एकेकाळी मुलायमांना नडणाऱ्या IPS च्या घराबाहेर पाटी लागलीय ‘ जबरिया रिटायर्ड ‘

२०१५ मधील क्रिकेटचा वर्ल्डकप. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मॅच सुरु होती. यात शेवटी जेव्हा निकाल लागला तेव्हा ऑस्ट्रेलिया ९५ रन्स हरली होती. यानंतर एका भारतीय चाहत्यानं कॅप्टन म्हणून धोनीला १००० रुपयांचा चेक पाठवला होता, आणि एक नोट देखील होती. ज्याच्यावर लिहिलं होतं,

मैच हारने के लिए धन्यवाद।

हा चेक आणि नोट पाठवणार कोणी साधा माणूस नव्हता तर उत्तरप्रदेश मधील एक डॅशिंग आणि दबंग आयपीएस ऑफिसर होता.  जो त्यावेळी या गोष्टीसाठी तर चर्चेत होताच. पण त्या ऑफिसरला त्यावेळी ओळखलं जायचं ते थेट राज्याचे जेष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांना भिडणारा पोलीस म्हणून.

त्या अधिकाऱ्याचं नाव म्हणजे अमिताभ ठाकूर. 

स्पष्टवक्ते असलेले हेच ठाकूर आता मागच्या २ दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. सध्या  सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय. त्यात ते आपल्या घरासमोरील नेम प्लेट जवळ उभा राहिलेले दिसत आहेत. त्या नेम प्लेटवर एक कागद चिटकवलेला आहे. त्यावर लिहिलंय,

अमिताभ ठाकूर, आयपीएस, जबरिया रिटायर्ड.

लखनौच्या गोमतीनगरमध्ये असलेल्या घरासमोरील नेमप्लेट वर त्यांनी जबरिया रिटायर्ड अशी उपाधी लावून घेतली आहे.

पण असं का?

तर त्याच झालं असं की,

दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशच्या गृहमंत्रालयातर्फे एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. या जारी केलेल्या पत्रकात अमिताभ ठाकूर यांच्या निवृत्तीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यात भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या दिनांक १७ च्या आदेशानुसार म्हंटलं आहे की,

आयपीएस अमिताभ ठाकूर यांना सेवानिवृत्त कालावधीच्या अगोदर सेवानिवृत्त केलं जात आहे. त्यांना जनहितार्थ सेवेत कायम ठेवणं योग्य नाही. जनतेच्या हिताच्या दृष्टीनं निवृत्त कालावधी पूर्ण होण्यापूर्वी अमिताभ ठाकुरांना निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

SAVE 20210328 013902

याच पत्रकानुसार अमिताभ ठाकुर यांच्यासोबत आणखी दोन आयपीएस अधिकाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं आज. केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानंतरचं राज्य सरकारनं हे पाऊल उचलण्यात आल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. अमिताभ यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत होता.

अमिताभ यांची आता पर्यंतची कारकीर्द पाहिली तर तशी वादळीच होती. 

१९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या ठाकूर यांनी आतापर्यंत देवरिया, बलिया, महाराजगंज, गोंडा, ललितपुर आणि फिरोजाबाद या ठिकाणी काम पाहिलं आहे.

ते सगळ्यात पहिल्यांदा चर्चेत आले ते २००६ साली. तेव्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते मुलायमसिंग यादव. त्यावेळी अमिताभ फिरोजाबादचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करत होते. त्यावेळीच मुलायमसिंग आणि अमिताभ यांच्यात बिनसलं होतं.

अमिताभ ठाकूर यांच्या कारकिर्दीत त्यांना मोठ्या जिल्ह्यात पोस्टिंग मिळाले नव्हते, याच मुद्द्यावरून अमिताभ आणि मुलायमसिंग यांच्यात वितुष्ट आलं होतं. त्यामुळे त्यांना सतत बदल्यांना देखील सामोरं जावं लागलं होतं.

तसा विचार केला तर २००६ ते २०१० हे काळ अमिताभ ठाकुरांसाठी यांच्यासाठी काहीसा वाईटच ठरला होता. मुलायमसिंगांशी पंगा आणि त्यामुळे झालेली बदली. त्याच वेळी शस्त्र लायसन्स फसवणूक प्रकरणात देखील त्यांचं नाव आलं. त्यामुळे त्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावं लागलं. या सगळ्या भानगडीत अमिताभ यांचं प्रमोशन झालंच नाही.

२०१० साली अमिताभ यांना डीआयजी पदावरून आयजी पदावर बढती मिळणार होती. मात्र, मायावतींच्या राजवटीत अमिताभ यांच्या प्रमोशन मिळालचं नाही.

अखेरीस तब्बल ३ वर्षांनी अखिलेश यादवांनी अमिताभ यांना आयजीसाठी प्रमोट केलं.

मात्र पुन्हा २०१५ साली अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना अमिताभ चर्चेत आले. त्यांनी मुलायमसिंग यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला होता. ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसारित करत त्यांनी हा आरोप केला होता. या टेपमध्ये अमिताभ यांना मुलायमसिंग धमकी देताना स्पष्ट ऐकू येतं होतं.

पण अमिताभ यांनी कॉल रेकॉर्डिंग प्रसारित केल्या नंतर त्यांच्यावर लगेचच एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला. संकट इतक्यातच टळलं नाही तर यामुळे अखिलेश सरकारनं अमिताभ यांच्यावर गुन्हा दाखल करत निलंबित केलं होतं. कैक बेकायदेशीर कामात सहभाग असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.

त्यामुळे त्यांना नेहमीच न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागायच्या.

शिवाय अमिताभ ठाकुर यांची बेहिशेबी मालमत्ता हा मुद्दा देखील त्यांच्या निवृत्तीस कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. म्हणूनचं योगी सरकारनं भ्रष्टाचार मुक्तीचं कारण देत त्यांना डच्चू दिला असल्याचं दिसून येत आहे.

मध्यंतरी गाजलेल्या विकास दुबे एनकाउंटर प्रकरण घडण्याआधीच त्यांनी भविष्यवाणी केली होती कि त्याचा एनकाउंटर होणार आहे.

अमिताभ कवी आणि लेखक देखील आहेत. सोशल मीडियावर ते प्रचंड ऍक्टिव्ह असतात. त्यांनी आजपर्यंत उत्तरप्रदेशातल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विद्यमान सरकारवर देखील सडकून टीका केली आहे. त्यांच्या कारभारावर जाहीर ताशेरे ओढले आहेत.

सेवानिवृत्ती दिल्यानंतर अमिताभ यांनी आपण आपला पदभार सोडला असल्याचं ट्विट केलं आहे. सरकारी गाडी, ड्रायव्हर ऑफिसला पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.