेत आली होती. दोनच वर्षांपूर्वी १३ दिवसांचे सरकार पडल्याचा अपमान वाजपेयींनी भरून काढला होता. मित्रपक्षांची मोट बांधून भक्कम राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली होती.

स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्ष लागले पण पहिल्यांदाच हिंदुत्ववादी विचारसरणी मानणारा पंतप्रधान सत्तेत आला होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की

देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. देशाच्या सुरक्षेच्या व सार्वभौमत्वासाठी आण्विक चाचण्यांसह सर्व पर्याय खुले असतील.

पाकिस्तान आणि भारतातील संबंध त्या काळात देखील ताणलेले होते. दोन्ही देशात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची चढाओढ सुरु होती. अशातच पाकिस्तानने भारताच्या पृथ्वी क्षेपणास्त्राला उत्तर म्हणून घौरी या क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्राचे नाव देखील पृथ्वीराज चौहान यांना हरवणाऱ्या अफगाण शासक मोहम्मद घुरी याच्या वरून ठेवून भारताच्या स्वाभिमानावर पाय दिला होता.

घौरीच्या चाचणी नंतर भारतातील मीडिया व जनमानसाची भावना होती की पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर दिले पाहिजे. हीच भावना पंतप्रधानांची देखील होती. यातूनच त्यांनी गेली अनेक वर्ष ताटकळलेल्या प्रयोगाला परवानगी दिली.

अणुबॉम्ब चाचणी.

१९७४ साली बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेतली होती. तेव्हा अमेरिका व संपूर्ण जगभरातून टीका झाली होती पण भारताने घोषित केले कि सदर चाचणी फक्त आणि फक्त भारताला ऊर्जे संबंधी  समृद्ध बनवण्या साठी केलेली चाचणी होती.  

तेव्हा पासून भारताकडे अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता आहे हे सर्वाना कळालं होतं पण थेट अणुबॉम्बची चाचणी आपण घेण्याचं टाळलं होतं. अगदी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अणुचाचणीची सगळी तयारी होती पण पंतप्रधानांनी ऐनवेळी माघार घेतली होती.

देशाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे हि चाचणी घेऊन जगभराचे निर्बंध टाकून घेण्याची तयारी नरसिंहराव यांनी दाखवली नव्हती.

पण वाजपेयीजी यांचा निर्धार पक्का होता. अमेरिका व इतर कोणत्याही महासत्तेच्या दबावाला बळी न पडता अणुचाचणी घेण्याची तयारी त्यांनी केली.

खुर्चीत बसल्यावर अगदी दोनच दिवसात अटलजींनी अणुचाचणीचा प्रकल्प पुन्हा रिओपन केला आणि त्याला गती दिली. लोकसभेत विश्वास मत मिळवल्यावर लगेच त्यांनी आपले विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए पी जे कलाम यांना  ऍटमबॉम्बची चाचणी किती दिवसात होऊ शकेल असे विचारले तेव्हा डॉ कलाम यांनी ३० दिवसाच्या आत आपण चाचणी करू असे सांगितले. . 

याला तत्कालीन भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चेअरमन डॉ. राजगोपाल चिदंबरम्‌ यांनी देखील हिरवा कंदील दाखवला.

हि चाचणीदेखील पोखरण येथेच करण्यात आली. अमेरिकेच्या सॅटेलाईटपासून लपून छपून अत्यंत गोपनीयपणे हा कार्यक्रम राबवण्यात आला.

ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चाचणीत ११ मे १९९८ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी एकामागून एक अशा पाच यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. अमेरिकेच्या हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाला थांगपत्ता देखील लागला नाही.

त्याच दिवशी म्हणजे भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चाचणी संदर्भात जाहीर घोषणा केली आणि जगभरात विविध राष्ट्रांच्या प्रतिक्रिया उमटल्या. भडकलेल्या पाकिस्तानने घोषणा केली की ,

अण्वस्त्र निर्मितीची पाकिस्तानचीही क्षमता असून आम्ही त्याचा वापरही करू.

इंग्लंड, चीन, जपान, रशिया या सर्व देशांनी भारताच्या अणुचाचणीवर नकारात्मक प्रतिक्रिया दिली. तर अमेरिकेने निराशा व्यक्त करताना भारताच्या चाचणीमुळे जागतिक शांतता प्रयत्नांना सुरुंग लागल्याचे म्हणले.

मात्र स्थानिक भारतीय वृत्तपत्रांनी घेतलेल्या जनमताच्या कौलात 91% भारतीयांनी या अणुचाचणीला पसंती दिली होती. काही तुरळक विचारवंत आणि विरोधी पक्ष वगळता संपूर्ण भारतात दुसऱ्या दिवाळी प्रमाणे आनंद आणि जल्लोष साजरा होत होता.

पण पंतप्रधानांना गुजरातच्या एका भाजप आमदाराचं पत्र आलं ज्यात पंतप्रधानांना घरचा आहेर देण्यात आला होता. या पत्रात लिहिलं होतं की,

“प्रिय वाजपेयीजी लोकप्रियतेच्या हव्यासापोटी आज तुम्ही पाक व्याप्त काश्मीर कायमचा गमावला आहे.”

हे खरमरीत पत्र लिहिलं होत अमित शाह यांनी.

नुकताच प्रकाशित झालेल्या जुगलबंदी या विनय सीतापती या पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.

या पुस्तकात सांगितलं आहे की अमित शाह तेव्हा ३३ वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या गुजरात मधील नियोजन व अडवाणी यांच्या लोकसभा निवडणुकीचे कँपेनिंग यामुळे ते भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले होते. त्यांनी व नरेंद्र मोदींनी गुजरातच्या ग्रामीण भागात भाजपला पसरवले होते. १९९७ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. राजकारणात तसे नवखे असले तरी अमित शाह यांनी थेट पंतप्रधानांवर टीका करणारं पत्र लिहिलं होतं.

विनय सीतापती आपल्या पुस्तकात सांगतात की हे पत्र वाचल्या वाचल्या भाजपच्या श्रेष्ठींनी अमित शाह यांना दिल्लीला बोलावून घेतलं व पत्राचे कारण विचारण्यात आले.

अमित शाह यांनी वाजपेयींना सांगितलं की

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मला एकदा ही गोष्ट सांगितली होती. त्यांच्या मते आपल्याकडे अणुबॉम्ब आहे हे उघड करण्यापेक्षा त्याबद्दलची साशंकता आपल्यासाठी जास्त फायदेशीर आहे. आज आपण अणुचाचणी केली तर उद्या पाकिस्तानदेखील करेल आणि युद्धभूमीवर काश्मीरचा पर्याय कायमचा बंद होईल.

वाजपेयी यांनी अमित शाह यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. विनय सीतापती यांच्या मते हे पत्र म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही जिवंत होती याचे लक्षण होते.

एका मुलाखतीमध्ये या पत्राच्या खऱ्या खोट्याची शहानिशा केल्यावर विनय सीतापती यांनी मान्य केलं की त्यांनी स्वतः हे पत्र वाचलेलं किंवा पाहिलेलं नाही मात्र त्यांचे तीन सूत्र आहेत ज्यांनी या पत्राच्या सत्यतेची खात्री दिली आहे. त्यातील दोन जणांनी हे पत्र स्वतः वाचलेलं आहे. हे सूत्र कोण याची माहिती मात्र या विनय सीतापती यांनी दिली नाही.

हे ही बाख भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.