रामायण सिरियलच्या रावणाच्या भूमिकेत अमरीश पुरी दिसले असते पण…

रामानंद सागर यांनी बनवलेली रामायण मालिका हि बऱ्याच काळापासून लोकांच्या अगदी काळजात कोरली गेलेली आहे. रामायणातील पात्रं ज्या ज्या अभिनेत्यांच्या वाट्याला आले ते पुढे अजरामर झाले. पुढच्या कैक वर्षांपर्यंत रामायणातील पात्र लोकांकडून विसरली जाऊ शकत नाही. रामानंद सागर यांनी रामायणाची जी लोकं निवडली ती लोकं त्या त्या पात्रात एकदम फिट बसली आणि लोकांच्या मनातही कायमचीच जाऊन बसली.

या रामायण मालिकेतील सगळ्यात महत्वाचं पात्र होतं रावण.

रावणाची भूमिका म्हणजे एक शिवधनुष्य होतं. या भूमिकेचं शिवधनुष्य पेललं होत अरविंद त्रिवेदी यांनी.

आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी रावण हे पात्र अक्षरशः जिवंत केलं. त्यांच्या अभिनयाने एकवेळ राम, लक्ष्मण या मध्यवर्ती पात्रांचं वजन सुद्धा कमी केलं होतं.

रावण पात्राच्या बारीकसारीक छटा इतक्या कुशलतेने अरविंद त्रिवेदींनी साकारल्या होत्या कि ज्यावेळी रावण मरतो त्यावेळी आनंदोत्सव म्हणून देशभरात लोकांनी फटाके वाजवले होते. लोकांनी त्यांना खऱ्या आयुष्यात सुद्धा रावणाच्या नजरेनेच बघितले होते. रामानंद सागर यांनी अरविंद तिवारींशिवाय पुढे कोणीही उच्च लेव्हलचा रावण उभा करू शकणार नाही अशी तजवीज करून ठेवली होती.

ज्यावेळी रामायणाची घोषणा केली गेली तेव्हा रावण या पात्रासाठी रामानंद सागर यांची प्रथम पसंती अभिनेते अमरीश पुरी होते.

रामानंद सागर यांनी या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांना त्यावेळी विचारणा केली होती.

ज्यावेळी दूरदर्शनसाठी रामानंद सागर हि मालिका तयार करत होते तेव्हा पौराणिक काळातील खलनायकी पात्रांसाठी एका दमदार अभिनेत्याची त्यांना गरज होती. पण त्यांच्या मनात पक्कं झालं होतं कि हा रोल फक्त अमरीश पुरी चांगल्या प्रकारे पार पाडतील.

त्यावेळी अमरीश पुरी हमी पांच या चित्रपटात दुर्योधन सारख्या खलनायकी पात्राची छाप सोडून लोकांच्या नजरेत आले होते. हं पांच चित्रपटातील जितके अभिनेते होते सगळ्यांनाच पुढे फायदा झाला. पण सगळ्यात जास्त चित्रपट ऑर झाले ते हिरो असलेल्या मिथुनला आणि खलनायक असलेल्या अमरीश पुरींना.

अमरीश पुरी यांनी रामानंद सागरांना रावण या पात्रांविषयी नकार कळवला. यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे त्याकाळी अमरीश पुरी यांच्या मोठ्या पडद्यावरील खलनायकी स्टारडमची सुरवात झाली होती. त्याचवेळी सिरीयल हा प्रकार नवीनच टीव्हीवर झळकू लागला होता. अमरीश पुरी यांना छोटया पडद्यावरील भूमिकांमध्ये अडकायचं नव्हतं. हि रिस्क घ्यायला ते पुरेसे तयार नव्हते. 

दुसरं कारण होत पैसे. चित्रपटातील खलनायकी भूमिकांमुळे त्यांना चांगलं मानधन मिळू लागलं होतं. लोकांना त्यांचं काम आवडू लागलं होतं. छोट्या पडद्यापेक्षा चित्रपटांमध्ये भरपूर पैसे मिळतात हे त्यांना कळलं होतं. त्यामुळे रामानंद सागर यांचा रावणाच्या भूमिकेचा प्रस्ताव फिका पडला. त्यामुळे अमरीश पुरी यांना रावणाची भूमिका साकारता आली नाही.

शेवटी गुजराती अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या वाट्याला रावण हे पात्रं आलं. हे पात्र पुढे अजरामर झालं आणि त्याचबरोबर अरविंद त्रिवेदींना भरपूर प्रसिद्धी मिळवून गेलं. याच स्टारडमच्या जोरावर अरविंद त्रिवेदी पुढे राजकरणातही अग्रेसर झाले. 

पुढे अमरीश पुरी यांनी छोट्या पडद्यावरही काम केलं. शाम बेनेगल आणि गोविंद निहलानी या दोन दिग्दर्शकांसाठी त्यांनी छोट्या पडद्यावर एंट्री केली. भीष्म सहानी यांच्या तमस कादंबरीवर आधारित तमस या मालिकेत अमरीश पुरींनी म्हाताऱ्या शिखाची भूमिका अजरामर केली.

अमरीश पुरी यांचा अभिनय हा अगदीच खरा वाटायचा त्यामुळे बरेच चित्रपट त्यांनी खलनायकी बाजातले स्वीकारले. मिस्टर इंडियामधील मोगॅम्बो असो किंवा नगिना मधील भैरव नाथ असो, करण अर्जुन मधील दुर्जन सिंग असो किंवा तहलका मधील जनरल डाँग असो अशा अनेक पात्रांवर आपली मोहोर त्यांनी उमटवली. 

पण त्यांना रावणाच्या भूमिकेत बघायला बऱ्याच लोकांना आवडलं असतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी रावण पात्र सुद्धा त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने रंगवलं असतं.

हे हि वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.