लिम्का बुक ऑफ द रेकॉर्डमध्ये डॉ. अमोल कोल्हेंच्या नावावर एका अजब विक्रमाची नोंद आहे..

सध्या जगभर आपण ब्रेथलेस सिंगिंगच्या नावाखाली अनेक गाणी ऐकतो. शंकर महादेवनने गायलेल्या ब्रेथलेस [ म्हणजे विना श्वास घेता गात राहणे ] गाण्याची बरीच चर्चा होते आणि अजूनही संगीत शौकीन लोकं आवर्जून टॉप बेस्ट गाण्यांमध्ये त्याचा उल्लेख करतात. पण हे गाणं ब्रेथलेस नव्हतं , ते एका दमात गायलेल नसल्याचं शंकर महादेवनने अनेक ठिकाणी सांगितलं आहे. पण मराठीत मात्र हा माईलस्टोन मराठी भाषेच्या दोन खंद्या शिलेदारांनी गाठला आणि थेट लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं होतं.

मराठीमध्ये कण्हेरीची फुले नावाचा अल्बम त्यावेळी सुरु होता. या अल्बममध्ये अभिवाचन आणि कवितावाचन असे दोन्ही प्रकार हाताळण्यात येणार होते. यासाठी अमोल कोल्हे आणि बेला शेंडे यांची निवड करण्यात आली होती. अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमाचं सुरवातीचं अभिवाचन ब्रेथलेस सादर करायचं आणि बेला शेंडे यांनी ब्रेथलेस गाणं गायचं.

हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. प्राजक्ता गव्हाणे यांनी या अल्बमचं लेखन दिग्दर्शन केलं होत आणि तेजस चव्हाण यांनी या अल्बमचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. मराठीमध्ये त्यावेळी ब्रेथलेस , एका दमात गाणी किंवा कविता सादर करण्याची संकल्पना आली नव्हती. यात गाणी ब्रेथलेस होती पण अभिवाचनही ब्रेथलेस व्हावं अशी आत दिग्दर्शिकेची होती.

ज्यावेळी अमोल कोल्हे या अभिवाचनासाठी निवडले गेले तेव्हा ते जास्त सिरीयस नव्हते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित वीर शिवाजी हि मालिका ते करत होते. पल्लेदार आणि मोठमोठ्या संवादाची त्यांना सवय होती म्हणून ते करणं सोपं जाईल असं त्यांना वाटत होत मात्र पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या लक्षात आलं कि हे अवघड काम दिसतंय. ते लिखाण बघून त्यांनी एक महिन्याचा वेळ मागून घेतला.

महिनाभर वेळ घेऊनही अमोल कोल्हेंची पूर्ण तयारी झालेली नव्हती. कारण वीर शिवाजी या मालिकेच्या चित्रीकरणामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. शेवटी तारीख फिक्स करून शूटिंग संपवून एक दिवस ते स्टुडिओमध्ये पोहचले. दिग्दर्शिका आणि संगीतकार हे जरा अमोल कोल्हेंविषयी साशंक होते कि दिवसभर शूटिंग करून आल्याने ते थकले होते आणि रात्री १२ वाजता हे अभिवाचन ते रेकॉर्ड करणार होते. पण ठामपणाने त्यांनी रेकॉर्डिंग केलं आणि ते अभिवाचन पूर्ण झालं.

हे अभिवाचन लिहिताना त्यात कुठलीही संख्या, मंत्र , लयबद्ध, तालबद्ध असं काहीही लेखिकेने लिहिलेलं नव्हतं. बारीक सारीक गोष्टींवर काम करत ते रेकॉर्डिंग पूर्ण झालं. १ मिनिट ३ सेकंड या वेळेत ते अभिवाचन अमोल कोल्हे यांनी ब्रेथलेस प्रकारात गायलं होत. सुरवातीला २४ सेकंदात ८५ शब्द त्यांनी म्हटले होते. 

ग्लोबलायझेशन आणि गावांमध्ये होणारा बदल यावर आधारित हे अभिवाचन होतं.

स्वातंत्र्याचा लढा झाला बापूजी म्हणाले खेड्याकडे चला ,

चला म्हणून तर गेले बापूजी पण फिरकणार कोण , फिरकली ती एसटी…..

अशा अभिवाचनाने अमोल कोल्हेंची सुरवात होती.

यानंतर गायिका बेला शेंडे यांनी गायलेलं ब्रेथलेस गायन हे अक्षरशः अंगावर काटा आणणारं होतं.

मन शहारे काहूर,

दूर देशी मी चालले,

वाट सोडू नये गावं,

आसू डोळ्यासया सांगे ….

अशी या ब्रेथलेस गाण्याची सुरवात होती.

अमोल कोल्हेंबरोबरच बेला शेंडे यांचं नावही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे.

सिनेमामध्ये रिटेक, कट वगैरे असतात पण सिनेमाच्या तुलनेत ब्रेथलेसमध्ये अगदीच सूक्ष्म कट असतात. हिंदी ब्रेथलेसच्या धर्तीवर आधारित मराठी भाषेतही ब्रेथलेस झालंय असं जेव्हा शंकर महादेवनला कळलं तेव्हा त्याने आवर्जून बेला शेंडे आणि अमोल कोल्हे यांचं कौतुक केलं.

 हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.