राजीव गांधीनी ऐनवेळी कपडे दिल्याने वाचली अमिताभ ची इज्जत !

भारतीय सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन रुपेरी पडद्यावर हरतऱ्हेच्या भूमिका करून रसिकांचे मनोरंजन केले. १९७३ सालच्या ‘जंजीर’ या चित्रपटापासून त्यांचा बोलबाला सुरू झाला. यापूर्वी देखील ऋषिकेश मुखर्जी यांच्या आनंद या चित्रपटात त्यांनी ‘बाबू मोशाय’ च्या भूमिकेतून रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.

मोठ्या संघर्षानंतर त्यांनी या सुपरस्टार पदापर्यंत मजल मारली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झालेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे मित्र राजीव गांधी यांनी त्यांना राजकारणात येण्याची विनंती केली. 

अमिताभ ने राजीव गांधीच्या विनंतीला मान देऊन राजकारणामध्ये प्रवेश केला. 

त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव करून अलाहाबाद ची निवडणूक जिंकली. राजकारणामध्ये मात्र अमिताभ बच्चन जास्त रमले नाहीत. बोफोर्स प्रकरणानंतर त्यांच्या मध्ये आणि राजीव गांधी मध्ये काहीसे मतभेद निर्माण झाले. 

२० मे १९९१ रोजी झालेल्या राजीव गांधीच्या हत्येनंतर मात्र अमिताभ बच्चन राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त झाले. 

या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से राजकारणात आणि समाजकारणात आजही लोकप्रिय आहेत. त्यातीलच हा एक किस्सा. राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी Indian Airlines मध्ये पायलट म्हणून कार्यरत होते. बच्चन आणि गांधी परिवार यांना यांच्यातील संबंध खूप जुने आणि गहिरे होते. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन ख्यातनाम कवी होते. 

१९७६ साली हरीवंशराय बच्चन यांना भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला. 

बच्चन कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. सर्वजण हा पुरस्कार सोहळा समारंभासाठी दिल्ली ला जायला उत्सुक होते. परंतु या शासकीय कार्यक्रमात पुरस्कार्थी सोबत फक्त दोघांना प्रवेश होता. घरात भरपूर चर्चा झाल्यानंतर हरिवंश राय बच्चन यांच्यासोबत त्यांचे दोन सुपुत्र अमिताभ आणि अजिताभ यांनी मुख्य कार्यक्रमाला जायचे ठरले.

शाही समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी बच्चन पिता पुत्रांनी ब्लॅक कलरचे सूट शिवून घ्यायचे ठरले.

त्यासाठी मुंबईतील नामचीन बड्या टेलर ना घरी बोलावण्यात आले. उंची कापड खरेदी करण्यात आले, आणि तिघांसाठी ही शानदार तीन सूट शिवण्यात आले. या तिघांच्या ही दिल्ली ला जाण्याच्या प्रवासाच्या पॅकिंग ची जबाबदारी जया भादुरी यांनी उचलली. तिने तिघांसाठी ही तीन वेगळ्या सुटकेस तयार केल्या.

दिल्लीला जाण्याचा दिवस उजाडला. फ्लाइट संध्याकाळी होते. परंतु त्या दिवशी सकाळी अचानक अजिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांनी स्वतःचे दिल्ली ला जायचे रद्द केले. आता या समारंभासाठी फक्त हरिवंशराय बच्चन आणि अमिताभ बच्चन हे दोघेच जाणार होते. त्याप्रमाणे दोघेही फ्लाईटने दिल्लीला पोहोचले. रात्री हॉटेलवर उतरले. समारंभ सकाळी ११ वाजता होता.

राष्ट्रपती फक्रुद्दीन आली अहमद यांच्या हस्ते हरीवंशराय बच्चन यांना पद्मभूषण पुरस्कार मिळणार होता.

हे दोघे सकाळी लवकर उठून तयार होऊ लागले. अमिताभ बच्चन यांनी आपली सूटकेस उघडली आणि डोक्यावर हात मारून घेतला !! कारण जया भादुरी घाईगडबडीत अजिताभ बच्चन यांची सूटकेस त्यांच्यासोबत दिली होती. अजिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या उंचीमध्ये बराच फरक असल्याने त्यांचे कपडे अमिताभला येणे शक्यच नव्हते. 

आता ऐन वेळेला कोणते कपडे घालायचे? हा प्रश्न अमिताभ बच्चन यांच्या समोर पडला.

 इतक्या कमी वेळात मुंबईहून कपडे मागवणे शक्य नव्हते किंवा दिल्लीच्या मार्केटमध्ये जाऊन नवीन कपडे खरेदी करणे शक्य नव्हते. काय करावे? अशावेळी अमिताभला आठवण झाली आपल्या मित्राची राजीव गांधी यांची! त्याने लगेच राजीव गांधी यांच्या घरी फोन लावला. सुदैवाने राजीव गांधी त्या दिवशी भारतातच होते आणि घरी देखील होते. 

अमिताभने सर्व प्रकार त्यांना समजून सांगितला. राजीव गांधी शांत म्हणाले “काही काळजी करू नका. मी ताबडतोब तुम्हाला कपडे पाठवण्याची व्यवस्था करतो.”  राजीव गांधी ला आपल्या मित्राची उंची आणि बांधा माहित असल्याने त्याच्या मापाचे होतील असे कुर्ता पायजमा आणि शाल त्यांच्याकडे पाठवले.

अमिताभ बच्चन या शाही समारंभाला राजीव गांधी यांनी पाठवलेले कपडे परिधान करून गेले. 

“राजीव गांधी यांनी वेळेत कपडे पाठविल्याने मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो” अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये हा अनुभव लिहिताना आपल्या मित्रांचे आभार देखील मानले. 

धनंजय कुलकर्णी ( लेखक हे सिनेअभ्यासक व लेखक आहेत) 

dskul21@gmail.com

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.