पंजाबच्या लोकगायकाची गाणं गात असताना स्टेजवरच हत्या करण्यात आली होती…

पंजाबी गाण्यांची आज जितकी क्रेझ आहे त्याहीपेक्षा खतरनाक क्रेझ एकेकाळी अमर सिंग चमकीला या पंजाबी गायकाची होती. आजचे हनीसिंग, गुरु रंधावा हि सगळी मंडळी अमर सिंग चमकीलाच्या गायकीपुढे फिकी पडतील असा त्याचा पहाडी आवाज होता.

पण या पंजाबच्या लोकगायकाची स्टेजवर गाणं सादर करत असताना हत्या झाली. हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं, त्याबद्दलचा आजचा किस्सा.

अमर सिंग चमकीला ८०च्या दशकातला सगळ्यात मोठा गायक होता. पंजाब आणि भारतभरात जितके ट्रक ड्रायव्हर होते त्या सगळ्यांचा प्राण म्हणजे अमर सिंग चमकीला होता.

कारण रात्रीच्या प्रवासाच्या वेळी सगळ्या ट्रकांमध्ये फक्त आणि फक्त अमर सिंग चमकीलाचा आवाज आणि त्याच्या कॅसेटमधली गाणी असायची. बाजारात सगळ्यात जास्त कॅसेट ट्रक ड्राइव्हर विकत घ्यायचे कारण पंजाबमध्ये जर कोणाचा आवाज काळजाला भिडत असेल तर तो अमरसिंग चमकीलाचा होता.

अमर सिंग चमकीलाचं वैशिट्य म्हणजे तो स्वतः गाणी लिहायचा, स्वतःचा त्याला संगीतबद्ध करायचा आणि गायचा. त्यांच्याइतका जबरदस्त लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स कुठल्याच गायकाला जमत नसे. खेडोपाड्यांमध्ये त्याची गाणी तुफ्फान लोकप्रिय होती. महिन्या महिन्याच्या तारखा या अमर सिंग चमकीलाच्या नावाने बुक असायच्या.

अमर सिंग चमकीलाला महिला गायक हवी होती जेणेकरून गाण्यांचे सामने सुरु करता येतील. त्यावेळी त्याने पंजाबात हि नवीन पद्धत सुरु केली होती कि स्त्री पुरुषाने गाण्यातून एकमेकांना उत्तरं द्यायची. त्यावेळी अमरज्योत कौर या गायिकेशी त्याची भेट झाली. या दोघांनी अनेक स्टेज शोज एकत्र केले. भरपूर नाव कमवलं. मग कालांतराने लग्नही केलं.

पण इथंचं खरी ठिणगी पडली होती, कारण सगळ्यांच्या विरोधात जाऊन या दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता.

८ मार्च १९८८ चा दिवस. एका स्टेज शोला अमरसिंग चमकीला आणि त्याची टीम पोहचली. अमरज्योत कौर, पेटीवाला, तालवाद्यवाला आणि अजून एक सहकारी होता.

कार्यक्रम ऐन भरात असताना अचानक दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडायला सुरवात केली. अमर सिंग चमकीलाला चार गोळ्या लागल्याने तो जागीच ठार झाला. अमरजित कौर हि गरोदर असताना सुद्धा कार्यक्रम करत होती तिलासुद्धा गोळी लागल्याने ती मृत पावली.

हार्मोनियम आणि तालवाद्य वाजवणारा यांना सुद्धा गोळ्या लागल्याने तेही जागीच ठार झाले. उरलेल्या सहकाऱ्याला गोळी लागली पण तो वाचला.

या खळबळीने मात्र पूर्ण पंजाबमध्ये हाहाकार उडाला. पंजाबचा सगळ्यात मोठा लोकगायक असलेला अमर सिंग चमकीला ठार झाला होता. पण तेव्हा त्याच्या मृत्युबद्दलची तक्रार सुद्धा कोणी केली नाही. घरच्यांनी सुद्धा तक्रार दाखल केली नाही. अमर सिंग चमकीलाच्या मृत्यूच्या बऱ्याच अफवा उडत राहिल्या. पण पोलिसांनी फक्त शक्यता वर्तवल्या होत्या.

अमर सिंग चमकीलाच्या बद्दल अफवा होत्या कि तो डबल मिनिंग गाणी गायचा. त्यात ड्रग्ज, प्रेम, तरुण लोकांची मानसिक स्थिती यावर तो गाणी लिहायचा. पण हि गाणी डबल मिनिंग असली तरी ती चांगल्या चांगल्या गाण्यांना भारी पडायची.

पंजाब आणि देशांमध्ये घडणार्या गोष्टींवर तो गाण्यातून भाष्य करीत असे, खलिस्थानी लोकांनी त्याला धमकी दिली होती कि त्याने पंजाब विषयी भाष्य करू नये. डबल मिनींग गाणी गाऊ नये हि गुरु नानकांची भूमी आहे. पण अमर सिंग चमकीलाच्या कॅसेट प्रचंड प्रमाणात खपल्या जात असे. 

दुसरीकडे असा अंदाज वर्तवण्यात आला कि अमर सिंग चमकीलाच्या गाण्यामुळे इतर गायकांचं दुकान बंद पडलं होतं.

चमकीलाच्या कॅसेट सोडून लोकं इतर कुठल्याही गायकाच्या कॅसेटला हात लावत नसे. त्यामुळे बदला घेण्याच्या भावनेतून हे हत्याकांड घडलं असावं असा कयास लावण्यात आला.

आंतरजातीय विवाह केल्यामुळे ऑनर किलिंग प्रकार चमकीलासोबत घडला असं सांगण्यात आलं. मात्र शेवटपर्यंत अमर सिंग चमकीलाच्या हत्येचं गूढ उकललं नाही. पोलीस चौकश्यांद्वारे काहीही झालं नाही. एकेकाळी आपल्या आवाजाने पंजाबवर राज्य करणाऱ्या अमर सिंग चमकीलाचा दुर्दैवी अंत झाला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.