कॅप्टन अमरिंदरसिंग अजित डोवाल यांना भेटायला जाण्यामागे पाकिस्तानचा संबंध आहे?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह सध्या दबावाचे राजकारण खेळत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काल दिल्लीत येत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर आज देखील त्यांच्या भेटीगाठी सत्र सुरु आहेत.

मात्र आज त्यांनी घेतलेल्या भेटीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार हि भेट पंजाबमधील सध्याची राजकीय परिस्थिती आणि घडामोडींच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.

मात्र या अराजकीय आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित व्यक्तीची भेट घेण्यामागील नेमका उद्देश काय असू शकतो?

वृत्तानुसार काही वेळापूर्वीच माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता सुरू असताना सिंह यांनी डोवाल यांच्याशी ही बैठक केली त्यामुळे या भेटीचे अर्थ काय असू शकतात हे बघणं महत्वाचं असणार आहे?

पहिली तर गोष्ट म्हणजे राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सिद्धू यांची इमरान खान आणि पाकिस्तानचे सैन्य प्रमुख कमर बाजवा यांच्याशी चांगली दोस्ती आहे. त्यामुळे त्यांना पंजाबमध्ये कोणत्याही मोठ्या पदावर ठेवणे हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारे ठरेल. त्यामुळेच सिद्धू यांच्या बाबतच हि भेट असल्याचं सांगण्यात येत आहे.

काल घेतली अमित शहांची भेट

बुधवारी अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. जवळपास ४५ मिनिटे हि भेट चालली. अमरिंदर सिंग काँग्रेसमध्ये नाराज असून लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना या भेटीमुळे पुन्हा उधाण आलं आहे. मात्र, अमरिंदर सिंग यांचा दिल्ली दौरा हा वैयक्तिक कारणांसाठी असून ते आपल्या दिल्लीतील निवडक मित्रांना भेटणार असल्याचं त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून सांगण्यात आलं आहे.

अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार यांनी सांगितले कि अमरिंदर सिंग आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये कृषी कायद्यांवर आणि अजूनही सुरु असलेल्या आंदोलनावर चर्चा झाली. कॅप्टन यांनी शहा यांना या कायद्यांना तात्काळ मागे घेऊन हमीभाव पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय पंजाबमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची पण मागणी केली आहे.

काँग्रेसच्या बंडखोर जी-२३ या गटातील नेत्यांची देखील भेट घेणार?

या सगळ्या दरम्यान आणखी एक बातमी माध्यमांमध्ये येत आहे ती म्हणजे अमरिंदर सिंग हे काँग्रेसमधील बंडखोर गट असलेल्या जी-२३ मधील नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळेच आता आगामी काळात एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत याच तत्वानुसार आता पंजाबमध्ये अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यामधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.