म्हणून बच्चन साहेबांनी करार मोडत कमला पसंदवर काट मारली!

म्हणून बच्चन साहेबांनी करार मोडत कमला पसंदवर काट मारली!

रिश्ते मै तो हम तुम्हारे बाप लगते है, ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं, असे कडक डायलॉग मारणारा अमिताभ बच्चन फेमस होण्यात ‘खइके पान बनारस वाला’ गाण्याचाही मोठा वाटा आहे. बॉलिवूडमध्ये जवळपास पाच दशकं पूर्ण करणाऱ्या बच्चननं काल वयाची ७९ वर्षं पूर्ण केली.

आपल्या वाढदिवसाला त्यानं ‘पानमसाला कंपनीसोबत केलेला जाहिरातीसाठीचा करार मोडत असल्याचं आणि यापुढे आपण पानमसाल्याच्या जाहिरातीत काम करणार नाही’ असं सांगितलं.

आता पार जेम्स बॉण्डचं काम करणाऱ्या पिअर्स ब्रोस्नानपासून शाहरुख, सैफपर्यंत अनेकांनी पानमसाल्याच्या जाहिराती केल्या. बच्चन यापासून तसा लांब होता. मात्र ‘कमला पसंद’ पानमसाल्याच्या जाहिरातीत ”अनोखा स्वाद” म्हणत बिग बी अतरंगी रणवीर सिंगसोबत झळकला.

ही जाहिरात व्हायरल झाली आणि झगझगीत ड्रेस घालून तोंडात चंदेरी दाणे टाकणारा बच्चन टीकेचा धनी ठरला. सोशल मीडियावर एका चाहत्यानं, ‘सर, तुम्हाला पानमसाल्याची जाहिरात करायची काय गरज आहे, आता तुमच्यात आणि इतर ‘तुटपुंज्या’ कलाकारात काय फरक राहिला असा सवाल बच्चनला विचारला.

त्यावर ‘मी सगळ्यात आधी तुमची माफी मागतो. जर कुठली कंपनी चांगलं काम करत असेल, तर आपण त्यांच्यासोबत का काम करत आहोत असा प्रश्न पडता कामा नये. अर्थात एखादा व्यवसाय असेल, तर आपण स्वतःचं मूल्यांकन केलंच पाहिजे.

तुम्हाला वाटत असेल की मी हे काम करू नये, पण मला त्यासाठी पैसे मिळतात. अशा क्षुल्लक टिप्पण्या तुम्हाला किंवा आमच्या क्षेत्रातील इतर कलाकारांना खुश करत नाहीत. आमच्या क्षेत्रात अनेक कामगार आहेत, त्यांनाही जाहिरातीमुळे काम आणि पैसे मिळतात. तसंच ‘तुटपुंज्या’ या शब्दाचा वापर टाळा. तुमच्याकडून असे शब्द वापरले जाण्याची अपेक्षा नाही.  हा शब्द आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कामगारांसाठी अपमानकारक आहे,’ असं लांबलचक उत्तर बच्चननं दिलं.

तरीही चाहत्यांच्या टीकेचा पाऊस काही थांबला नाही. अनेकांसाठी आदर्श असणाऱ्या अभिनेत्यानं आरोग्याला हानिकारक असणाऱ्या उत्पादनाची जाहिरात करणं हे समाजात नकारात्मक संदेश देणारं आहे, असं अनेक चाहत्यांचं मत होतं.

त्यानंतर, राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संस्था (नोट) या स्वयंसेवी संस्थेनं बच्चनला नोटीस धाडली. ही नोटीस आणि सोशल मीडियावर फॅन्सने ओढलेले ताशेरे पाहता, बच्चननं या कंपनीसोबत केलेला करार रद्द करत असल्याची घोषणा आपल्या वाढदिवशी केली.

त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर केल्या गेलेल्या पोस्टमध्ये, ‘आपण संबंधित ब्रँडशी संपर्क साधला आहे. यानुसार ब्रँडबरोबरचा करार रद्द केला असून प्रमोशन फिसदेखील परत केली आहे. कराराच्या वेळी ही जाहिरात ‘सरोगेट ॲड’ असल्याचं ठाऊक नव्हतं. यापुढेही पानमसाल्याच्या जाहिरातीत आपण काम करणार नाही,’ असं सांगण्यात आलंय.

कधीकाळी खईके पान बनारस वाला, म्हणत नाचणारा बच्चन आता तंबाखूविरोधी मोहिमेत सहभागी होईल अशीही शक्यता आहे. थोडक्यात सोशल मीडियावरच्या भिडूंनी, ‘फिर तो ऐसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल’ हे पुन्हा एकदा सिद्ध केलंच!

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.