अमिताभला मृत्यूने मारलेला पहिला ठोसा !!

मी डबिंग स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होतो. सकाळचे सात वाजले होते आणि अंधेरीमधील एका स्टुडिओ बाहेर मी उभा होतो. स्टुडिओला बाहेरून कुलूप होते आणि तेवढ्यात स्टुडिओ बाहेर गर्दी जमा व्हायला लागली. कारण माझ्या बाजूला दस्तुरखुद्द अमिताभही स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होते.

अमिताभ नेहमीच सकाळी सात किंवा आठ वाजता डबिंग करतात. त्यांचा हा नियम गेले अनेक वर्षे ते पाळत आहेत. आजही ते सकाळी वेळेवर आले, पण स्टुडिओ बंद होता. सकाळची वेळ असल्यामुळे सोबत बॉडी गार्ड नव्हते. फक्त त्यांचा ड्रायव्हर थोड्या अंतरावर उभा होता आणि आम्ही दोघे स्टुडिओच्या कुलूपाकडे पाहण्यापेक्षा वेगळं काही करू शकत नव्हतो.

अमिताभ स्वभावाने कसे आहेत हे मला त्यादिवशी कळले.

माझ्या मनात होते की स्टुडिओ उघडल्यावर अमिताभ उशीर झाला म्हणून रागावणार.

आम्ही स्टुडिओबाहेर उभे होतो आणि तितक्यात स्टुडिओ उघडणारा मुलगा रिक्षातून उतरून धावत आला.

अमिताभ ह्यांना ” सॉरी” म्हणता म्हणता त्याने झटकन कुलूप उघडलं आणि गर्दी टाळून आम्ही पुढच्या क्षणाला स्टुडिओत शिरलो. त्या मुलाने सांगितले की मी दादरहून ट्रेनने येताना घाईत लगेजच्या डब्यात बसलो आणि टीसीने मला पकडून दंड घेईपर्यंत उशीर झाला. म्हणून मी इथे उशिरा पोहोचलो आहे.

अमिताभ गालात हसले आणि त्यांनी त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून ” कोई बात नही” असे म्हटले. मग मी माझ्या स्ट्रगलच्या दिवसात कसा लोकलने प्रवास करायचो ते सांगितले. थोड्या वेळात रेकॉर्डिस्ट आला. तोही उशिरा पोहोचला. पण बच्चन साहेबांनी कोणालाही न रागावता डबिंग पार पाडले. तेच मी इतर स्टारच्या बाबतीत पाहिले आहे.

एक सुपरस्टार सकाळी १० वाजता येतो असे सांगून रात्री ९ वाजता आला आणि इतरांवर डाफरत काम केले. असा प्रकार अमिताभने कधी केला नाही. पाय नेहमी जमिनीवर ठेवले आणि नेहमी new comer सारखे वेळेवर, सचोटीने, तन-मन अर्पून काम केले. म्हणूनच, अमिताभ अनेक पिढ्यांचा स्टार बनला.

मी अमिताभ ह्यांना दोनदा भेटलो. डबिंग करताना त्यांच्याशी बोललो आहे. त्यांचे अनेक सिनेमे पाहिले, पण त्यांच्या सिनेमांपेक्षा जास्त आकर्षक आहे त्यांची संघर्ष करण्याची वृत्ती !!

आता त्यांनी मृत्यूशी केलेला पहिला संघर्ष आणि त्यावरून मी पुनीत इसारशी जे बोललो ते सांगतो. पुनीत इसार ह्या अभिनेत्याने “कुली” सिनेमाच्या चित्रीकरणावेळी अमिताभ ह्यांना पोटात एक ठोसा मारला होता. सिन करताना तो खरोखर अमिताभच्या पोटात आतपर्यंत बसला आणि अमिताभला मुंबईत जखमी अवस्थेत आणलं. हॉस्पिटलमध्ये अमिताभवर उपचार चालू होते. पण प्रकृती आणखी ढासळत होती. गंभीर बनत होती. देशभरात अनेक चाहत्यांनी देव पाण्यात बुडवले. कोणी नवस केला तर कोणी बदल्यात माझा जीव घे अशी देवाकडे प्रार्थना केली.

पण अमिताभचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी जया बच्चन ह्यांना अमिताभचा मृत्यू झाला हे सांगितले. अमिताभ हा सुपस्टार बेडवर निपचित पडला होता आणि जया बच्चन शोकाकुल अवस्थेत बाजूला बसून होत्या.

काही मिनिटे गेली आणि गतप्राण झालेल्या अमिताभचा पाय चक्क हलला. जया ह्यांनी ही गोष्ट डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांचा विश्वास बसेना. पण खरोखर चमत्कार झाला आणि अमिताभची हालचाल पुन्हा सुरु झाली. गतप्राण झालेला महानायक अमिताभ अनेक चाहत्यांच्या प्रेमापोटी पुन्हा जिवंत झाला.

पृथ्वीवरील सामान्य माणसांच्या कठीण जीवनात मनोरंजन असावे हे देवालाही जाणवले आणि त्याने अमिताभला जीवनदान दिले.

पुनीत ह्याने अमिताभ माणूस म्हणून कसा आहे हे मला मुलाखतीत सांगितलं होतं. पुनीतने ” हिंदुस्थानी” ही मालिका बनवली होती. त्यासाठी मी ” चंदेरी” मासिकाकरिता त्याची मुलाखत घेत होतो.

बोलताना “कुली” चा विषय निघाला. पुनीत सांगू लागला….

Screenshot 2020 07 12 at 10.59.43 AM

अमिताभ आणि मी रिहर्सल केली. मी त्यांच्या पोटात ठोसा मारतो असा सिन होता. रिहर्सल संपली. शूट सुरु झालं. कॅमेरा सुरु झाला. पुनीतने अमिताभच्या पोटात ठोसा मारला. त्याचा हात अमिताभच्या पोटापासून इंचभर लांब होता. पण झाले असे की अमिताभच्या मागे खांब होता. ह्या खांबाखाली एक पत्र्याचा बोर्ड पडला होता. अमिताभ ठोसा येताच मागे झाला आणि पत्र्याच्या बोर्डाचा धक्का लागून पुन्हा पुढे ढकलला गेला. तोवर पुनीतचा मजबूत हात जोरात पुढे आला होता आणि त्याचा खरंच अमिताभच्या पोटात जोरदार ठोसा बसला. सगळं एका क्षणात आणि चुकून घडलं.

सुदैवाने, अमिताभ मृत्यूच्या दाढेतून वाचला.

पुनीतने मला पुढे आणखी एक किस्सा सांगितला. अमिताभ हॉस्पिटलमध्ये असताना काही जणांनी अशा बातम्या छापल्या की पुनीतने अमिताभला जाणूनबुजून मारलं. शेवटी सिनेमा जगत म्हणजे चर्चेचा बाजार. हा हा म्हणता पुनीत बदनाम झाला आणि त्याचं करिअर धोक्यात आलं. ही बातमी अमिताभच्याही कानावर गेली. त्याने जयाकडून निरोप पाठवून, सरळ पुनीतला बोलावून घेतलं.

त्यावेळी अमिताभने पुनीतला सांगितलं की ” मुक्कदर का सिकंदर” च्या शूटवेळी अमिताभने काचेची बॉटल फेकली होती. अमिताभ बॉटल फेकतो आणि विनोद खन्ना ती चुकवतो असा सिन होता. पण विनोद खन्नाला ती खरंच लागली होती. तसा तुझा ठोसा मला लागला हे मला माहित आहे. इतकं बोलून तो पुनीतच्या खांद्यावर हात ठेऊन पत्रकारांसमोर गेला. पुनीतची बदनामी थांबली आणि अमिताभही मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला.

अमिताभ ह्यांना मी दुसऱ्यांदा “बीआर” स्टुडिओमध्ये भेटलो होतो. त्यावेळीही अमिताभ कळवल्यानुसार बरोबर सकाळी आठ वाजता स्टुडिओत पोहोचले. ते वेळेचे पक्के आहेत. ते आले तेव्हा जिमचे कपडे अंगावर होते. आपलं आरोग्य राखण्याला ते खूप महत्व देतात. म्हणून रोज सकाळी व्यायाम करूनच घराबाहेर पडतात. म्हणजे रोज सकाळपासून संघर्षाला सुरुवात होते.

डबिंग करण्याआधी आम्ही दोघे स्टुडिओत रिहर्सल करत होतो. त्यावेळी मी मराठी संवाद वाचून दाखवत होतो आणि ते माझ्यामागे ते संवाद म्हणत होते. हिंदी आणि मराठी भाषेत खूप साम्य असल्यामुळे त्यांचे उच्चार बरोबर येत होते. फक्त ते मराठी “च” चा उच्चार हिंदी “च” सारखा करत होते. मी त्यांना उच्चारातील फरक सांगत होतो.

त्यांनी एक पॉज घेतला आणि गालात हसून मला विचारलं,

“लोणचंवाला च बोलना है क्या?’

त्यांना मराठी लोणचं शब्द माहित आहे हे माझ्या लक्षात आलं. मी होकार दिल्यावर काम सोपं झालं आणि आम्ही डबिंग पूर्ण केलं.

अमिताभ सुपरस्टार होते, पण तोंडात चांदीचा चमचा घेऊन आले नाहीत. दर पावलाला संघर्ष करावा लागला. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं,

“मन का हो तो अच्छा, न हो तो और भी अच्छा !”.

अमिताभ ह्यांना लहान वयात त्याचा अर्थ कळला नाही. पण सिनेमासृष्टीत कोणी विचारत नव्हतं, काही सिनेमे फ्लॉप गेले, एकदा मृत्यूशी भेट झाली, बोफोर्स प्रकरणात नाव आलं. खासदारकीचा निर्णय चुकला, कर्जाचा डोंगर चढला, आजारपण पिच्छा सोडत नव्हतं तेव्हा वडिलांच्या बोलण्याचा अर्थ कळला.

मनासारखं झालं नाही की माणूस आणखी संघर्ष करतो आणि तावून सुलाखून निघतो हे उमगलं. अमिताभ सतत संघर्ष करत राहिले आणि जिंकत गेले. अमिताभ संपला अशा वावड्या उठत होत्या त्यावेळी त्यांनी “कौन बनेगा करोडपती” मालिका केली आणि अमिताभ उतरत्या वयातही महा मेगास्टार बनले.

अमिताभ ह्यांनी केलेल्या संघर्षाचं एक उदाहरण पाहू. बोफोर्स प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यावेळी त्यांच्या सिनेमाच्या पोस्टरवर काळे फासण्यात आले. सगळीकडे बदनामी होत होती. वृत्तपत्रांनी रकाने भरून अमिताभची निंदा केली. पण अमिताभच्या मनाला लागलेला एक वेगळाच प्रसंग आहे.

एकदा हरिवंशराय बच्चन कारने घरी येत होते. चौकात कार थांबली. तितक्यात कोणीतरी कारवर हाताने मारलं आणि जोरात ओरडला- चोरकी कार!

हरिवंशराय घरी आले आणि त्यांनी अमिताभला विचारले,

“मुन्ना, तुमने कोई गलत काम किया है क्या?”

त्यावेळी वडिलांना उत्तर देणं अमिताभला कठीण गेलं. नंतर अशा घडामोडी घडल्या की अमिताभची झोप उडाली आणि त्या सगळ्यातून बाहेर पडेपर्यंत आजाराने ग्रासले. पण प्रत्येक सिनेमात अमिताभ संघर्ष करत वाईट स्थितीतून बाहेर पडतो, तसा प्रत्यक्ष जीवनातही भयंकर प्रतिकूल स्थितीतून बाहेर आला. वडिलांना पुन्हा स्वतःचे नाव सिद्ध करून दाखवले. एकदा नाही वारंवार सिद्ध करून दाखवले !!

अमिताभच्या जीवनावर वडिलांचा खूप प्रभाव आहे. त्याचे वडील रोज सकाळी ” प्रतीक्षा” बंगल्याजवळील मोकळ्या रस्त्यावर चालायला जायचे. रस्त्यात एक भलामोठा दगड होता. तो हलवणे हरिवंशराय ह्यांना मुळीच शक्य नव्हते. मग त्यांनी तो जमेल तितका जोर लावून रोज थोडा थोडा ढकलला आणि काही दिवसानंतर दगड रस्त्याबाहेर नेला.

आपला मुलगा मोठा सुपरस्टार आहे, त्याला सांगून दगड हलवणे सोपे आहे असा विचार त्यांनी केला नाही. स्वतःची शक्य तितकी ताकद वापरून, काही दिवसानंतर दगड हलवला. ह्या प्रसंगातून अमिताभही शिकला. त्यानेही अनेक मोठी संकटे हळूहळू दूर केली. सतत संघर्ष केला.

खरं सांगायचं तर अमिताभ म्हणजे मूर्तिमंत संघर्ष. त्याला ( त्यांना ) संघर्ष करावा लागला नाही तरच नवल. अमिताभ मेगास्टार आहे. स्टोरीमध्ये संघर्ष नसेल तर कसे चालेल.  अमिताभला आता कोरोनाची लागण झाली आहे. पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. पुन्हा अमिताभ आपला करिष्मा दाखवणार.  पुन्हा एकदा जिंकणार!

मृत्यूला एकदा नमवले. पुन्हा नमवणार ! मृत्यूला सांगा….
अमिताभको पकडना मुश्किलही नही, नामूनकिनभी है.

लेखक- निरेन आपटे.

Leave A Reply

Your email address will not be published.