अमिताभला एका बुक्कीत गार करणारा पुनीत इस्सार !!

भावानो कधी तुमच्या हातून एखादा अॅक्सिडेंट झाला आहे काय? कधी गल्लीतल्या म्हातारीच्या अंगावर सायकल घातली, मित्राला स्कूटरवरून पाडलं, बापाने घेतलेल्या नव्या कारला ठोकून आणलं वगैरे वगैरे. पण तुमच्या हातून भारतातल्या सगळ्यात मोठ्या महानायकाचा   अॅक्सिडेंट झाला तर?

पुनीत इस्सारच्या हातून तोच प्रमाद घडला होता. 

साल होतं १९८२. बेंगलोरमध्ये मनमोहन देसाई आपल्या कुली सिनेमाच शुटींग करत होते. अमिताभसोबत त्यांनी बनवलेले अमर अकबर अन्थनी, सुहाग, नसीब असे तीनचार एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे नुकतेच येऊन गेलेले. टिपिकल मसाला सिनेमा बनवणारया मनमोहन देसाईनां पिक्चर हिट करायचा फॉर्म्युला सापडलेला.

फायटिंग.

लंबूटांग्या अमिताभ संपूर्ण सिनेमात फुलओन मारधाड करायचा. चवीपुरती कॉमेडी, रोमान्स, कादर खानचे ठसकेबाज संवाद आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल म्युजिक. याच फॉर्म्युल्याने बनवलेला कुलीसुद्धा सुपरहिट होणार त्यांना खात्री होती.

यावेळी अमिताभ सोबत ऋषी कपूर, वहिदा रेहमान, कादर खान, निळू फुले, सुरेश ओबेरॉय, अमरीश पुरी अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट होती. रती अग्निहोत्री, शोभा आनंद(हम पांच मधली अशोक सराफची दुसरी बायको बिना) या दोन हिरोईन होत्या.

महत्वाच म्हणजे फायटिंगवाली जबरदस्त स्टोरी होती.  

५ जुलैला दुपारी २ वाजता अमिताभ आणि ऋषी कपूर नेहमी प्रमाणे एका कार मधून शुटींगला आले.

पहिला सीन ऋषी कपूरचा होता. त्याला वीस फुटावरून उडी मारायची होती. खाली त्याच्या सुरक्षिततेसाठी बॉक्स आणि जाळी ठेवलेली होती. अक्शन डायरेक्टरने सीन समजावून सांगितला आणि ऋषी कपूरने उडी मारली पण त्याची उडी चुकली. तोंडाला थोड फार खरचटलं.

हे सगळ अमिताभ बघत उभा होता. त्याने ऋषी कपूरला अस्सल अस्सल शिव्या घातल्या. अॅक्टरनी स्वतःची काळजी कशी घ्यावी यावर एक चांगल लेक्चर दिलं. ऋषीने खाली मान घालून ऐकून घेतल.

पुढचा सीन अमिताभचा होता. एका मवाल्याबरोबर तो मारामारी करतोय असा सीन होता. त्या मवाल्याचा रोल केला होता पुनीत इस्सारने. सव्वा सहा फुट उंच, भारदस्त शरीरयष्टी, तसाच दमदार आवाज असलेला, मार्शल आर्ट्सचा चम्पियन पुनीतचा हा पहिलाच पिक्चर होता. आणि तोही बच्चन बरोबर म्हणून खूप एक्साईटेड होता. त्याला सीन समजावून सांगण्यात आला.

बच्चनची आणि पुनीतची मारामारी सुरु झाली. एकवेळ अशी होती ज्यात त्याला अमिताभला बुक्की मारायची होती. त्याने बुक्की मारली, अमिताभ कळवला आणि खाली पडला. एका सेकंदासाठी सगळा सेट शांत झाला. काय झालं काय झालं? पुनीतचा ठोसा खरोखर अमिताभला लागला होता हे दिसत होतं. पण काही सेकंदातच  बच्चन उभा राहिला.

“वा बच्चन साबने क्या अॅक्टिंग की है.”

सगळ्यांनी सेटवर टाळ्या वाजवल्या. बच्चनने सुद्धा अगदी कमरेत वाकत वाकत अभिवादन केलं. एका टेकमध्ये शॉट ओके झाला होता. पुढच्या सीनची तयारी सुरु झाली. एवढ्यात ऋषी कपूरला एक मेकअपमन येऊन म्हणाला,

“अमितजी को कुछ तो हुआ है वो गार्डन मै लेटे हुये है.”

ऋषी कपूर जाऊन पाहतो तर काय बच्चन अगदी वेदनेने तडपत होता. काही क्र्यू मेम्बर्सनां वाटल की बच्चन आता पण अॅक्टिंगच करतोय. पण काही वेळाने कळाल मॅटर सिरीयस आहे. त्याला हॉटेलवर नेण्यात आल. बेंगलोरच्या डॉक्टरांनी काही तरी जुजबी उपचार केले. पण बच्चनची वेदना काही कमी झाली नाही.

सगळ्यांना वाटत होत फक्त एक बुक्की तर लागली आहे, त्यात एवढ महाभारत होण्यासारखं काय आहे. पण जसा जसा वेळ जाईल बच्चनची कंडीशन बिघडत चालली होती. तो कोमामध्ये गेला. त्याला तातडीने मुंबईच्या ब्रीचकँडी हॉस्पिटलला हलवण्यात आल. तिथल्या डॉक्टरांनी जाहीर केलं,

इंडिया सुपरस्टार अमिताभ बच्चन जिंदगी और मौत की लढाई लढ रहा है.

अख्खा देश हादरला. देशाच्या पंतप्रधानांपासून ते फुटपाथ झोपणाऱ्या फाटक्या माणसापर्यंत सगळे जण आपला हिरो वाचवा म्हणून देव पाण्यात घालून बसले.  ब्रीचकँडीच्या बाहेर तुफान गर्दी झाली. अगदी आपले मिथुनदा चक्रवर्ती यांनी सुद्धा आपली छाती चिरून त्या रक्ताने काली मांचा अभिषेक केला. रोज पेपरची हेडलाईन बच्चनच्या तब्येतीची असायची.

या दरम्यान पुनीतची काय हालत झाली असेल तुम्ही विचार करा. त्या एका बुक्कीमुळे तो देशाचा शत्रू नंबर वन झाला होता. अनेकांना वाटत होतं की त्याने मुद्दामहून तो शॉट मारला होता. पण तस काही नव्हत. बिचाऱ्या पुनीतला रोज धमक्या येऊ लागल्या. त्याने घाबरून घरातून बाहेर पडायचंही बंद केलं होत.

इकडे बच्चनच ऑपरेशन झालं. त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली.

एकदिवस मनमोहन देसाई पुनीतला भेटायला आला. त्याने त्याला ब्रीचकँडी हॉस्पिटलला नेलं. पुनीत घाबरत घाबरत बेडवर झोपलेल्या बच्चनला सामोरे गेला. पण अमिताभने त्याला दिलासा दिला.

“हा अपघात होता आणि तो माझ्या हातूनही झाला असता. DONT WORRY. मी तुझ्यावर चिडलेला नाही आहे.”

एवढच नाही अमिताभ पुनीतच्या खांद्याचा आधार घेत बाहेर आला. त्याने तिथे जमलेल्या जनतेपुढे येऊन हात हलवला. त्यातून लोकांना कळाल की बच्चनने पुनीतला माफ केलं आहे. पुनीतचा जीव वाचला.

main qimg db4c737918b56a1a5a330fc55b264516

पुढे अमिताभ बरा होऊन परत आला. अर्धवट राहिलेलं शुटींग पूर्ण केलं. कुली रिलीज देखील झाला. मनमोहन देसाई यांनी एक हुशारी केली होती. बच्चनला अपघात झाला तो सीन पडद्यावर आला की काही काळ तिथे सिनेमा थाबायचा. आणि संदेश दिसायचा,

“इसी शॉट में अमिताभ बच्चन को चोट लगी थी.”

पुनीत इस्सारचा तो शक्तिशाली ठोसा बघून थिएटरमधलं पब्लिक ही थरारून जायची. पुनीतच्या नावाने बोट मोडली गेली.

पुनीत इस्सार भारतासाठी व्हिलन बनून गेलात्याला जवळपास चार वर्षे त्याच्या लेव्हलच कामच मिळत नव्हतं.काही पिक्चर आले ते ही फ्लॉप झाले. पुराना मन्दिर गाजला पण तो होता एक बी ग्रेड सिनेमा ज्याच क्रेडीट पुनीतला मिळाल नाही.

तो एक चांगला अभिनेता आहे, त्याने अॅक्टिंगच ट्रेनिंग घेतल आहे, तो बरेच वर्ष व्होईस मोडयुलेशनचे क्लासेस घ्यायचा वगैरे सगळे जण विसरूनच गेले होते. फायटिंगच्या साईड रोलसाठी त्याचा विचार केला जायचा.

अभिनयक्षेत्रात  येण्यापूर्वी पुनीतची एनडीएसाठी निवड झाली होती. तिकडे गेलो असतो तर एव्हाना भारतीय आर्मीत मोठा अधिकारी झालो असतो हे विचार मनात येऊन पुनीत आणखी नैराश्यामध्ये जायचं.  

अखेर त्याचं आयुष्य बदलणारा रोल त्याला मिळाला, बीआर चोप्रांच्या महाभारत मधला दुर्योधन!!

अगदी हट्टाने पुनीतने तो रोल मिळवला होता. सगळ्या भारताला खिळवून ठेवणाऱ्या महाभारतने पुनीतला पुनर्जन्म मिळवून दिला. पुढे त्याने सनम बेवफा, बॉर्डर, रिफ्युजी मधून डोळ्यात पाणी आणणारे रोल केले. गर्व द प्राईड नावाचा सिनेमा बनवला. सलमानच्या रेडी, पार्टनर, गॉड तुस्सी ग्रेट हो वगैरे सिनेमात त्याने कॉमेडी देखील केली. बिग बॉस मध्ये सुद्धा चमकून गेलाय.

आता एक वेब सिरीज देखील करतोय. वेगवेगळे रोल करत सध्याच्या युगाबरोबर धावण चाललंय. त्याने आपली इमेज बदलण्याचे बऱ्यापैकी प्रयत्न चालवले आहेत.

पण आजही त्याची ओळख अमिताभला एका गुच्चीत गार करणारा अशीच आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.