दिलवाल्या अमरीश पुरींची ‘मराठी’ दुल्हनिया !!

पुढचा मागचा विचार न करता मुलं – मुली प्रेमात पडतात. खूप जणांना ठाऊक असतं की या प्रेमाला पुढे काही भविष्य नाही. तरीही त्या रोमँटिक क्षणांचा पुरेपूर आनंद प्रेमी युगुलं घेत असतात. जेव्हा ऐन कसोटीची वेळ येते तेव्हा पुढे काही होणार नाही, याची जाणीव होऊन “मला विसरून जा” असं म्हणत सहज एकमेकांपासून वेगळे होतात. आणि मग आपला दिग्या “श्रेया, मोठा गेम झाला यार” असं म्हणत दर्दभऱ्या प्रेमाची कहाणी वारंवार आपल्या मित्राला ऐकवत बसतो.

खूपदा असंच होत असलं तरी, ज्या मुलीसोबत भविष्याची स्वप्नं रंगवली असतात ती आयुष्यात साथीदार म्हणून कायम राहावी यासाठी घरच्यांचा विरोध पत्करून प्रेम टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी सुद्धा काही युगुलं असतात.

ही कहाणी अशाच एका माणसाची. कुटुंबाचा विरोध पत्करून या पंजाबी मुलाने जी मुलगी आवडते तिच्याशीच लग्न करणार या निर्णयावर ठाम होता.

हा मुलगा म्हणजे बॉलिवुडमधील ग्रेट खलनायक अमरीश पुरी.

अमरीश पुरी यांच्याविषयी आजवर खूप लिहिलं गेलं आहे. तेव्हा नवीन काय लिहावं याबाबत विचार सुरू असताना अमरीश पुरी यांच्याविषयी एक भन्नाट माहिती मिळाली. ही माहिती कळाल्यावर फार छान वाटलं. खलनायक म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या अमरीश पुरी यांची बायको मराठी होती. दोघांचा प्रेमविवाह. पण दोघांच्याही कुटुंबाचा सक्त विरोध. तरीही या दोघांनी लग्न कसं केलं, याची ही कहाणी..

तो काळ असा होता की तेव्हा, अमरीश पुटी द ग्रेट अमरीश पुरी झाले नव्हते. रंगभूमीविषयी त्यांना लहानपणासून एक अनामिक ओढ होती. भरपूर नाटकं पाहायचे. ग्रॅज्युएट झाल्यावर ते मुंबईला आले. त्यांचे मोठे भाऊ मदन पुरी मुंबईत तर चुलत भाऊ सुंदरलाल पुरी फिल्मिस्तान मध्ये नोकरीला होते. परंतु दोघांच्या ओळखीचा अमरीश पुरी यांना काही फायदा झाला नाही.

सुंदरलाल पुरी यांनी भावाला स्पष्ट शब्दात सांगितले की, “तू सिनेमासाठी योग्य नाहीस.”

सिनेमात काही कामं मिळत नाही याची जाणीव झाल्यावर अमरीश पुरी यांनी रंगभूमीला जवळ केलं.

त्यावेळी दादरची छबिलदास शाळा ही नाटकांसाठी प्रसिद्ध होती. नाना पाटेकर, सुलभ देशपांडे आदी कलाकारांनी छबिलदासच्या परिसरात नाटकाचे आणि अभिनयाचे धडे गिरवले आहेत. अमरीश पुरी सुद्धा छबिलदासच्या शाळेत नाटकांमध्ये काम करू लागले. परंतु नाटकांत काम करून जे पैसे मिळायचे त्यात स्वतःचा खर्च भागवणं कठीण होतं. म्हणून त्यांनी राज्य विमा योजना कार्यालयामध्ये क्लर्क म्हणून नोकरी करायला सुरुवात केली.

नोकरी करत असतानाचा इथेच त्यांना एक मराठी मुलगी भेटली. आणि ते तिच्या प्रेमात पडले.

ती मुलगी म्हणजे उर्मिला दिवेकर. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं.

यासाठी दोघांनी सुद्ध आपापल्या घरी सांगायचं असं ठरलं. अमरीश पुरी यांनी घरी उर्मिलाशी लग्न करण्याचा विषय काढला. हे ऐकताच त्यांचे वडील निहालचंद आणि वडील बंधू चमन दोघांनी कडाडून विरोध केला. निहालचंद हे पारंपरिक विचारसरणीचे. त्यामुळे त्यांनी मुलाला बजावून सांगितलं,

“तिच्याशी लग्न केलंस तर आपले संबंध संपले.”

दुसरीकडे उर्मिला यांच्या घरी सुद्धा पंजाबी असलेल्या अमरीश पुरी यांच्याशी लग्न होण्यास ठाम विरोध होता. दोघांनी कुटुंबाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु घरचे ऐकायला तयार नव्हते. शेवटी दोघांनी ठरवलं, लग्नाला घरच्यांनी होकार दिला तरच लग्न करायचं नाहीतर आजन्म अविवाहित राहायचं.

अमरीश पुरी यांची आई खूप आजारी असायची. अखेर तिनेच तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये सर्वांना सांगितले,

“त्याचं मन असेल तर त्याला तिच्याशी लग्न करु दे. तुम्ही रोखू नका.”

आईच्या “जा अमरीश जा, जी ले अपनी जिंदगी” या शब्दांमुळे अमरीश आणि उर्मिला या दोघांचं लग्न झालं. अमरीश पुरी यांचा एका मराठी मुलीशी झालेला हा प्रेमविवाह होता म्हणा.. लग्नाच्या वेळेस सुद्धा नोकरी करता करता अमरीश अभिनयाची आवड भागवण्यासाठी अधून मधून नाटकात कामं करत होते.

त्यावेळेस उर्मिला ओव्हरटाईम काम करून संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळत होत्या. वयाच्या ४१ व्या वर्षी अमरीश पुरी अभिनयात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले. तोवर एक सहचारिणी म्हणून उर्मिला यांनी अमरीश पुरींना मोलाची साथ दिली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.