तू माझा १५ ऑगस्ट आहेस- अमृता प्रीतम

अमृता प्रीतम. पंजाबी साहित्यातील एक अजरामर नांव.

अमृताजींच्या हयातीत साहित्यिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांच्या गौरव झाला. ज्ञानपीठ पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला. परंतु आज त्यांची आठवण काढण्याचं कारण असं की ‘बीबीसी हिस्ट्री’ या मासिकाने जग बदलणाऱ्या १०० प्रभावशाली महिलांची एक  यादी जाहीर केलीये. त्यात भारतातील ४ महिलांचा समावेश आहे. मदर टेरेसा, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू आणि अमृता प्रीतम.

 “चुकीच्या सामाजिक मूल्यांसाठी घरं मोडणार असतील, तर सत्याच्या आग्रहासाठी आणखी घरांची मोडतोड झाली पाहिजे”

अमृता प्रीतम यांनी एका मुलाखती दरम्यानच्या एका प्रश्नावर दिलेलं हे उत्तर.

अमृताजींना विचारण्यात आलेला प्रश्न होता की, “तुमच्या सर्वच कथांमधील नायिका शेवटी घर सोडून जातात. यातून चुकीचा सामजिक संदेश जातो, असं नाही का तुम्हांला वाटत…? अमृताजींचं हे उत्तर ही काही केवळ एक ‘आदर्शवादी साहित्यिक बंडखोरी’ नव्हती तर आपल्या वैयक्तिक जीवनातही त्या तितकच बंडखोर आयुष्य जगल्या.

वयाच्या सोळाव्या वर्षी एका व्यसनी आणि थोराड व्यक्तीशी झालेला विवाह. या नात्यातून वेगळं झाल्यानंतर प्रख्यात शायर आणि गीतलेखक ‘साहीर लुधयानवी’ बरोबरची आधी-अधुरी प्रेमकहाणी आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर आपल्यापेक्षा वयाने जवळपास ६ वर्षे लहान असणाऱ्या प्रख्यात चित्रकार ‘इमरोज’ बरोबरचं शेवटच्या श्वासापर्यंतचं ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ असं बंडखोर आयुष्य अमृताजी जगल्या.

अमृताजी आपल्याकडे प्रामुख्याने माहित असतात त्या बहुतांशी त्यांच्या साहीर बरोबरच्या प्रेमकहाणीच्या निमित्ताने किंवा अख्यायिका बनलेल्या इमरोजबरोबरच्या सहचर्याच्या निमित्ताने­­­­­­­. अनेकांसाठी तर अमृता हे नांव घेताना पुढे इमरोज हे नांव अगदी नकळतपणे  त्यांच्या ओठांवर तरळत. इतकी ही दोन नांव एकमेकांशी एकरूप झालीत. पण त्यापलीकडे जाऊन लेखिका म्हणून अमृताजींचं पंजाबी साहित्यातील योगदान खूप मोलाचं आहे. ‘पंजाबी साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रतिभा’ असं त्यांचं वर्णन केलं तर ते अतिशयोक्त ठरत नाही.

आपल्या साहित्य क्षेत्रातील मुसाफिरीविषयी सांगताना अमृताजी म्हणतात की, “मी माझी मलाच स्वीकार्य आहे की नाही हे मला स्वतःला अनेकदा उमजत नाही. म्हणूनच बहुधा सर्व आयुष्यभर मी लिहत राहिले. माझ्या नजरेत माझं जे नकोसं आहे ते हवंसं होण्यासाठी” स्वतःविषयी इतकं प्रामाणिक स्वगत करता येणं हेच अमृता प्रीतम यांना एक साहित्यिक म्हणून आणि माणूस म्हणूनही अधिक समृद्ध, अधिक उदात्त करतं.

अमृताजींनी फाळणीवर लिहलेली ‘अज्ज आखां वारीसशाह नू’ ही कविता प्रचंड गाजली. पाकिस्तानात देखील ती पोहोचली. या कवितेविषयीचा एक किस्सा अमृताजींनी आपल्या ‘रसीदी टिकट’ या आत्मचरित्रात लिहिलाय. १९७२ साली अमृताजी लंडनला गेल्या होत्या. तिथे एक मैफल भरली होती. मैफिलीत पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक नजाकत अली देखील उपस्थित होते. नजाकत अलींवर ज्यावेळी गायनाची वेळ आली त्यावेळी सोबत साथीदार आणि वाद्य नव्हतं.

नजाकत अलींना ज्यावेळी गायला सांगण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले की, “हमने आजतक कभी बिना साज के गाया नहीं है !” पण आपलंच बोलणं मध्येच थांबवत ते पुढे उद्गारले, “जिसने ‘वारीसशाह’ कविता लिखी हैं उसके लिये आज बिना साज के भी गायेंगे !” हा एका महान कलाकाराचा दुसऱ्या बहुमुखी प्रतिभेच्या लेखिकेला ठोकलेला सलाम होता.

अमृता आणि इमरोज

अमृताजी आपल्या कथा आणि कवितांमधून कायमच स्त्री स्वातंत्र्याविषयी, महिला सबलीकरणासाठी आवाज उठवत राहिल्या. त्यांच्या अनेक कथा आणि कवितांमध्ये आपल्याला त्याचं प्रतिबिंब पडलेलं बघायला मिळत. पण त्याचवेळी स्त्रियांच्या समान हक्काची मागणी करताना त्यांनी कधीही पुरुषद्वेषी मांडणी केलेली नाही. याची झलक आपल्याला त्यांनी इमरोजविषयी जे म्हणून ठेवलंय त्यातून बघायला मिळते.

अमृताजींनी इमरोजला  लिहिलेल्या एका पत्रात त्या म्हणतात  की,

“जर कोणी माणूस कुठल्या दिवसाचं चिन्ह बनू शकत असेल तर तू माझा १५ ऑगस्ट आहेस. माझ्या अस्तित्वाच्या आणि माझ्या मनाच्या स्वातंत्र्याचा दिवस”

अमृताजी ज्या काळात लिहीत होत्या आणि ज्या पद्धतीचे विषय आपल्या कथा-कवितांमधून मांडत होत्या ते तत्कालीन समाजव्यवस्थेला झेपणारं नव्हतंच. समाजाचं जाऊद्यात त्यांच्या अनेक समकालीन साहित्यिकांना देखील त्यांच्या लेखणीची धार अधिक घायाळ करत होती. त्यामुळेच त्यांच्यावर अत्यंत वाईट टीका-टिपण्णी केली गेली. काहीबाही बोललं गेलं. पण त्या मात्र अतिशय आग्रहीपणे आपल्या मूल्यांशी एकनिष्ठ होत्या. व्यवस्थेला फाट्यावर मारत स्वातंत्र्याचा आग्रह धरणारं लिखाण करत होत्या आणि तेच आयुष्य जगत देखील होत्या.

अमृताजींचा वेगवेगळ्या पातळ्यांवरचा संघर्ष वेगळा होता. पण प्रत्येकवेळी  आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर येणाऱ्या संकटांशी त्या धैर्याने भिडत राहिल्या. रक्तातील बंडखोरी जगत राहिल्या. आयुष्याच्या वाटेवर अनेक कटू प्रसंगांना सामोरे जाऊन देखील त्यांचा माणसाच्या चांगुलपणावरील विश्वास कधीच उडाला नाही.

– अजित बायस

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.