म्हणून अमरीश पुरींनी आमिर खानची माफी मागितली होती

कसं असतं ना, आपण मोठे झाल्यावर आपल्या खालच्या व्यक्तीने आपल्या चुका दाखवल्या की, खूप राग येतो. तुम्ही सुद्धा असा अनुभव घेतला असेलच.

असंच काहीसं घडलं अमरीश पुरी आणि आमिर खानच्या बाबतीत.

एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे, अमरीश पुरी आणि आमिर खान या दोघांमध्ये एका मोठ्या पिढीचं अंतर आहे. अमरीश पुरी हे बॉलीवुड मधलं एक मोठं. त्यांच्या खलनायकी भूमिका प्रचंड गाजल्या. तर तुलनेने आमिर खान करियरच्या सुरुवातीला असिस्टंट म्हणून काम करत होता.

त्या दरम्यानचा एक किस्सा…

साल होतं १९८५. नासिर हुसेन यांच्या ‘जबरदस्त’ या हिंदी सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. सनी देओल, संजीव कुमार, रती अग्निहोत्री, अमरीश पुरी, राजेंद्रनाथ अशी तगडी स्टारकास्ट होती.

आमिर खान यावेळी नासिर हुसेन यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यावेळेस आमिर खान प्रकाशझोतात आला नव्हता. एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो स्वतःचं काम करत होता.

झालं असं, आमिर खानला नासिर हुसेन यांनी ॲक्शन डिपार्टमेंटची जबाबदारी दिली होती.

म्हणजेच कलाकारांना ॲक्शन सीन समजवण्याचं काम आमिरकडे होतं. याप्रमाणे आमिरने त्याच्या पद्धतीने एक ॲक्शन सीन अमरीश पुरी यांना समजावला. परंतु काहीतरी घडत होतं आणि कॅमेरासमोर अमरीश पुरी यांना ॲक्शन सीन करणं जमत नव्हतं.

अमरीश पुरी करत असलेले हातवारे चुकीचे होत होते.

अमरीश पुरी वारंवार करत असलेल्या चुकीमुळे शूटिंगचा माहोल थोडासा बिघडला होता. आमिर सारखं अमरीश पुरी यांना सीन समजावून सांगत होता. परंतु अमरीश पुरी यांना जमत नव्हतं. यामुळे बरेच रिटेक घडत होते. शूटिंगचा वेळ वाया जात होता.

त्यामुळे आता अमरीश पुरिंची सुद्धा चिडचिड झाली होती.

पुन्हा एक रिटेक झाल्यावर आमिर खान अमरीश पुरी यांच्या जवळ आला. तो अमरीश पुरींना समजावणार तोच, रागाच्या भरात अमरीश पुरी आमिर खानला सर्वांसमोर ओरडले.

अमरीश पुरींचा आवाज आपण सर्वांनी सिनेमात अनुभवला आहे. त्यामुळे विचार करा, रागाच्या भरात अमरीश पुरींचा आवाज किती मोठा झाला असेल. एरवी कोणी असला असता तर त्याची भीतीने गाळण उडाली असती.

पण इथे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान होता. आमिर खानने अमरीश पुरिंच्या रागावर काही प्रतिक्रिया दिली नाही.

त्याने पुन्हा एकदा शांत आणि संयमाने अमरीश पुरिंना ॲक्शन सीन समजावून सांगितला. आणि काही टेक नंतर हा सीन अखेर ओके झाला.

काही वेळाने अमरीश पूरिंची चिडचिड सुध्दा शांत झाली. आणि मग त्यांना लक्षात आलं की आपण आमिरवर उगाचच ओरडलो.

ज्या मोठ्याने अमरीश पुरी आमिर खानला सर्वांसमोर ओरडले होते त्याच नम्रपणे त्यांनी सर्वांसमोर आमिर खानची माफी सुद्धा मागितली.

तसेच कामाप्रती असलेल्या आमिर खानच्या डेडिकेशनचं त्यांनी कौतुक केलं.

मुळात कोण कुठला असिस्टंट मला माझ्या चुकांबद्दल समजावतोय असाच एक समज अमरीश पुरी यांनी करून घेतला असावा. त्यामुळे रागाच्या भरात अमरीश पुरी यांचा त्यावेळी आमिर खान वर आवाज चढला.

परंतु अमरीश पुरी यांच्या श्रेष्ठत्वाचा आणि वयाचा आदर करता आमिर खानने त्या वेळी संयम दाखवला. नंतर अमरीश पुरी यांनीसुद्धा आमिर खानची सर्वांसमोर माफी मागितली, यावरून त्यांचाही मोठेपणा दिसून येतो.

हल्ली कोण काही बोललं तर लगेच प्रतिक्रिया देणारी मंडळी आपल्या आसपास वावरत असतात. त्यामुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यात घडलेला हा किस्सा आपल्याला नक्कीच वेगळी शिकवण देऊन जातो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.