भारतात मिस वर्ल्ड स्पर्धा घेण्याच्या हट्टापायी बच्चनचा पुरता बाजार उठला होता

भारताची हरनाज संधू आज ७० वी मिस युनिव्हर्स ठरली. २१ वर्षानंतर हरनाज संधूच्या रुपात मिस युनिव्हर्सचा किताब भारताला मिळाला आहे. हरनाज संधूला धरुन आजवर आपल्याला, म्हणजे भारताला  तीन वेळा मिस युनिव्हर्स हा किताब जिंकता आला आहे. 

या सगळ्या रेट्यात एक प्रश्न पडतो तो म्हणजे भारतात या स्पर्धा का होत नाहीत. माझी आज्जी बाजूलाच बसली होती. साधारण बच्चनच्या वयाची असेल ती. ती म्हंटली,

अरे आपल्याकडे झाली होती एक मिस वर्ल्डची स्पर्धा, पण यात बच्चन देशोधडीला लागला होता.

मग फ्लॅशबॅक मधला हा किस्सा सापडला.   

तर ही गोष्ट सुरु होते नव्वदच्या दशकात. तेव्हा सिनेमात शाहरुख, सलमान, आमीर ही ताज्या दमाची खान मंडळी आली होती. महानायक असणाऱ्या बच्चनचं वय उतरणीला लागलं होतं. त्याला मिळणाऱ्या पिक्चरचा ओघ आटत चालला होता. जे सिनेमे रिलीज होत होते त्याला पूर्वी प्रमाणे प्रतिसाद नव्हता.

दोस्त असणाऱ्या राजीव गांधीच्या मदतीने राजकारणात हात मारून झाला पण तिथे डाळ शिजली नव्हती.

अखेर बच्चनने सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. यापूर्वी जया बच्चन यांनी देख भाई देख सारखी सिरीयल प्रोड्यूस केली होती याचा अनुभव होता.  १९९५ साली वेगळी प्रोडक्शन कंपनी स्थापन केली,

“अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड उर्फ ABCL”

फिल्म प्रोडक्शन आणि इवेन्ट मॅनेजमेंट करणारी ही कंपनी होती. पहिल्याच वर्षी कंपनीने पंधरा कोटींचा फायदा ही कमावला. अमिताभने या कंपनीसाठी लोकांकडून वा बँकेंकडून पैसे उचलले होते. अर्शद वारसी, चंद्रचूडला लॉंच करणारा तेरे मेरे सपने बनवला. तो ठीक चालला.

सुरवातीला मिळत असलेले यश बघून बच्चन साहेबांनी टीव्ही सिरीयल व इतर क्षेत्रात उडी मारली. बिगबी च सगळच काम ग्रँड असते. याच ओव्हर कॉन्फीडन्समध्ये त्यांनी १९९६ साली मिस वर्ल्ड ही स्पर्धा आयोजित करण्याचे शिवधनुष्य उचललं.

आपल्या नावाप्रमाणे बच्चनने हा सोहळा सुद्धा अतिशय भव्यदिव्य झगमगाटात पार पाडला. पण दुर्दैव म्हणजे हा बच्चनच्या आयुष्यातला सर्वात मोठा फ्लॉप शो ठरला.

त्याच झालं असं होतं की,

१९९६ ला मिस वर्ल्ड ब्युटी कॉन्टेस्ट होणार होती. ती भारतात व्हावी यासाठी बच्चन प्रयत्न करु लागला. आणि त्यातल्या त्यात हा शो एकदम झगमगीत व्हावा यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची तयारी आयोजकांना दाखवली. बच्चन वारेमाप पैसे उधळणार म्हंटल्यावर आयोजक पण खुश झाले. त्यांनी हे कंत्राट अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड उर्फ ABCL ला दिलं.

मिस वर्ल्ड सपर्धा आता भारतात होणार या मथळ्याच्या बातम्या छापून यायला लागल्या. स्पर्धा बेंगलोर मध्ये पार पडणार होती. हि स्पर्धा भारतात आयोजित होणार म्हणून काही समाजसेवी संस्था आंदोलन करायला लागल्या. त्यांच्या मते हि स्पर्धा भारतात झाली तर भारतीय संस्कृतीला धोका निर्माण होऊ शकतो.

झालं इथूनच ही स्पर्धा वादात सापडायला लागली. आणि बच्चनचा बाजार उठायला सुरुवात झाली. 

या स्पर्धेसाठी जानेवारी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने कॅनरा बँकेकडे १४ कोटी रुपयांचं कर्ज मागितलं होतं. पण ते फेडता न आल्यामुळे त्यांनी अलाहाबाद बँकेतून ८ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. एवढे पैसे घेऊन ही बच्चन सध्या कामगारांची उधारी भागवू शकला नाही. 

शेवटी स्पर्धा डब्यात गेली. पण बच्चनच्या मागचं गंडांतर संपलं नाही. 

एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज काढायचं. हे करता करता कंपनी अजूनच तोट्यात आली इतकी की १९९९ मध्ये कंपनीचे दिवाळे निघालं.

देणेकरी बच्चन यांच्या घरी ऑफिस मध्ये रोज येऊ लागले त्यांचे पैसे मागू लागले. अमिताभ बच्चन यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. मिडिया, पेपर मधुन अमिताभ वर टीका होत होती. लोक महानायक अमिताभला वाटेल त्या भाषेत बोलत होते एकंदरीत तो काळ परीक्षा बघणारा होता. अमिताभ यांनी त्या काळात खूप अपमान सोसला तो निमूट पणे गिळला.

त्याचा सुप्रसिद्ध प्रतीक्षा बंगलासुद्धा कॅनरा बॅंकेच्या कर्जापायी जप्त होणार होता. प्रकरण कोर्टात हि गेले मुंबई हाय कोर्टाने अमिताभला स्वतःची मालमता विकण्याची परवानगी नाकारली. अमिताभ वर एकूण नव्वद कोटींचे कर्ज होते. अमिताभला अनेकांनी कंपनीचे दिवाळे घोषित करून मोकळा हो असा सल्ला दिला.

नेमक्या याच वेळी जेव्हा सगळ जग अमिताभच्या विरोधात होतं तेव्हा एकटा अमरसिंग नावाचं व्यक्ती त्याच्या सोबत उभा राहिला. एका मुलाखतीमध्ये बच्चन म्हणतो,

जर अमरसिंग नसता तर मला कर्ज फेडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

अमरसिंगनी त्याला आर्थिक मदत मिळवून दिली की नाही माहित नाही पण बच्चनला आत्मविश्वास परत मिळवून दिला. पुन्हा कधी बच्चन या स्पर्धा घेण्याच्या नादाला लागले नाहीत. पण एकमात्र विशेष त्या स्पर्धेत जज असणारी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रॉय मात्र सून करुन आणली. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.