महागुरू किती पण क्रेडिट घेऊ देत शोलेला गब्बर सलीम खानमुळे मिळाला….

असे काही सिनेमे असतात ज्यांचा संबंध थेट आपल्या आयुष्याशी असतो. त्यातले हिरो आणि व्हिलन हे आपल्याला आपल्याच जवळचे लोकं वाटू लागतात. कधी कधी हिरोपेक्षा व्हिलन जास्त मार्केट खाऊन जातो तेव्हा आश्चर्य वाटतं, व्हिलन म्हणल्यावर त्याने हिरोकडून मार खाऊन घेणं आलं पण एखादा व्हिलन असा असतो जो हिरोला तर चोपतोच पण प्रेक्षकांच्या मनात आपली अशी जागा बनवतो की वर्ष लोटली जातात पण त्या व्हीलनची प्रतिमा पुसली जात नाही. असाच एक व्हिलन/ अभिनेता होता अमजद खान.

अमजद खान नसेल आठवत तर शोलेतला गब्बर….कितने आदमी थे ? विचारणारा किंवा आपल्या दहशतीच्या जोरावर बच्चन ,धर्मेंद्र यांनासुद्धा गार करणारा. पण शोलेत बच्चन , धर्मेंद्र पेक्षाही जास्त गब्बर गाजला. खुद्द बच्चनला सुद्धा हाच रोल करायचा होता.

आता या गब्बरचं क्रेडिट अनेकजण करतात. खुद्द आपले महागुरू सचिन पिळगावकर देखील यात आघाडीवर आहेत. ते शोलेच्या शुटिंगवेळी १७ वर्षांचे होते पण त्यांच्या म्हणण्यानुसार दिगदर्शक रमेश सिप्पी यांनी त्यांना काही सिन दिग्दर्शित करायला दिले होते. इतकंच नाही तर सचिन यांनीच अमजद खान यांच्या आवाजावर काम केलं होत, त्यांना गब्बरसाठी कसा आवाज हवा हे शिकवलं होतं.

आता खरं खोटं खुद्द सचिन पिळगावकरांना ठाऊक कारण अमजद खान तरी आता हयात नाहीत. पण आमच्या मते गब्बरचं खरं क्रेडिट त्याचे लेखक सलीम आणि जावेदलाच जात.

सलीम जावेद जोडीने शोलेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. या जोडीने अनेक हिट सिनेमे दिले होते. यातच होता शोले. या जोडगोळीने शोलेचं प्रत्येक पात्रं अगदी लक्ष देऊन लिहिलं होतं. या सिनेमाच्या कास्टिंगलासुद्धा बराच काळ लोटला होता. पण कास्टिंग करताना हिरोपेक्षाही जास्त चर्चा होती ती म्हणजे गब्बर सिंगची. पुढे हे पात्र गब्बर सिंगच्या वाट्याला आलं पण दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची पहिली पसंती दुसऱ्या एका अभिनेत्यास होती अगदी ऐन टायमाला अमजद खान प्रकटले आणि त्यांनी गब्बर अजरामर केला.

सिनेमा मोठा होता. स्टारकास्ट सुद्धा तगडी हवी होती. गब्बरचं पात्र घेऊन दिग्दर्शक रमेश सिप्पी गेले डॅनी डोंझोप्पा यांच्याकडे. पण डॅनी यांनी हा सिनेमा करण्यास नकार दिला. हे पात्रंसुद्धा त्यांना साकारायचं नव्हतं. खरंतर डॅनी तेव्हा धर्मात्मा या सिनेमाचं शूटिंग करत होते आणि त्यासाठी त्यांना अफगाणिस्तानला जावं लागणार होतं. हे प्रकरण बघून रमेश सिप्पी नाराज झाले आणि निराश होऊन ते सलीम जावेदकडे आले.

सलीम खान यांनी त्याकाळी एक नाटक बघितलेलं होतं. त्या नाटकामध्ये सलीम खान यांचं लक्ष वेधून घेतलं कोणी तर अमजद खान यांनी. अमजद खान यांचे वडीलही सिनेमाशी निगडित मोठे व्हिलन होते तेव्हा सलीम खान यांनी अमजद खान यांना कास्ट करण्याचा निर्णय घेतला.

एका सकाळी आपल्या घराच्या आसपासच्या परिसरात सलीम खान पाय मोकळे करत होते. त्याचवेळी त्यांना अमजद खान दिसला. सलीम खान यांनी अमजद खान यांना हालहवाल विचारला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये बोलावलं. दुसरा दिवस उजाडला, अमजद खान यांना घेऊन सलीम जावेद पोहचले थेट रमेश सिप्पी यांच्या ऑफिसमध्ये. यावेळी रमेश सिप्पी यांनी तात्काळ अमजद खान यांना गब्बरसाठी फायनल केलं.

सिनेमाची रिहर्सल सुरू झाली पण अमजद खान यांचा आवाज पात्राला सूट होईना. अजून एक समस्या निर्माण झाली. पण रमेश सिप्पी यांना त्या पात्रावर विश्वास होता. अमजद खान यांनी स्वतःवर काम करून सिनेमा हिट केला नव्हे तर अजरामर केला. याच काळात अमजद खान यांना कोणीतरी सांगितलं होतं की सलीम जावेद या जोडगोळीने तुला गब्बरच्या पात्रासाठी नाकारलं होतं पण काहीही न बोलता अमजद खान यांनी सिनेमा केला. सिनेमा गाजला पण सलीम जावेद जोडीसोबत अमजद खान यांनी परत कधी काम केलं नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.