अमृता फडणवीस ॲक्टर नाहीत, दिग्दर्शकही नाहीत, मग त्या कान्सला गेल्या या कारणानं..

गेल्या काही दिवसांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा कानावर येत होती. भारतातल्या नट्या तिकडं गेल्या, दीपिका तर डायरेक्ट ज्युरी म्हणूनच गेली. मामे खान नावाचा राजस्थानी लोककलाकार कान्सला गेला, आपल्याला एकदम भारी वाटलं. त्याच्यानंतर मराठी चित्रपट कान्ससाठी निवडले आता भारीची जागा अभिमानानं घेतली.

मग जरा कान्सच्या बातम्या येणं कमी झालंच होतं, तेवढ्यात एक फोटो येऊन धडकला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेल्यात. फोटो होता, विमानतळावरचा. त्यामुळं कान्सच्या परंपरेप्रमाणं त्यांनी एखादा गाऊन किंवा भारीतली साडी न घालता, साधाच ड्रेस घातला होता.

फोटो बघितल्या बघितल्या मनात एक प्रश्न आला, की अमृता फडणवीस कान्सला कशा काय गेल्या असतील?

म्हणजे सिंगर म्हणून त्यांची कारकीर्द फार विशेष अशी गाजली नाही. दुसऱ्या बाजूला त्यांनी काही म्युझिक व्हिडीओजमध्ये काम केलेलं असलं, तरी त्यांची फिल्म वैगेरे सुपरहिटही ठरली नव्हती. आता जसं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर भारताच्या चमूसोबत कान्सला गेले तसं जायचं म्हणलं, तर अमृता फडणवीस कुठल्या पदावर पण नाहीत.

शोधलं की सापडतं, असं आम्हाला डिटेक्टिव्ह अस्मितानं लहानपणीच सांगून ठेवलंय. त्यामुळं आमच्या मेंदूची चक्र फिरायला लागली आणि ती पोहोचली कान्स गाईड नावाच्या एका वेबसाईटवर. 

इथं माहिती मिळाली, की कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुणाकुणाला प्रवेश आहे.

तर पहिली कॅटेगरी आहे, ज्यांच्याकडे फेस्टिव्हल ॲक्रीडेशन आहेत अशी लोकं. चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोकांनाच हे ॲक्रीडेशन मिळतं, यात शक्यतो अभिनेते-अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश असतो. दुसरं असतं इंडस्ट्री वर्कशॉप्स ॲक्रीडेशन. कान्स फेस्टिव्हलमध्ये अनेक तंत्रज्ञही येतात, त्यांच्यासाठी ही विशेष सोय असते. सोबतच शॉर्ट फिल्म्स विकणारे आणि त्या विकत घेणारे मोठे निर्माते आणि प्रयोगशील कार्यकर्तेही कान्समध्ये असतात. 

त्यानंतर असतात चित्रपट-लघुपट-माहितीपटाचे निर्माते, यांच्यासाठीही खास सोय असते. जगभरातल्या चित्रपटांचं मार्केट हाताळणाऱ्यांना कान्समध्ये प्रवेश मिळावा यासाठी मार्केट ॲक्रीडेशन असतं. कान्समध्ये काय राडा होतोय, हे आपल्याला सांगायला तिथं पत्रकार असतात, त्यांनाही वेगळं ॲक्रीडेशन मिळतं. ज्या लोकांना पिक्चर बघायला आवडतं, त्यांना फुकट प्रवेश मिळतो. फक्त गोम अशी असती, की तुम्ही तिकडचे स्थानिक रहिवासी पाहिजे.

हे एवढं इतकं मन लाऊन वाचलं असताल, पण तरीही अमृता फडणवीस यापैकी कुठल्या गटात बसतात, हे काय तुम्हाला झेपलं नसेल. 

खरंतर त्या यापैकी कुठल्या गटातून कान्सला गेल्याच नाहीयेत. त्या तिकडं जगप्रसिद्ध रेड कार्पेटवर दिसतीलही, पण अभिनेत्री किंवा गायिका म्हणून नाही…

तर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून.

कान्स म्हणजे काय फक्त फिल्म फेस्टिव्हल नसतंय. तिकडची लोकं भाषण बिषण ठेवतात. मोठमोठ्या लोकांना बोलावतात आणि जगाची प्रगती कशी होईल, आपल्या मानवी जीवनात सुधारणा कशा घडून येतील… या विषयांवर चर्चा घडवून आणतात.

पण जग बदलायच्या गप्पा तर आपल्या कट्ट्यावर होतातच की… खरंय पण इथं विषय डीप असतो.

बेटर वर्ल्ड फंड नावाच्या एका संस्थेनं ‘UN Sustainability Development Goals’ म्हणजे शाश्वत विकासासाठीची लक्ष्य या विषयाला अनुसरुन एक चर्चासत्र कान्समध्ये ठेवलंय. यंदा त्यांची थीम पर्यावरण, समुद्र यांचं रक्षण आणि अन्नामधली शाश्वतता अशी आहे. याच्यावर मास्टरमाईंड फोरमद्वारे वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते आपले विचार मांडणार आहेत.

यासाठीच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमृता फडणवीस यांची निवड झालेली आहे. त्या फूड सस्टेनबिलिटी (अन्न शाश्वतता) या फोरमच्या थीमनुसार भाषण करणार आहेत.

अमृता फडणवीस गेल्या काही वर्षांपासून शाश्वत ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर काम करत आहेत. या विषयीच्या चर्चासत्रांनाही त्यांनी उपस्थिती लावलीये. २०१८ मध्ये वर्ल्ड पीस अँड डिप्लोमसी ऑर्गनायझेशननं ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऍक्सीलेटर अवॉर्ड’ दिले, या कार्यक्रमालाही त्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सोबत घेऊन केलेलं ‘मुंबई रिव्हर अँथेम’ही त्यांच्या पर्यावरण रक्षणाविषयीच्या कामाचा भाग होता असं सांगण्यात आलं. मुंबईतल्या नद्यांच्या रक्षणासाठी अमृता फडणवीस यांनी ‘नदी मोर्चा’ ही काढला होता. विशेष म्हणजे हा मोर्चा २०१८ मध्ये काढण्यात आला होता.

त्यांचं हे सगळं काम लक्षात घेऊन, त्यांना कान्समध्ये मास्टरमाईंड फोरमद्वारे आमंत्रित केलेलं असू शकतं. त्यांच्या सोबतच या मंचावरुन अन्न शाश्वततेसाठी काम करणारे पत्रकार, संशोधक, विविध कंपन्यांचे सीईओ आणि डॉक्टरही बोलणार आहेत.

हे चर्चासत्र झालं की पुरस्कार सोहळा आणि जगाचं आकर्षण असणारा ‘गाला डिनर’ ही होणार आहे. त्यामुळं तिथल्या पेहरावांची वेगळी चर्चा होईल यात काही शंका नाहीच. 

एका बाजूला कान्समध्ये भारतीय लोककलाकार, अभिनेते जात आहेत… अमृता फडणवीस यांची गाणी किंवा अभिनय कान्समध्ये पोहोचला नसला, तरी ‘सामाजिक कार्यकर्त्या’ म्हणून आपला ‘आवाज’ कान्सपर्यंत नेण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत, हे मात्र खरं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.