कांशीरामांच्या फॉर्म्युल्यावर भाजप मुंबई महापालिकेचं मैदान मारणार?

१९८४ साली कांशीराम यांनी निर्णय घेतला की, आता बामसेफ आणि डीएस-4 या संघटनांसोबत आता एका राजकीय पक्षाची स्थापना करायची. त्यावेळी त्यांचं मत होतं होतं कि, ‘राजकीय सत्ता हि एक अशी चावी आहे जी सगळी कुलूप खोलू शकतो.’

यानंतर त्यांनी मायावतींना सोबत घेत बहुजन समाजवादी पक्ष अर्थात बसपाची स्थापना केली, आणि प्रत्यक्ष निवडणूकीच्या राजकारणात उडी घेतली. पण त्यावेळी झालं असं कि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभुतीच्या लाटेत बसपच्या हातात काहीही लागलं नाही. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना एक कानमंत्र दिला.

“पहला चुनाव हारने के लिए, दूसरा चुनाव हरवाने के लिए. और फिर तीसरे चुनाव से जीत मिलनी शुरू हो जाती है” हा कानमंत्र होता उमेदवारांना आणि पक्षांना सत्तेच्या मार्गावर नेणारा. याच कानमंत्रानुसार पुढे राजीव गांधी यांच्या काळात झालेल्या उत्तरप्रदेशमधील पोटनिवडणूकांमध्ये कांशीराम यांनी मायावतींना उतरवलं. एकदा बिजनोर, एकदा हरिद्वार. पण सलग तीन पराभव झाल्यानंतर १९८९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये बसपाचं खात उघडलं. मायावती लोकसभेत पोहोचल्या.

आता हा संदर्भ देण्याचं कारण म्हणजे आता याच कानमंत्रानुसार भाजप मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागला आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून अमित शहांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत मुंबईच्या राजकारणात भाजपचाच दबदबा राहिला पाहिजे, त्यासाठी तयारीला लागा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महानगरलीकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं ‘मिशन मुंबई १५०’ म्हणजेच मुंबईतल्या १५० जागा जिंकण्याचा निर्धार अमित शहांनी केलाय…हे सगळं ठीकेय पण

प्रश्न असाय कि, कांशीराम यांचा फॉर्म्युला भाजपला कसा लागू होतो?

तर होतो. जरी कांशीरामांच्या फॉर्म्युल्यानुसार, मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक भाजपसाठी तिसरी निवडणूक नसली तरीही कांशीरामांचा फॉर्म्युला लागू होतो कारण भाजपची ताकद वाढवून देणारी हि तिसरी निवडणूक आहे. त्याचमुळे. कारण २००७ पासूनची जर मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीची राजकीय समीकरण बघितली तर ती काहीशी अशी होती…ती पुढीलप्रमाणे,

२००७ च्या निवडणुका :

२००७ साली महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेनं १५८ जागा तर भाजपनं अवघ्या ६९ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले होते आणि युतीची सत्ता स्थापन झाली. त्या निवडणुकीत शिवसेनेला ८ लाख ७७ हजार ३१३ आणि भाजपला ३ लाख ३५ हजार ६६४ मतं मिळाली होती.

२०१२ च्या निवडणुका :

२०१२ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत रामदास आठवलेंचा रिपाई हा नवा भिडू आल्यानं युतीची महायुती झाली होती. त्यावेळी शिवसेना १३५, भाजप ६३ आणि रिपाई २९ अश्या नव्या फॉर्म्युल्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे ७५, भाजपचे ३१ तर रिपाईचा ०१ असे नगरसेवक निवडून आले आणि महायुतीची सत्ता आली.

थोडक्यात काय तर भाजपच्या वाट्याला जागा कमी येऊन देखील त्यांच्या नगरसेवकांची संख्या वाढली होती. त्यानंतर पुढे २०१७ च्या निवडणुकांपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. या काळात २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेत भाजपने देशाची सत्ता मिळवली होती. त्यानंतर त्या वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्राची सत्ता मिळवली होती.

त्यानंतर याच वाढलेल्या ताकदीच्या जोरावर भाजपने २०१७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला जागा वाढवून मागितल्या होत्या. मात्र जागांचं गणित न जुळल्याने भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला ९७, भाजपला ८३ जागा मिळाल्या. एकूणच त्यावेळी भाजपने काँग्रेस सह इतर पक्षाच्या जागा पडत स्वतःची ताकद वाढवली होती. मात्र सत्तेपर्यंत पोहोचू शकली नव्हती.

आता येऊया २०२२ च्या तयारीवर, 

२०२२ ची निवडणूक म्हणजे भाजपने महापालिकेत आपला महापौर बसवायचा असा चंगच बांधला आहे. त्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे.

सोबतच काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार ‘मिशन १५०’ या अंतर्गत अमित शहा यांनी मुंबई महापालिकेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीय. याच मिशनचा भाग म्हणजे त्यांचा सद्या गाजत असलेला मुंबई दौरा.

याच मिशन मुंबई बाबत अधिक जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय यांच्याशी बातचीत केली होती,

“भाजपच्या मिशन मुंबईची तयारी म्हणजे, भाजप सध्या आपल्या संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात बूथ लेव्हल पासूनची यंत्रणा ऍक्टिव्ह होतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या जे मुंबईच्या नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देखील भाजप मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे”. 

“यात मग अगदी रस्त्यावरच्या खड्ड्याचे आंदोलन, मुंबईतील पाणी तुंबणे, लोकांच्या घरातील साफ सफाई आणि लोकलसाठीचे आंदोलन अशा छोट्यातील छोट्या गोष्टींपासून ते मोठ्यातील मोठ्या गोष्टींसाठी आंदोलन करत आहे. त्यातुन लोकल सारखे प्रश्न देखील सोडवले आहेत. सोबतच प्रचाराच्या माध्यमातून २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबईसाठी झालेली काम लोकांसमोर आणत आहोत”, असं मत केशव उपाध्यय यांनी व्यक्त केलेलं.

असो तर अमित शहा यांच्या यशस्वी डावपेचांची हातोटी बघता मुंबई महापालिका निवडणुकीचे मैदान भाजपसाठी अनुकूल बनवण्यासाठीच त्यांनी हा दौरा केला आहे.

दोन वर्षांपूर्वी शहांनी हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी हैदराबादचे दौरे केले होते.  त्यांच्या दौऱ्यांची परिणीती म्हणजे भाजपने या निवडणुकीत पहिल्यांदाच दणदणीत विजय मिळवला होता. हैदराबाद निवडणुकीचा इतिहास बघता आणि शहांचा “मिशन मुंबई १५०” प्लॅन बघता या सगळ्या प्रयत्नानंतर भाजप मुंबई महापालिकेचं मैदान मारून तिथं सत्ता आणण्यात यशस्वी होणार का हे बघणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.