विमानाला अपघात होईल म्हणून तो कारने गेला तरिही जे व्हायचं ते झालच..
शोले मध्ये अमजद खानचा गब्बरसिंग आपल्या साथीदारांकडे डोळ्यातून आग ओकून बघत हा डायलॉग म्हणतो. पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याचा जरब दाखवून द्यायला हा प्रसंग बस होता.
“जो डर गया समझो मर गया. “
शोले येण्यापूर्वी अमजद खान ची ओळख जेष्ठ अभिनेते जयंत यांचा मुलगा अशी होती. काही छोट्या मोठ्या चित्रपटात त्याने काम केलं होतं. खरं तर शोलेच्या गब्बरसिंगचा पहिला चॉईस तो नव्हता. त्याच्या आधी डॅनी हा रोल करणार होता. पण फिरोज खानच्या धर्मात्मा या सिनेमाच्या शुटींग साठी त्याने हा रोल सोडला .
संजीवकुमार, सलीम-जावेद यांच्या सांगण्यावरून अमजद खानच ऐनवेळी गब्बरसाठी सिलेक्शन झालं.
शोलेच शुटींग बेंगलोरच्या जवळच्या एका गावात होणार होतं. लवकरात लवकर बेंगलोरला पोहचण्यासाठी अमजद विमानाने निघाला. पण अचानक विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाला परत एअरपोर्टवर उतरवण्यात आलं. अमजद खानला खूप टेन्शन आलं. आता या विमानाने जावं की नको?
आता गेलं नाही तर शोलेमधला रोल ही जाणार याची त्याला खात्री होती. शेवटी मनाचा हिय्या करून त्याच विमानाने तो निघाला. विमान सुखरूप बेंगलोरला लँड झालं. शोलेचं शुटींग बरोबर वेळेत सुरु झाल.
थंड डोक्याचा क्रूर डाकू गब्बरच्या भूमिकेत अमजद चपखल बसला. शोलेनं इतिहास घडवला. अमिताभ ,धर्मेंद्र, संजीव कुमार असे मोठे मोठे सुपरस्टार असताना चर्चा फक्त गब्बरची झाली.
भारतीय फिल्मइंडस्ट्री मध्ये असा व्हिलन न कधी झालेला न कधी होईल असे मथळे सगळ्या पेपर मध्ये छापून आले. अमजद खानची आयुष्यभराची ओळख गब्बरसिंग झाली. भारतभरातल्या आया खरोखरच,
“चुपचाप सो जा नही तो गब्बरसिंग आ जाएगा“ असं सांगून आपल्या पोरांनी गप्प झोपवू लागल्या.
दहशतीचे दुसरे नाव गब्बरसिंग बनले.
सगळ्यांना धडकी भरवणाऱ्या अमजदला मात्र शोलेच्या शुटींगपासून विमानाचा फोबिया झाला. विमानप्रवासाची का कुणास ठाऊक त्याला खूप भीती बसली.
शोले नंतर अनेक मोठ्या मोठ्या सिनेमासाठी त्याला साईन करण्यात आले. यातच एक चित्रपट होता ” द ग्रेट गॅम्ब्ललर”. या पिक्चरचासुद्धा हिरो अमिताभ होता. दिग्दर्शक शक्ती सामंता यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट . शुटींग गोव्यामध्ये होणार होत. अमजद खानला विमानाचं तिकीट देण्यात आल.
तो निघणार तेवढ्यात एक बातमी आली की मुंबईहून मद्रासला निघालेल्या विमानाला भयंकर अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
आधीच अमजदला विमानाची भीती होती, त्याला तर धक्काच बसला. सरळ दिग्दर्शकाला सांगीतल की मी काही विमानाने येणार नाही. तिकीट रद्द करून तो स्वताच्या कारने गोव्याला निघाला.
पण माणसाच्या नशिबीच जर अपघात लिहिलेला असेल तर त्याच्यापासून सुटका कशी होणार?
बॉम्बे टू गोवा प्रवास करणाऱ्या अमजदला त्याचा प्रत्यय आला. सावंतवाडी जवळ ड्रायव्हरला विश्रांती देण्यासाठी त्याने स्टीयरिंग आपल्या हातात घेतली पण काही वेळातच एका झाडाला धडकून त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अमजद खान आणि त्याची सहा महिन्यांची गर्भवती पत्नी हे गंभीर जखमी झाले.
डॉक्टरनी त्याच्या बायकोला आणि बाळाला वाचवले. पण अमजद खानची दुखापत मोठी होती. त्याच्या तेरा बरगड्या तुटून त्याच्या फुफ्फुसामध्ये घुसल्या. अपघाताच्या भीतीने ज्या विमानाचं तिकीट त्यान रद्द केलं होत, ते विमान सुखरूपपणे गोव्यात उतरलं होत पण अमजद ऑपरेशन थिएटर मध्ये जीवन मरणाची लढाई लढत होता.
अतिशय अवघड अशा या त्याच्या शस्त्रक्रियेसाठी परवानगीची सही अमिताभने केली.
अमजदच ऑपरेशन यशस्वी झालं. पण त्याला कायमचं अधुत्व आलं. जेवणाखाण्यावरून बंधन आली, औषधामुळे वजन वाढलं. हळूहळू आतनं तो पोखरत गेला आणि त्यातच त्याचा अकाली मृत्यू झाला. ज्या अपघातापासून वाचण्यासाठी तो पळत होता त्या अपघातानं त्याला गाठलंच होत.
हे ही वाच भिडू.
- राज कपूरला शँम्पेनची बाटली उघडायची संधी न देताच मुकेश निघून गेला
- आणि स्मिता पाटील यांनी केलेली आपल्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली !
- करियअरची सुरवात एका अपमानापासूनच होते, किशोरकुमारचं देखील तसंच झालं !
- जाता-जाता मीना कुमारी पाकिजाला नवसंजीवनी देऊन गेली !