अमिताभने जया यांना वचन दिलेलं रेखासोबत कधीच पिक्चर करणार नाही, मग सिलसिला कसा आला ?
रेखा… हे नाव ऐकलं की आठवते ती नखशिखांत सुंदरी. त्यांचं सौंदर्य, डोळ्यातून दिसणारी अदा, शुभ्र पांढरी साडी, भरगच्च दागिने अशा अवतारात कायम दिसणारी ही अभिनेत्री. रेखा यांच्या वाढदिवशी त्यांच्या एकूण सिनेमांचा विचार केला तर काही मोजके सिनेमे ठळकपणे लक्षात राहतात. त्यातला एक म्हणजे सिलसिला.
अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा तशी नवीन नाही.
यांच्या प्रेमप्रकरणाला जया बच्चन यांचा असणारा विरोधही कधी लपला नाही. यातच याआधी कधीच समोर समोर न आलेले हे तिघे सिलसिला सिनेमात एकत्र बघायला मिळाले होते. आता त्यांना एकत्र कसं आणलं? आणि नेमका सिलसिला सिनेमा कसा घडला यावरच आज आपण चर्चा करणार आहोत.
सिलसिला सिनेमा आला १९८१ मध्ये जेव्हा रेखा त्यांच्या करिअरच्या मोठ्या शिखरावर होत्या. इजाजत, घर, खूबसूरत सारखे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करणाऱ्या रेखा यांचा एकूणच सिनेमाकडे बघायचा दृष्टिकोन बदलत होता. त्याच काळात एकीकडे अमिताभ बच्चन यांचे ८० च्या काळातले सिनेमे राम बलराम आणि दो और दो पांच सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते.
आणि सिनेमा इंडस्ट्रीतील सेलिब्रेटेड फिल्ममेकर यश चोप्रा यांना सुद्धा करिअरचा वाईट काळ अनुभवावा लागत होता. अमिताभ बच्चनची भूमिका असलेल्या त्यांच्या काला पत्थर सिनेमाने सुद्धा चांगली कामगिरी केली नव्हती. या सिनेमाच्या अपयशाने यश चोप्रा बरेच दुखावले होते. त्यांच्या पुढच्या सिनेमात त्यांना आधीपेक्षा काहीतरी वेगळं आणि विलक्षण द्यायचं होतं आणि तेव्हाच जन्माला आला ‘सिलसिला’.
सिलसिला सिनेमा होता ‘पती, पत्नी आणि ती’ चा.
कथेला साजेशी रियल लाईफ घटना तेव्हा इंडस्ट्रीमध्ये सुरु होती. अमिताभ बच्चन यांनी तात्काळ सिनेमाला होकार दिला. पण यश चोप्रा यांचे सिलसिला साठीचे मनसुबे बरेच मोठे होते. त्यांना प्रेयसीच्या भूमिकेसाठी रेखाला कास्ट करायचं होतं आणि तशी इच्छा त्यांनी अमिताभकडे बोलून दाखवली.
अमिताभने जयाला दिलेलं वचन मोडत होकार दिला. वचन होतं रेखासोबत कधीच काम न करण्याचं. त्या काळात सिनेमाच्या या कास्टने अगदी कमी वेळात लक्ष वेधून घेतलं आणि सगळीकडेच हा एक चर्चेचा विषय झाला.
त्या दरम्यान जया बच्चन सिनेमा सोडून संसार आणि घर एवढ्या विश्वात रममाण होत्या. त्यांची दोन गोंडस मुलं आणि घर संसार याकडे लक्ष असणाऱ्या जया यांची सिनेक्षेत्रात परत यायची लक्षणं दिसत नव्हती. एकीकडे अमिताभ रेखाच्या बातम्या पेपरमध्ये छापून येत होत्या तेव्हा जयाने अमिताभला दिलेल्या अल्टिमेटमवर काम करायला सुरुवात केली.
रेखासोबत कधीच काम न करण्याचं वचन जयाने अमिताभकडून घेतलं होतं. पण जर हे वचन मोडून अमिताभने एकही सिनेमा रेखासोबत केला तर जया सिनेमांकडे परत येईल असं अल्टिमेटम जयाने दिलं होत. त्यानुसार नुसतं हातावर हात ठेऊन बसून न राहता जयाने आपल्या कमबॅकची तयारी सुरु केली.
पण सिलिसलाची कास्ट एवढ्यात ठरली आणि सगळ सुरळीत झालं असं अजिबात नव्हतं. त्यादरम्यान अमिताभच्या लावारीस सिनेमाचं शूट नटराज स्टुडिओमध्ये सुरु होतं. दरम्यान अमिताभ आणि नव्या इराणी अभिनेत्री नेली यांच्यातली मैत्री गॉसिपचा विषय ठरत होता.
अमिताभ आणि रेखा यांचे संबंध खराब व्हायचं कारण सुद्धा त्यांची ही मैत्री आहे असं सांगितलं जातं. त्यावेळी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी सेटवर अमिताभ आणि रेखा यांची झालेली भेट याबद्दल पुस्तकात सांगितलं आहे. रेखाने अश्रू सुद्धा ढाळले. पुढे अमिताभने रेखावर हात उचलल्याचा किस्सा सुद्धा रंगला. हा सगळं प्रकार एका अर्थी सिलसिला साठी घातक ठरला.
रेखाने सिनेमातून काढता पाय घेत सायनिंग अमाऊंट सुद्धा परत केली. आता यश चोप्रांकडे होता फक्त एक बुलंद अभिनेता आणि तगडी स्क्रिप्ट. सिनेमासाठी लीड अभिनेत्री शोधायला सुरवात झाली आणि पद्मिनी कोल्हापुरे, पूनम धिल्लो अशी नाव समोर येऊ लागली.
शेवटी यश चोप्रांनी रेखाच्या ऐवजी त्या भूमिकेसाठी परवीन बाबींना फायनल केलं आणि पत्नीच्या रोलसाठी स्मिता पाटीलची वर्णी लागली. शूटिंगच शेड्युल श्रीनगरला ठरलं. पण इथे अजूनही यश चोप्रांना स्वस्थ बसवत नव्हतं. सिनेमाचं कास्टिंग त्यांच्या मनात भरत नव्हतं. सिनेमात ना सेलिंग पॉईंट होता ना प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी कास्ट.
राहून राहून त्यांचं मन खात होतं आणि शेवटी यश अमिताभची भेट घ्यायला श्रीनगरला पोचले. तेव्हा अमिताभच्या कालिया सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी रात्री जेवणानंतर अमिताभ आणि यश यांच्यात सिनेमाच्या कास्टिंगवरून चर्चा झाली. यश चोप्रा यांच्या आयकॉनिक मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.
अमिताभनी फिल्मचं कास्टिंग ठीक वाटतंय का? तू खुश आहेस का असं यश यांना विचारलं. यश यांनी ते खुश नसल्याचं सांगितलं आणि सिनेमाचं परफेक्ट कास्टिंग काय आहे याचा खुलासा केला. अर्थात ते कास्टिंग होतं अमिताभ जया आणि रेखा. आणि हे कास्टिंग आत्ता जमवून आणण सोपं नव्हतं. हिंदी सिनेमात पहिल्यांदाच विवाहबाह्य संबंधांवर सिनेमा येणार होता आणि तो दणक्यात होण्यासाठी याच कास्टची गरज होती.
जया बच्चन सिनेमाच्या कथेने फारशा खुश नव्हत्या.
पण सिनेमाचा क्लायमॅक्स सीन ऐकून त्यांनी सिनेमा करायला होकार दिला. सिनेमाच्या शेवटी जयाचं पात्र हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलं असतं. त्याचवेळी आपल्या प्रेयसीला सोडून अमिताभ बायकोकडे परत येतो आणि प्रेम आणि नात्यातला विश्वास यांचा विजय होतो या एका सीनमुळे जया यांना सिनेमासाठी मनवण सोपं गेलं.
नेलीचा विषय सुद्धा संपुष्टात आल्याने रेखानी सहज काही महिने सिलसिलाच्या शूटिंगसाठी दिले. त्यांच्या इतर सिनेमांवर यांचा बराच परिणाम झाला पण त्यांच्या इतर सिनेमांऐवजी त्यांनी सिलसिला ला जास्त प्राधान्य दिलं.
एक ना अनेक संकटाना सामोरं जात सिलसिलाच शूटिंग सुरु झालं.
कोणत्याही गाजावाजाशिवाय अत्यंत शांत वातावरणात शूटिंग सुरु झालं. सेटवर दोघीना एकमेकींपासून लांब ठेवायचे प्रयत्न सुरु होते. यश चोप्रा यांना सिनेमाच्या वेळी प्रचंड टेन्शन आलं होतं. कारण पहिल्यांदाच रियल लाईफमधली कथा आणि तीच पात्र रील लाईफमध्ये एकत्र दिसणार होती. शूटिंगमध्ये एकमेकांना टाळणं, एकमेकांच्या एंट्री एक्झिटच्या वेळेनुसार येणं जाणं हे सगळं सुरु होतं.
कधी तिघांना चुकून एकत्र बसायची वेळ आलीच तर अनभिज्ञ असल्यासारखं ओळख न दाखवता बसणं असं सुरु असतानाही सिनेमा बघताना कोणाचंही काम उन्नीस बीस वाटत नाही.
अशा एक ना अनेक किस्स्यांनी भरलेला हा सिनेमा होता. अत्यंत कॉंट्रोव्हर्शियल कास्ट, आपापसातले रुसवे फुगवे, प्रेमप्रकरण अशा खूप कारणांनी तेव्हा हा सिनेमा गाजला होता. रेखा आणि अमिताभ यांचा एकत्र असलेला शेवटचा सिनेमा या कारणांनी चर्चेत राहिला.
हे ही वाच भिडू
- ‘मौका सभी को मिलता है’ शिकवणाऱ्या प्रवीण तांबेची खरी स्टोरी पिक्चर इतकीच भारी आहे…
- बॉलिवूडमध्ये असाही पिक्चर होऊन गेलाय जिथं सेटवर हिरॉईन हिरोला अंकल म्हणायची…
- RRR की Kashmir Files वाद नंतरचा, आधी भारतातून ऑस्करसाठी पिक्चर सिलेक्ट व्हायची प्रोसेस बघा