अमरावतीमध्ये ध्येयवेड्या वनरक्षकाच्या जिद्दीने भारताला पहिलं बांबू उद्यान दिलंय

सध्या भारतामध्ये इथेनॉल निर्मितीला खूप प्राधान्य दिल जातंय. पेट्रोलमध्ये २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल ब्लेंडींगचं लक्ष केंद्र सरकारनं ठेवलं आहे. यासाठी सरकार आधी ऊसापासून इथेनॉल निर्मितीच्या मागं लागलं होतं आणि आता बांबूच्या. बांबूपासून इथेनॉल निर्मिती करता येते म्हणून सरकार बांबू लागवडीला प्राधान्य देतंय. पण भारतामधील पहिलं बांबू उद्यान असल्याचा मान महाराष्ट्रानं आपल्या पदरात टाकून घेतलंय बरंका. आणि हे शक्य झालंय ते महाराष्ट्राचे बांबूमॅन सैयद सलीम अहमद यांच्यामुळे.

ही कथा आहे याच ध्येयवेड्या माणसाची आणि त्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या भारतातील पहिल्या बांबू उद्यानाची!

अमरावती शहराला लागून वन विभागाची वडाळी रोपवाटिका आहे. मात्र, वडाळी रोपवाटिका ते प्रसिद्ध बांबूउद्यान हा प्रवास थक्क करणारा आहे. अमरावती शहरालगत असलेला हा परिसर म्हणजे कुत्री आणि डुकरांची हक्काची जागा! इतकंच काय, तर शौकिनांचीही हक्काची पार्टी करण्याची जागा!

१९९३ उजाडला. एक वनरक्षक तिथं रुजू झाला अन्‌ हळूहळू या जागेचा कायापालट व्हायला सुरवात झाली.

तसं तर १९८४ मध्ये मेळघाटसारख्या दुर्गम भागात रुजू होऊन सेवा देणारा हा अवलिया. झाडांबद्दल विशेष प्रेम असल्याकारणाने त्यांनी वनविभागात काम करायचं ठरवलं. वेगवेगळ्या झाडांचं निरीक्षण करणं, त्यांची माहिती घेणं, रोपं लावणं आणि अगदी पोटच्या पोरासारखं त्यांना जपणं सैयद सलीम यांना नेहमीच आवडायचं. पण एकदा चीनमधील ‘अंजी बांबू गार्डन’ त्यांनी पाहिलं आणि भिडू भारावून गेला.

चीनच्या बांबू उद्यानाची भव्यता आणि जगभरातील पर्यटकांची ओसंडून वाहणारी गर्दी, बांबूचे साहित्य, उत्पादनं अशा गोष्टीमुळे त्यांची जिज्ञासा वाढली आणि इथंच त्यांना खरी प्रेरणा मिळाली.

यानंतर बांबुचं त्यांना वेडंच लागलं. त्यांनी देशभरातून आणि विदेशातून विशिष्ट बांबू प्रजातीचा शोध घेवून ज्ञान प्राप्त करायला सुरुवात केली. तेव्हा ते अमरावतीच्या वडाळी परिसरातील वनविभागाचे वनरक्षक  होते. याच चाळीस हेक्टर जागेवर त्यांनी बांबू लागवड करायला सुरुवात केली. एका एका प्रजातीच्या बांबूचं रोपटं शोधायला आणि ते मिळवायला त्यांनी जीवाचं रान केलं. त्यांच्या या कित्येक वर्षांच्या प्रयत्नांचं फळ म्हणजे आज भारतातील बांबूच्या ६३ पेक्षा जास्त प्रजाती एकट्या या बांबू उद्यानात पाहायला मिळतात.

सलीम यांच्या प्रयत्नांना आजवर अनेक वनाधिकार्‍यांनी साथ दिली खरी, पण काहींनी त्यांचे पायही ओढले. मात्र, तत्कालीन उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या कार्यकाळात या कामाला सुरवात झाली. बांबू नर्सरी ते बांबू उद्यान या प्रवासाला मूर्त रूप देण्यात उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांचाही मोलाचा वाटा आहे. सैयद सलीम यांनी एकत्रित केलेल्या बांबूच्या वनाचं २०१७ मध्ये ‘भारतातील पहिलं बाबू उद्यान’ म्हणून लोकार्पण करण्यात आलं.

सैयद अहमद यांच्या कामाची प्रशासनानं दखल घेतल्याचं उदाहरण म्हणजे २०१९ मध्ये  केरळ राज्यातील २२ प्रकारच्या बांबूची रोपं आणण्याची सैयद सलीम यांना इच्छा झाली. पण त्यांना ज्या प्रजातीची रोपं हवी होती ती जिवंत राहण्यासाठी कमी वेळेत आणनं गरजेचं होतं. सैयद सलीम यांनी त्यांची इच्छा आणि समस्या वनविभागाच्या वरिष्ठांजवळ व्यक्त केली. आपल्या भिडूच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर, त्यांच्या प्रतिभेवर विश्वास असल्यानं त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला गेला आणि मातीविरहित १ क्विंटल वजनाची ही रोपं चक्क विमानानं आणल्या गेली.  

जगातील ३५० प्रजातींपैकी आणि भारतातील १३४ प्रजातींपैकी एकट्या महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रजातींचं संगोपन करून त्या जगवणं खरोखरच ब्रह्मप्रयत्न म्हणावे लागतील!

बासरी तयार करण्याचा बांबू, रांगणारा बांबू, सर्वात उंच बांबू, सर्वात मोठा बांबू, काटेरी बांबू, लोणच्याचा आणि भाजीचा बांबू, फांदी नसलेला बांबू… असे एक ना अनेक प्रकार अगदी सुटसुटीत पद्धतीनं बांबू उद्यानात आपल्याला पाहायला मिळतात. बांबू उद्यानातील प्रत्येक प्रजातीवर शास्त्रीय नाव तसंच माहितीचे फलक लावले असल्यानं, प्रत्येक प्रजाती कशी वेगळी आहे, हे सहज लक्षात येतं. सैयद सलीम अहमद यांची चिकाटी यातून स्पष्ट होते.

हे उद्यान बघायला आज देश-विदेशातून शेकडो लोक हमखास हजेरी लावतात. आपल्या कल्पकतेला जोड देत सैयद सलीम यांनी बांबूपासून तयार केलेल्या कलाकृती लक्ष वेधून घेतात. बांबूच्या खेळणी, पाळणा, झुला, बोगदा पाहून लहान मुले तर सोडाच, अगदी मोठी मंडळीसुद्धा इथं खेळण्यात दंग होऊन जातात! हे बांबू उद्यान केवळ बांबू-प्रजातींचं संगोपन करणारंच उद्यान नसून हे बांबूचं संवर्धन, संशोधन आणि शिक्षण या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रसिद्ध समाजसेविका आणि अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी इथं भेटी दिल्या आहेत. हे उभारणाऱ्या बांबूमॅनची दखल घेत जागतिक वनदिवसानिमित्त देण्यात येणारा २०२० चा दिवंगत उत्तमराव पाटील स्मूती वनसंवर्धन ‌पुरस्कारही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी‌ यांचा हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

भविष्यात प्लॅस्टिक वापराला आळा घालण्याचंं सामर्थ्य केवळ बांबू या एकाच गवत प्रजातीत आहे. भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रवासात आणि भारताच्या अर्थकारणात सक्रिय बदल घडवण्यासाठी बांबू हा खर्‍या अर्थानं एक मैलाचा दगड ठरू शकतो, असं सैयद सलीम म्हणतात. फक्त आता त्या दृष्टीनं राजकीय आणि प्रशासकीय प्रयत्नांची गरज असल्याचं सलीम यांना वाटते. 

निसर्गासाठी आणि बांबू संवर्धनासाठी आपलं आयुष्य अर्पण करून महाराष्ट्राच्या या बांबूमॅननं इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.