बाळासाहेब म्हणाले, अमिताभला माझा रोल जमलाय का?

मुझे जो सही लगता है, वो मै करता हूँ… वो चाहे भगवान के खिलफा हो, समाज के खिलफा हो, पुलीस, कानून, या फिर पुरे सिस्टम के खिलफा क्यूँ न हो…

असं म्हणतं २००५ साली अमिताभ बच्चनच्या भारदस्त आवाजात ‘सरकार’ पिक्चर रिलीज झाला आणि सगळीकडे एकचं चर्चा सुरु झाली. तसं बघितले तर अमिताभ असल्यामुळे हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत होता. मात्र रिलीज झाल्यानंतर त्यातील अमिताभ बच्चनच्या रोलमुळे बरीच चर्चा सुरु झाली.

‘सरकारमधील’ मुख्य व्यक्तिरेखा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेली आहे, असं बोललं आणि लिहिलं जाऊ लागलं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. त्यातल्या सुभाष नागरे ऊर्फ सरकार या पात्राचे बोलणे-चालणे, पेहराव हे सारे काही बाळासाहेबांशी मिळते-जुळते. साहजिकच, त्यातल्या कथानकाचा बाळासाहेब ठाकरेंशी संबंध जोडला जाऊ लागला.

पण हा संबंध खरा होता. स्वतः दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी याबाबत तब्बल ५ वेळा खुलासा केला आहे कि ‘सरकार’ म्हणजेच बाळासाहेब ठाकरे. असं म्हणतात कि स्वतः राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांना या सिनेमाची सर्व कथा ऐकवली होती. बाळासाहेबांच्या सल्ल्यावरूनच वर्मा यांनी अमिताभ बच्चन यांना कास्ट केलं होतं.

पुढे चित्रपटाचा पहिला कट झाल्यानंतर जेव्हा तो राम गोपाल वर्मा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दाखवला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाले, वेल डन…! फायनल झाल्यानंतर स्वतः अमिताभनेही ठाकरे कुटुंबाला चित्रपट दाखवून त्यांच्याकडून ‘ओके’ घेतला होता. सोबतच स्वतः बाळासाहेब आणि अमिताभ बच्चन यांचे संबंध लक्षात घेता अशा चित्रपटाला शिवसेनेकडून विरोध होणे अवघड होते.

तरीही वादाला तोंड फुटलेच. कारण, सिनेमाच्या रिलीजनंतर ठाकरे कुटुंबातील असलेल्या आणि नसलेल्या भांडणावर वर्तमानपत्रे आणि टीव्हीच्या पडद्यावर खमंग चर्चा सुरू झाल्या होत्या. एका बाजूला हा सगळा वाद सुरु असताना, दुसऱ्या बाजूला स्वतः बाळासाहेब मात्र या चर्चा आणि वादाकडे दुर्लक्ष करत अगदी आरामात होते.

याचाच प्रत्यय एकदा जेष्ठ पत्रकार आणि माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत यांना आला होता.

एकदा मध्यरात्र उलटून जात असताना डॉ. राऊत यांच्या घरचा फोन वाजला. फोन उचलला, तर
समोरून धीरगंभीर आवाज आला,

“मी सुभाष नागरे बोलतोय”

बाळासाहेबांचा आवाज ओळखणे डॉ. राऊतांना  कठीण नव्हते. पण, इतक्या रात्री फोन करण्याचं कारण त्यांनी बाळासाहेबांना विचारलं. तर समोरून खळखळत हसत बाळासाहेब म्हणाले,

का घाबरलास की काय?”.

“तसं नाही, पण काही काम होतं का? काही गडबड?” त्यांना अडखळतच डॉ. राऊत यांनी विचारले.

तर म्हणाले, “काहीही गडबड नाही आणि तुला कुठलीही बातमी नाही. पण एक सांग, तू सिनेमा
पाहिलास?”

डॉ. राऊत उत्तरले, “हो तर, प्रीमियरलाच गेलो होतो.

“कसं वाटलं माझं कॅरॅक्टर? जमलय का अमिताभला?”

आणि मग पुन्हा हसण्याचा खळखळाट.

डॉ. राऊत सांगतात, त्यानंतर बराच वेळ ‘सरकार, मानसिकता, अशा वादांमुळे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कुटुंबांमध्ये निर्माण होणारे वादंग, या आणि अशा अनेक छोट्या-मोठ्या विषयांवर बाळासाहेब बोलत राहिले. फोन ठेवला, तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. पण फोन बंद करताना, रात्री-अपरात्री फोनवर बोलत राहू नकोस. गडबड होईल,” असा दम भरत पुन्हा हसायला ते विसरले नाहीत…

एकूणच काय तर ‘सरकार’वरून त्यावेळी कितीजरी वाद झाले असले तर बाळासाहेबांनी मात्र या चित्रपटाचा पूर्ण आनंद घेतला होता.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.