अमित शहांच्या राजस्थान दौऱ्यामुळं वसुंधरा राजेंच्या राजकारणाची दिशा ठरू शकतेय…
गेल्या आठवड्यात राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी रात्रीत राजीनामे दिले. सोशल मीडियावर सरकार पडण्याच्या चर्चांना उधाण आलं. अनेक लोकांनी अमित शहांचे फोटो शेअर केले, कुणी सचिन पायलट यांचे. पण सकाळी मात्र खळबळ निवांत झाली.
तसा राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात तसा जुना वाद आहे. पायलट गटातल्या आमदारांना मंत्रीपद देत, प्रदेश काँग्रेसनं सुवर्णमध्य काढला. त्यामुळं दोन वर्षांवर आलेल्या निवडणुकांपर्यंत तरी सरकार स्थिर राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता हे सगळं गणित झालं काँग्रेसचं. तिकडं भाजपच्या गोटातही सार काही आलबेल आहे असं अजिबात नाही. राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतिश पुनिया हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी उत्सुक आहेत. दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्या असून त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
वसुंधरा राजे आणि पुनिया यांच्यातलं शीतयुद्धही जगजाहीर आहे. या सगळ्या गोंधळात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा येत्या ५ तारखेला राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे या दौऱ्यादरम्यान ठरण्याची शक्यता आहे.
शहांचा दौरा नेमका कशासाठी?
अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. सोबतच राजस्थानमधून निवडून आलेले भाजपचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींची बैठक शहा घेणार आहेत. जवळपास हजारभर लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहतील. यात संघटनात्मक धोरणांबाबत चर्चा होणार आहे. सोबतच राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस विरोधातलं आंदोलन आणखी तीव्र करण्याबाबतही चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपची दिशाही ठरणार आहे.
या सगळ्यात शहा यांच्या दौऱ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे, ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा. प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनीही वेगवेगळ्या मार्गानं आपली दावेदार सिद्ध करत आहेत. मात्र वसुंधरा राजे यांनीही चांगलीच कंबर कसली आहे.
त्यांनी काढलेल्या देवदर्शन यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. त्या मोठ्या गॅपनंतर राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या असल्या, तरी त्यांचं बरंच राजकारण बाकी आहे, असं खुद्द वसुंधरा राजेंचे विरोधकच सांगतात. त्यामुळं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचंच नाव आघाडीवर आहे.
असं असलं तरी, प्रदेश भाजपसोबत वसुंधरा राजेंचं फारसं सख्य नाही. त्यामुळं त्या पुनिया आणि प्रदेश भाजपबद्दल अमित शहांकडे थेट तक्रार करणार की जैसे थे परिस्थिती ठेवत आपली मोर्चेबांधणी सुरू ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल.
अमित शहा आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नाहीत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण निवडणुकांना अजूनही दोन वर्ष बाकी आहेत. सतिश पुनिया आणि वसुंधरा राजे यांच्यासोबतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळं आधीच उमेदवार जाहीर करून बाकीच्यांना नाराज करण्याचा धोका भाजप पत्करणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केंद्रस्थानी ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल.
वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार ठरल्या नाहीत, तर त्यांची राजकीय भूमिका काय असणार? आणि त्या प्रदेश भाजपला सहकार्य करणार का? याकडे राजकीय पंडितांचं लक्ष लागलेलं असेल.
हे ही वाच भिडू:
- राजस्थान मंत्रिमंडळातले बदल युपी इलेक्शन डोळ्यांसमोर ठेऊन करण्यात आलेत
- राजे की पुनिया? इलेक्शनच्या दोन वर्ष आधीच राजस्थानात सामना रंगलाय
- गहलोत असा माणूस आहे, ज्याला दूध दिलं तरी तो पहिला ते मांजराला प्यायला देतो
English Summary:
Home Minister Amit Shah’s scheduled visit to Rajasthan over the weekend is being highly anticipated by the State unit of the BJP, as it comes after bypoll losses and a solo yatra by former Chief Minister Vasundhara Raje.
Web title: Amit shah’s Rajasthan visit can be a turning point for Vasundhara Raje.