गुजरातमधून तडीपार झालेले अमित शाह कुठे होते आणि नेमके काय करत होते ?

आज भारताच्या राजकारणात पंतप्रधान मोदीजींच्या खालोखाल ताकदवान व्यक्ती कोण असेल तर साहजिकच उत्तर येईल गृहमंत्री अमित शाह. पंतप्रधानांचा उजवा हात एवढीच त्यांची ओळख नाही तर भाजप आज देशभर पसरलाय आणि एका मागोमाग निवडणुका जिंकत सुटलाय त्याच्या मागे अमित शाह यांची संघटनात्मक व धोरणात्मक शक्ती काम करते असं म्हणतात.

अमित शहांच्या इशाऱ्याशिवाय भारतीय राजकारण हालत नाही असं म्हणतात. पण एवढे सर्वशक्तिमान होऊन देखील आजही काँग्रेसवाले विरोधक अमित शाह यांना चिडवायचं असेल तर त्यांना तडीपार म्हणतात. 

अमित शाह यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ म्हणजे २०१० ते २०१२. या दोन वर्षात त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला होता. अमित शाह तेव्हा गुजरातचे गृहराज्यमंत्री होते. मात्र तेव्हा देखील त्यांची ओळख मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे चाणक्य अशी होती. मोदींचे आदेश आणि अमित शाह यांची कृती या तत्वावर गुजरात सरकार चालायचे.

unnamed 1

अशातच एका केसमुळे अमित शाह गोत्यात आले. 

ती होती सोहराबुद्दीन एन्काउंटर केस. 

सोहराबुद्दीन शेख हा मूळचा मध्यप्रदेशचा गुंड. तो राजस्थान गुजरातमधल्या व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करायचा. या भागात त्याने काही खून देखील केले होते. गुजरातचे माजी मंत्री हरेन पांड्या यांच्या खुनात देखील त्याचा हात असल्याचं बोललं जात होतं.

पण गुजरात एटीएसच म्हणणं होत कि तो लष्करे तैय्यबाचा अतिरेकी आहे.

२३ नोव्हेंबर २००६ रोजी बसने हैद्राबाद वरून सांगलीला चाललेल्या सोहराबुद्दीनला गुजरातच्या पोलिसांनी पकडलं आणि काहीच दिवसात त्याचा एन्काउंटर झाला. काही पोलिसांनी एका फार्महाऊसवर दारू पिऊन याच्या फुशारक्या एका पत्रकारापुढे मारल्या आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण भारतात ब्रेकिंग न्यूज सुरु झाली.

नरेंद्र मोदींच्या गुजरात सरकारवर टपून बसलेल्या विरोधकांनी, पुरोगामी विचारवंतांनी ओरड सुरु केली. पोलिसांवर कैसे सुरु झाल्या. थेट अमित शहांवर बोट दाखवलं गेलं. सुप्रीम कोर्टाने सखोल चौकशीचे आदेश दिले. तेव्हाच्या इन्स्पेक्टर जनरल गीता जोहरी यांनी आपल्या रिपोर्टमध्ये अमित शहांचा स्पष्ट उल्लेख केला.

सुप्रीम कोर्टाने सोहराबुद्दीन केस सीबीआय कडे सोपवली. सीबीआयने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पकडले. मधल्या काळात सोहराबुद्दीनच्या एन्काउंटरचा साक्षीदार तुळशीराम प्रजापती याचा देखील मृत्यू झाला. 

सोहराबुद्दीन केस आता खूप गुंतागुंतीची बनली होती. नवनवीन नावे सापडत होती. इशरत जहाँ पासून ते गुजरात दंगलीच्या फाईल उघडल्या जात होत्या. तत्कालीन गृहमंत्री पी.चिदम्बरम यांनी जोर लावला होता. अखेर या हायप्रोफाईल  केस मध्ये  अखेर अमित शहांच्या अटकेचे आदेश सुटले. त्यांनी मोदी सरकारमधल्या गृहराज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

जुलै २०१० मध्ये अमित शाह यांना सीबीआयने अटक केली. त्यांना कोर्टाने साबरमती जेल मध्ये डांबण्याचे आदेश दिले. गुजरातमधील सर्वात ताकदवान व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे अमितभाई शाह हे साबरमतीमधल्या तिलक कुटीर मध्ये बंद झाले. याच तुरुंगात एकेकाळी लोकमान्य टिळकांना ठेवण्यात आलं होतं.

अमित शाह सांगतात हा काळ त्यांच्यासाठी प्रचंड कठीण होता. त्यांच्या मुलाला म्हणजेच जय शाह याला शिक्षण सांभाळून कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत  होत्या. सत्तेच्या वेळी मागे पुढे करणारी मंडळी आता त्यांच्या सावलीला देखील उभी राहत नव्हती. 

जवळपास तीन महिने अमित शाह या साध्या कौलारू झोपडीसारख्या कारागृहात राहिले. या काळात म्हणे त्यांनी पुस्तके वाचणे आणि जेलमधील इतर बंदींना वाचायला शिकवण्याचं काम केलं.

ते जेलमध्ये असताना भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अरुण जेटली त्यांना भेटायला साबरमती कारागृहात येऊन गेले. तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी खंबीरपणे अमित शाह यांच्या पाठीशी उभे असणार असल्याचं सांगितलं होतं.

पुढे लवकरच गुजरात सरकारने अमित शाह यांना पुराव्या अभावी जामिनावर सोडून देण्याचे आदेश देण्यात आले. पण त्यांच्या विरोधकांनी आक्षेप घेतला की जर अमित शाह गुजरातमध्ये थांबले तर ते आपलं राजकीय वजन वापरून केसच्या तपासावर प्रभाव टाकतील. 

अखेर कोर्टाने अमित शाह यांना गुजरात सोडून जाण्याचे आदेश दिले आणि परतण्यास बंदी घातली. हीच ती अमित शाह यांची कुप्रसिद्ध तडीपारी.

अनेकांना वाटलं की त्यांचं राजकारण संपलं. असं म्हणतात की काही काळ अमित शाह आपल्या पत्नीसह तिच्या माहेरी कोल्हापूरला काही काळ राहिले होते मात्र याचे पुरावे मिळत  नाहीत. या तडीपारीच्या काळात त्यांनी भारतभरात अनेक दौरे केले पण मुखत्वे ते राजधानी दिल्लीला राहिले.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ७ रेस कोर्स या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कौटिल्य मार्गावरील गुजरात भवनमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये अमित शाह पतिपत्नीने आपला संसार मांडला. अमित शाह यांनी या काळात दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींच स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला.

अमित शाह सांगतात की या वनवासाच्या काळात त्यांनी भाजपच्या धोरणांचा अभ्यास केला आणि आपली आयडियॉलॉजी घट्ट केली.

हिंदी हार्टलँडच राजकारण कस चालतं यावर त्यांनी दिल्लीतून लक्ष ठेवलं. विशेषतः उत्तरप्रदेश वर त्यांनी आपली पकड निर्माण केली. रोज अनेक गाठीभेटी करून त्याचे रिपोर्टींग गुजरातमध्ये नरेंद्र मोदींकडे दिल जायचं. याशिवाय गुजरातमध्ये काय घडतंय यावर देखील अमित शाह यांची नजर होती.

एकप्रकारे अमित शहा यांनी दिल्लीत गुजरात भवनच्या रूमनंबर तीनमध्ये बसून नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा पाया मजबूत केला.

लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या साठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. नरेंद्र मोदींनी देखील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये दोन तीन वेळा मिटिंग घेतली, अमित शाह त्याला हजर होते. त्यांचे विरोधक त्यांना राजकारणातून बाहेर करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा अमित शाह फक्त गुजरातच नाही तर संपूर्ण भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्याची तयारी करत होते.

Amit shah Modi
Amit Sha and Narendra Modi

सप्टेंबर २०१२ मध्ये गुजरात कोर्टाने अमित शाह यांचा जामीन मंजूर केला व त्यांना गुजरातमध्ये परतण्याची परवानगी दिली.  गुजरातच्या विधानसभा निवडणूक तोंडावर होत्या. एखाद्या हिरो प्रमाणे जल्लोषात अमित शाह अहमदाबादला परतले. त्यांना नरेंद्र मोदींनी विधानसभेचं तिकीट देखील देऊ केलं होतं. 

डिसेंबर महिन्यात झालेल्या या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणे मोठा विजय मिळवला. या विजयात अमित शाह त्यांच्या सोबत उभे होते. लवकरच त्यांनी दिल्लीत केलेल्या प्रयत्नांना फळ आले लालकृष्ण अडवाणींच्या सारख्या मोठ्या नेत्याला मागे टाकून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले.

त्यांनी अमित शहा यांच्या काटेकोर नियोजनाखाली २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढवली आणि सहज जिंकून देखील दाखवली. त्याच वर्षी अमित शाह यांच्यावरील सर्व आरोप धुतले गेले आणि पुढचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.