सांगलीच्या अमृता देशपांडे हत्याकांडामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता..

2 सप्टेंबर 1998 चा दिवस. अमृताची मैत्रीण सुमेधा दुपारी दोन वाजता अमृताच्या घरी आली होती. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दोघी मैत्रिणींनी भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर त्या घराबाहेर पडल्या. अमृताला मेंदीचा कोन आणायचा होता. सायकलवर शर्ट-जीन्स घालून ती निघाली, तर मैत्रीण सुमेधा तिच्यासोबत चालत होती. दोघींच्या गप्पा सुरुच होत्या. एकमेकिंचा त्यांनी निरोप घेतला आणि साधारण अर्ध्या तासाने सुमेधा गेली.

अमृता घरातून सायकलवरून निघाली होती तेव्हा अवघ्या काही अंतरावर शास्त्री चौकातील गणपती मंडपाच्या मागच्या बाजूला बबनने अमृतावर चाकूने वार केले. या हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा मृत्यू झाला.

अमृता देशपांडे कोण होती ? डॉ. रवीकांत देशपांडे आणि अर्चना देशपांडे यांच्या दोन कन्या, मोठी रेश्मा, तर धाकटी 18 वर्षांची अमृता. ती सांगलीतील गरवारे कॉलेजमध्ये बीएच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत होती.

सांगली पोलिसांना रात्री आठ वाजेच्या दरम्यान एक फोन आला. शास्त्री चौकातील उद्योग भवनाजवळ एक मुलीवर चाकूने वार करण्यात आले आहे आणि ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. पोलिसांनी तडक घटनास्थळी धाव घेतली आणि वेगाने तपास सुरू केला.

आरोपी बबन राजपूत याने धारदार चाकूने सपासप वार केले होते. हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. सांगलीच्या शास्त्री चौकात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. हत्या होताना पाहूनही आसपासच्या रहिवाशांनी, दुकान चालकांनी दारं-खिडक्या बंद केल्याचं बोललं जातं.

दुसरीकडे, एका व्यक्तीने पाहिलं की ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली युवती तर डॉक्टरांची मुलगी अमृता आहे. अमृताच्या आईला सोबत घेऊन त्यानेही घटनास्थळी धाव घेतली. अमृताला रुग्णालयात न्यायला कार आणण्यासाठी तो परत गेला. येताना वाटेत त्याने डॉक्टर देशपांडे म्हणजेच अमृताच्या वडिलांनाही घेतलं. ते परत आले तर अमृता तिथे नव्हती, मात्र रक्ताचे डाग दिसत होते. चौकशी केल्यावर समजलं की तिला सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच अमृताचा मृत्यू झाला होता. 20 पेक्षा जास्त वार बबन राजपुतने केले होते त्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि अमृताचा जागीच जीव गेला. एकतर्फी प्रेम असलेल्या बबन राजपुतला नकार पचवणे जड जात होते आणि शेवटी सहन न झाल्याने त्याने हे विकृत कृत्य केलं. सगळ्या सांगलीला या प्रकरणाने हादरवून टाकलं होतं.

पोलिसांनी पंचनामा केला, तेव्हा घटनास्थळावर चपलेची जोडी, चाकूचे आवरण आणि अमृताची सायकल सापडली होती. पोलीस आसपास चौकशीसाठी गेले, तरी लोकांनी दरवाजे उघडले नाहीत, असं सांगितलं जातं.पोलिसांच्या चौकशीला प्रत्यक्षदर्शीनी दाद दिली नाही पुढे तपासात तीन नावं समोर आली. बबन राजपूत, अनिल शिंदे आणि मुकुंद शिंदे ही तीन नावं पोलिसांना तपासात सापडली. हे तिघेही फरार झाले होते. मात्र हत्येच्या दोन दिवसांनी म्हणजेच चार सप्टेंबरला एका पाईपलाईनमध्ये लपून बसलेल्या बबनला पोलिसांनी संध्याकाळी अटक केली.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार दुर्मिळातील दुर्मिळ असलेली ही केस सरकारी वकील उज्वल निकम यांनी लढवली होती. यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बबन रजपूत शिक्षा भोगून बाहेर पडला आहे सध्या तो कोल्ड ड्रिंकच्या दुकानात काम करतो. त्यानं तुरुंगातूनच पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.