अमित शाह फक्त राजकारणाचेच नाही तर शेअर मार्केटचे सुद्धा मोटा भाई आहेत..

आज भारताच्या राजकारणात पंतप्रधान मोदीजींच्या खालोखाल ताकदवान व्यक्ती कोण असेल तर साहजिकच उत्तर येईल गृहमंत्री अमित शाह. पंतप्रधानांचा उजवा हात एवढीच त्यांची ओळख नाही तर भाजप आज देशभर पसरलाय आणि एका मागोमाग निवडणुका जिंकत सुटलाय त्याच्या मागे अमित शाह यांची संघटनात्मक व धोरणात्मक शक्ती काम करते असं म्हणतात.

अमित शहांच्या इशाऱ्याशिवाय भारतीय राजकारण हालत नाही असं म्हणतात. 

फक्त राजकारणच नाही तर आणखी एक क्षेत्र आहे जिथं अमित शाह यांना चाणक्य म्हणून ओळखलं  जातं. ते क्षेत्र म्हणजे शेअर मार्केट

होय अमित शाह यांचा दबदबा शेअर मार्केटमध्ये सुद्धा आहे. आणि तिथं त्यांचं वजन आजकाल नाही तर राजकारणात येण्यापूर्वीपासून आहे.  

अमित शाह यांचं कुटुंब तसं सुखवस्तू. मोदिजीप्रमाणे त्यांना लहानपणी चहा विकणे वगैरे कामे करावी लागली नाहीत. त्यांचे पणजोबा गावचे नगरप्रमुख होते. वडिलोपार्जित जमीन जुमला होता तरी त्यांचे आजोबा बिझनेस करण्यासाठी मुंबईला आले. तिथे अमित शाहच्या वडिलांनी पीव्हीसी पाईपचा उद्योग सुरु केला. अफाट पैसा देखील कमवला.

२२ ऑक्टोबर १९६४ साली मुंबईत अमित अनिल शाह यांचा जन्म झाला. पुढे त्यांची फॅमिली पुन्हा गुजरातला परतले. त्यामुळे अमित शाह यांचं शिक्षण गुजरातमध्येच झालं. फार काही नाही पण अहमदाबादच्या सीयु शाह कॉलेजमध्ये ते बायोकेमिस्ट्रीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिकले.

पुढे अभ्यासापेक्षा वेगळ्या गोष्टीचा नाद लागला म्हणून शिक्षण तिथेच सोडलं. हा नाद होता स्टॉक एक्स्चेंजचा !

शेअर मार्केटचा चढउतार त्यात होणारी कमाई तरुणपणात  प्रत्येकाला आकर्षित करत असते. अमित भाई सुद्धा या स्टॉक मार्केटमध्ये उतरले. रात्रंदिवस त्यात डोकं घातलं. शेअर मार्केटच्या सगळ्या खाचाखोचा  सगळी उलाढाल त्यांनी या काळात व्यवस्थित समजून घेतली. गुजराती रक्तात असलेला खास बनिया बुद्धी असल्यामुळे लवकरच मुंबईत ब्रोकर म्हणून त्यांनी नाव कमावलं. 

पुढे त्यांच्या आयुष्यात वेगळं वळण लागलं. कॉलेज जीवनात ते विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले होते. हि संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेलेली होती. त्यातच अमित शहा यांचं संघटन कौशल्य पाहून त्यांना एबीव्हीपी मधून भाजपा युवा मोर्चा मध्ये पाठवण्यात आलं.

इथे एका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख झाली. त्या निवडणुकीत दोघांनी एकमेकांच पाणी जोखलं. पुढचा इतिहास तर आपण जाणतोच. इथून दोस्ती का सिलसिला सुरु झाला तो आजही कायम आहे.

बर असो. अमित शाह आज देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना देशाच्या राजकारणात दोन नंबरच स्थान आहे. पण तरीही शेअर मार्केटमध्ये त्यांचा दरारा कमी झालेला नाही. स्टॉक एक्स्चेंजच्या चढउतारात अमित शाह आजही आपले खोऱ्याने पैसे कमवतात. 

अशावेळी अस्सल शेअर मार्केटच्या किड्याला प्रश्न पडतो कि अमित शाह यांचं पोर्टफोलिओ नेमकं काय असेल ?

आता अमित शाह यांच्या जवळ कोणते शेअर आहेत हे ते आपल्याला काय येऊन कानात सांगणार नाहीत. तरी आपण हुडकायचा मक्ता घेतलाच आहे. त्यानुसार रिसर्च टीमने बरंच काय काय शोधलं. 

 २०१९ सालच्या निवडणुकीवेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होत त्यात अमित शाह यांच्या मालकीचे शेअर्स काय काय आहेत हे सापडलं. आता यात बदल झाला असेल हे नक्की पण एकूणच अमित शाह यांचं चाणक्यवाल डोकं शेअर मार्केटमध्ये कस चालत याचा आपल्याला अंदाज येईल.

ब्लूमबर्ग रिपोर्ट म्हणते की अमित शाह यांनी १७.५९ कोटी रुपये कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवले आहेत. तर त्यांच्या बायकोचे सुद्धा जवळपास साडेचार कोटी रुपये मार्केटमध्ये गुंतलेले आहेत. 

अमित शहा यांचा पोर्टफोलिओ

सेक्टर                                        गुंतवणूक (%)

आयटी सेक्टर                               6%
रिलायन्स व ग्रुप कंपनीज               11%
ऑटो सेक्टर                                 13%
FMCG                                        20%
अन्य                                             50%

आता हे वाचून तुम्हाला धक्का बसायला नको की अमित शाह यांनी सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट मुकेश अंबानी यांच्या रिलायन्समध्ये केली आहे. २०१९ साली RIL चे त्यांच्याकडे तब्बल १५५७२ इतके शेअर्स होते आणि त्याची तेव्हाची किंमत २.०८ करोड इतकी होती. या शिवाय त्यांच्याकडे रिलायन्सच्या ग्रुप कंपन्यांचे जवळपास २५ लाखांचे शेअर्स होते.

अमित शाह आणि त्यांच्या पत्नीने २०१९ साली FMCG स्टॉकमध्ये ४.२६ कोटी रूपये गुंतवले होते. त्यात सर्वात जास्त म्हणजे प्रॉक्टर अँड गँबलमध्ये त्यांनी १.२५ कोटी रुपये गुंतवले होते. याशिवाय त्यांच्या कडे कोलगेट, पॉमोलिव्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि नेरोलॅकचे शेअर्स होते.

ऑटो सेक्टरचा विचार करायचा झाला तर अमित शाह आणि त्यांच्या पत्नीने २०१९ साली त्यात २.८ कोटी रुपये गुंतवले होते. मारुती सुझुकीचे त्यांच्या कडे १००० शेअर, महिंद्रा आणि महिंद्राचे ४००० शेअर तर बीज ऑटोचे ९८० शेअर त्यांच्याजवळ होते. हे सोडून एमआरएफचे सुद्धा शंभर शेअर अमित शाह यांनी खरेदी करून ठेवले होते.

एक बारकाईने बघितलं तर अमित शाह यांचा सर्वात जास्त भरवसा मात्र गुजराती कंपन्यांवर असलेला दिसून येतो. त्या काळात त्यांनी गुजरात फ्लुरोसमिकल लिमिटेडमध्ये ५५ लाख तर सनफार्मा मध्ये ४२ लाख रुपयांचे शेअर होते.

आयटी आणि पीएसयू कंपन्यांचा विचार करायचा झाला तर इन्फोसिस टीसीएस या भरवशाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अमित शाह यांनी जवळपास १.३ कोटी रुपये गुंतवले होते. याशिवाय बिर्ला ग्रुपच्या शेअरमध्ये १.४ कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांनी केलेली पाहावयास मिळाली. सोबतच एसबीआय , पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, ओएनजीसी, टाटा स्टील अशा मोठमोठ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये अमित शाह आणि त्यांच्या बायकोने गुंतवणूक केल्याचं दिसून येते.

एकूणच अमित शाह यांचा पोर्टफोलिओ बघितला तर लक्षात येतं की त्यांनी खूप मोठी रिस्क असलेली इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. एक तर त्यांनी आपल्या राज्यातील कंपन्यांचे शेअर्स घेतले आहेत शिवाय ब्ल्यू चिप कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी लॉंग टर्मचा विचार करून शेअर्स घेतलेले दिसून येतात.

असा आहे राजकारणातल्या बिग बुलचा शेअर मार्केटमधला पोर्टफोलिओ. तर भिडुनो महाप्रचंड वेगाने कामाला लागा आणि मोटा भाईंच्या पोर्टफोलिओमधून गुंतवणुकीला आदर्श घेता आला तर घ्या.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.