अंडरवर्ल्डचा अमजद खान, याच्या हत्येचा बदला म्हणून शर्मांनी राजनची निम्मी गॅंग संपवली..

मुंबई अंडरवर्ल्ड आणि त्यातील गुंड, त्यांच्याबरोबर पोलिसांच्या होणाऱ्या चकमकी असे अनेक उदाहरण होऊन गेलेत. पोलिसांना टोळ्यांच्या मुक्कामाची टीप देणारे, गुन्हेगारांना पोलीस आले म्हणून टीप देऊन सगळा माल यशस्वीपणे पळवून नेणारे अशा हेरांमुळे अनेक लोकांना बरेच पैसे छापता आले आणि बऱ्याचदा पोलिसांना गुन्हेगार तावडीत सापडत असे.

आजचा किस्सा सुद्धा असाच आहे. कामाचा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेला अमजद खान हा भुरटा चोर म्हणून प्रसिद्ध झाला खरा पण पुढे त्याला पकडण्यासाठी भरभक्कम किंमत जाहीर झाली. नक्की हे अमजद खानचं प्रकरण काय होतं ते बघूया.

अमजद खान हा शोलेमधला अमजद खानचाच डुप्लिकेट होता. सुरवातीच्या काळात त्याला पिच्चरमध्ये हिरो बनायचं होतं. पण चित्रपटात डाळ शिजली नाही म्हणून तो खऱ्या आयुष्यात तो अमजद खान सारखा वागायचा. खुनशी नजर, तिरकस हास्य बोलण्याची आणि चालण्याची पद्धत सगळी अमजद खान सारखी. तो अमजद खानसारखा दिसत नसला तरी त्याला बघून अमजद खानची आठवण व्हायची.

आता हा अमजद खान मुळातच हुशार होता. एका घटनेत मादक पदार्थांच्या विक्रीबद्दल त्याला अटक झाली आणि त्याच्यावर खटला भरला. पण हा अमजद खान इतका चालू माणूस की,

तुमच्यावर जर कोणी टोमॅटो फेकले तर तुम्ही त्याचा सॉस करा

अशी त्याची वृत्ती होती.

त्याच्यावर हा खटला चालू असतानाच तो पोलिसांना खबरा देऊ लागला आणि तो गुप्तपणे आपलं काम करू लागला. पोलिसांचा खबऱ्या अमजद खान आहे हे बऱ्याच गुन्हेगारांना माहिती नव्हतं. आपल्यावर भरलेल्या खटल्यातून आपण सुटू हे हि त्याला चांगल्या प्रकारे माहिती होतं.

अमजद  खानकडून मिळणाऱ्या खबरांवरून पोलिसांनी अनेक ठिकाणी छापा घालून मादक पदार्थांच्या थप्पीच्या थप्पी जप्त केल्या. याआधी पोलीस काहीच करत नसल्याने लोकांमध्ये रोष होता. पण अचानक या धडाकेबाज कारवायांमुळे पोलीस डिपार्टमेंट फॉर्मला आलं होतं.

अमजद खान हा गुन्हेगारी लिखाण करणाऱ्या लोकांसाठी मोठा माहितीचा खजिना होता. पत्रकार लोकांना अनेक महत्त्वाच्या खबरा अमजद खान द्यायचा. पोलीस आता  धाड टाकणार आहे अशी माहिती देऊन तो मादक पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांचं नुकसान होऊ न देण्यापासून वाचवायचा.

पण पोलीस कधीही अमजद खानने सांगितलेल्या ठिकाणी धाडी टाकून माल जमा करायचे यामुळे मादक पदार्थ विक्री करणारे व्यापारी त्याच्यावर चिडलेले  होते. पोलिसांमुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. त्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला कि अमजद खानला संपवायचं.

आता अमजद खानला संपविणे म्हणजे मोठं दिव्यचं होतं. आता अमजद खानला मारणार कोण ? असा पेच व्यापारी लोकांसमोर उभा राहिला. कारण अमजद खानची एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याशी अगदीच जवळची मैत्री होती. अमजद खान या गोष्टींचा जास्तीच फायदा उचलायचा. प्रदीप शर्मा हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट असल्याने अमजद खानच्या नादी लागत नसे.

अमजद खानला मारण्यासाठी या व्यापारी मंडळाने पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केले. पण प्रदीप शर्मांच्या भीतीने कोणीही पुढे येईना. शेवटी हि पाच लाख रक्कम पाच कोटींवर जाऊनही काही बदल घडला नाही. एका भुरट्या चोरावर इतकी रक्कम लागणे हेच मुळात अविश्वसनीय होतं. 

शेवटी हे सगळं व्यापारी मंडळ छोटा राजनकडे आलं. ५ कोटींची बातमी ऐकून तो उडालाच, कारण अशा चोरांना मारण्यासाठी ५-५ हजाराच्या सुपार्या असायच्या. राजनने हा विडा उचलला. आधीच प्रदीप शर्मांसोबत त्याचं बिनसलं होतं.

अमजद खानला ओळखायचं कसं ? तेव्हा राजनने पोलीस अधिकाऱ्यांपैकी एकाला हाताला धरलं. पैशाचं आमिष दाखवून तो अधिकारीही अमजद खान कोण आहे हे दाखवायला तयार झाला. १६ ऑक्टोबर २००६ रोजी मोटरसायकलहून आलेल्या तीन जणांनी अमजद खान आणि त्याचा साथीदार हिमांशू चौधरी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. 

अमजद खानच्या खुनामुळे पत्रकार, पोलीस, गुन्हेगार अशा सगळ्याच लोकांवर शोककळा पसरली होती. सगळे बारकावे माहिती असलेल्या अमजद खानचा गेम झाला होता, याचा प्रदीप शर्मांना मोठा धक्का बसला. कारण तो त्यांचा महत्वाचा माणूस होता.

अमजद खान मेल्याचा जितका धक्का प्रदीप शर्मांना बसला त्याहून त्यांना मोठा धक्का बसला कि छोटा राजनने त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. इथून मात्र प्रदीप शर्मांनी छोटा राजन टोळीची लांडगेतोड सुरु केली. राजनची अर्धी गॅंग शर्मांनी निकामी केली होती. 

पण या प्रकरणात अमजद खानचे गब्बरचे शोले प्रकरण हिट झाले होते. मामुली चोर ते पाच कोटींचा इनाम इतका जबरदस्त त्याचा प्रवास होता.

संदर्भ : भायखळा ते बँकॉक- हुसेन झैदी

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.