३० तासांनी निकाल, गटबाजी…अमरावतीमध्ये नेमकं काय राजकारण झालं ?
नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. पण सगळ्यांनाच आतुरता होती ती अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची.
काल सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर झाला. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. तर भाजपचे रणजित पाटील यांचा पराभव झाला. अंतिम फेरीमध्ये धीरज लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मतं मिळालीत तर रणजित पाटलांना ४२ हजार ९६२ मतं मिळालीत.
पण अमरावतीच्या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मतमोजणीवरुन रंगलेलं राजकीय नाट्य, निकालाला लागलेला कमालीचा उशीर आणि काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांचं जिंकणं आणि रणजित पाटील यांचा पराभव. अमरावतीमध्ये असं काय घडलं कि भाजपचा पराभव झाला ? आणि निकालाला उशीर का लागला ? या सगळ्या गोष्टींचा सविस्तरपणे आढावा घेऊयात.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचं स्थानिक राजकारण काय आहे ?
या निवडणुकीत डॉ. रणजित पाटील आणि धीरज लिंगाडे असा थेट सामना दिसून आला तरी वंचितचे अनिल अमलकार, भाजपाचे बंडखोर उमेदवार शरद झांबरे, काँग्रेसचे बंडखोर श्याम प्रजापती, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात होते.
अमरावती पदवीधर मतदार संघावर सलग ३० वर्षे ‘नुटा’ या संघटनेचे वर्चस्व होते. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजित पाटील यांनी सलग पाच वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे बी टी देशमुख यांचा पराभव केला. त्यांनतर संघटनांची ताकद कमी होत गेली आणि राजकीय पक्षांचा प्रभाव वाढत गेला. गेल्या दशकभरात डॉ. रणजित पाटील सलग दोनवेळा इथे आमदार होते. पण यावेळेस त्यांचा पराभव झाला.
लिंगाडे यांची खेळी पाहिली तर,
शिवसेनेत उभी फूट पडून खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटासोबत गेले. शिंदे गट भाजपासोबत असल्याने ही जागा भाजपाकडेच राहणार असल्याचे निश्चित होते. मग धीरज लिंगाडेंनी काय हुशारी केली तर ते मूळ शिवसेनेत कायम राहून तिकिटासाठी आग्रही राहिले. या जागेविषयी महाविकास आघाडीतच घोळ सुरू होता. अखेर महाविकास आघाडीकडून अमरावती मतदार संघ हा काँग्रेसला सोडण्यात आला होता. मग लिंगाडेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, उमेदवारी मिळवली आणि जिंकून आले.
फडणवीसांची साथ असूनही भाजपच्या रणजीत पाटलांचा पराभव का झाला ? याची करणीमिमांसा करायची झाली तर,
- पहिलं कारण म्हणजे अमरावतीत झालेले सर्वांत कमी मतदान.
पाच जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या या मतदार संघात टोटल २ लाख ६ हजार १७२ मतदान असलं तरी अमरावती विभागात केवळ अर्धच म्हणजे ४९.६७ टक्के मतदान पार पडलं. मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेणारा भाजप हा एकमेव राजकीय पक्ष होता पण त्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात भाजपला यश आलं नाही.
दुसरं म्हणजे अरुण सरनाईक आणि वंचितच्या अनिल अंमलकार यांच्यामुळे रणजीत पाटलांना फटका सहन करावा लागला. अकोला- अमरावतीमध्ये वंचितचं बरचसं वर्चस्व आहे.
- तिसरं म्हणजे अकोल्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली राजी-नाराजी व अंतर्गत गटबाजी रणजित पाटलांचा टक्का घसरण्यासाठी कारणीभूत ठरली.
भाजपचे पदाधिकारी एकीकडे आणि रणजित पाटील एकीकडे अशी अकोल्याची स्थिती होती. रणजीत पाटलाचे कट्टर कार्यकर्ते शरद झांबरे हेच यावेळी रणजीत पाटलांच्या विरोधात अपक्ष उभारले होते. त्यातही फडणवीसांचा पाठींबा आपल्याला असल्याचं विधान शरद झांबरेंनी केल्याने भाजपमध्ये मतविभागणी झाली.अर्थात भाजपची जागा जाण्याचं प्रमुख कारण हे पक्षांतर्गत नाराजी असल्याचं सांगण्यात येतंय.
पण अमरावतीचा निकाल यायला उशीर का झाला ?
या मतमोजणीमध्ये पहिल्या पसंतीची मते पाहायची तर, धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० मतं आणि डॉ. रणजीत पाटील याना ४१ हजार २७ मतं होती. काल दुपारपर्यंत धीरज लिंगाडे हे २ हजार मतांनी आघाडीवर होते.
या एकूण मतमोजणीमध्ये ८ हजार ७३५ मते अवैध ठरली होती. महत्वाची बाब म्हणजे जवळपास ४ हजारांच्यावर मतदारांनी डॉ. रणजीत पाटील यांच्या नावापुढे केवळ २ हा क्रमांक लिहून मतदान केले. या ४ हजार अवैध मतांचा फटका मात्र भाजप उमेदवार रणजित पाटील यांना बसला. मग अवैद्य मतांवर भाजपने घेतला आक्षेप घेतला आणि रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. निवडणूक आयोगाने फेर मतमोजणी सुरू केली.
अवैध मते धीरज लिंगाडे यांना पडलीत आणि अवैध मते बाद झाले तर आपला विजय होईल, असा रणजित पाटलांचा अंदाज होता. पण त्यांचा हा अंदाज फोल ठरला.
फेमतमोजणीतून त्या ८ हजार ७३५ मतांमधुन ३४८ मते वैध ठरली. या ८ हजार अवैध मतांपैकी जवळपास साडेचार पाच हजार अवैध मते रणजित पाटलांनाच मिळाली होती. त्यामुळे रणजित पाटील यांचच नुकसान झालं. फेर मतमोजणीतही लिंगाडे आघाडीवर होते.
फेरमोजणीनंतर रणजित पाटलांच्या मतांचा आकडा ४१ हजार २४८ इतका झाला तर धिरज लिंगाडे यांच्या मतांचा आकडा ४३ हजार ५७७ इतका झाला. धिरज लिंगाडे २ हजार ३४६ मतांनी आघाडीवर होते. फेर मतमोजणी करण्याची मागणी पाटील यांच्या अंगलट तर आलीच शिवाय निकालही रखडून पडला होता.
अमरावती पदवीधरमध्ये निवडून येण्यासाठी ४६ हजार ९२७ मतांचा कोटा जाहीर करण्यात आला होता. पण पहिल्या फेरीत पसंती क्रमांक एकच्या मतांनुसार हा कोटा कोणत्याच उमेदवाराने पूर्ण न केल्यामुळे पसंती क्रमांक दोनच्या मतांची मोजणी सुरु झाली. त्यात अवैध मतांची आकडेवारी पाहता मतांचा कोटा ४७ हजार १०१ ठरवण्यात आला.
पसंती क्रमांक दोनच्या मतमोजणीनंतर धिरज लिंगाडे यांच्या मतांचा आकडा ४३ हजार ९२९ इतका झाला तर रणजित पाटलांच्या मतांचा आकडा ४१ हजार ४६० इतका झाला. अखेर अंतिम फेरीनंतर धीरज लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मतं मिळालीत तर रणजित पाटलांना ४२ हजार ९६२ मतं मिळालीत.
हे ही वाच भिडू :
- सत्यजित तांबे जिंकले, पण शुभांगी पाटील यांनी स्वतःची चर्चा होईल अशी सोय केलीये…
- राम-सीतेच्या मुर्तीसाठी नेपाळहून दगड आणण्यामागे फक्त अध्यात्मिक नाही भौगोलिक कारणही आहे
- जागतिक श्रीमंतांच्या यादीत कधीच रतन टाटा यांचं नाव का येत नाही ?