संघाचे स्वयंसेवक ते बॉलिवुडचा खतरनाक व्हिलन, अमरीश पुरींचे ते सात किस्से.

साला प्रत्येक हिरोला एक व्हिलन पाहीजे असतो. जोपर्यन्त व्हिलन नाही तोपर्यन्त आपण हिरो नाही. नायक सिनेमातला अनिल कपूर एका दिवसाचा मुख्यमंत्री झाला. अमरीश पुरीसारखा माणूस नसता तर तोही आमच्यासारखं पोर्टलवरतीच लिहीत असता.

अमरीश पुरी नसता तर गायब होणार घड्याळ घालून फक्त दोन चार घरात डोकवण्याएवढच काम मिस्टर इंडियाकडे राहिलं असत. अमरिश पुरी नसता तर बिचाऱ्या सनी देओलनं कुणापुढं भारतमातेचा जयजयकार केला असता. 

अमरीश पुरी असा एकमेव माणूस होता जो आपल्याला आपल्या सासऱ्यात दिसला.

सर्व्हे केला तर सर्वात जास्त सासऱ्याचा नंबर अमरीश पुरीच्या नावानं लिहल्याची आकडेवारी बाहेर येईल. असा हा अमरीश पुरी जेव्हा बाप व्हायचा तेव्हा काशीसारखां पोरगाच त्याच्या पोटाला यायचा. सिमरणचा बाप. काशीचा बाप. परदेस मधल्या शाहरूखचा बाप. तो बाप पण होता आणि व्हिलन पण.

खरतर सिनेमातला तो असा व्हिलन होता ज्याला आजही लोकं अरेतुरेच बोलतात. माणसं आपल्या जवळच्या व्यक्तीला अरेतुरे बोलवतात. राग असो नाहीतर प्रेम. या दोन्ही बाजूला पहिला नाव येत ते अमरीश पुरीच. तो नसता ना तर DDLJ मधली कबुतरं पण उपाशी मेली असती. 

अशा या महान कलाकाराचे काही किस्से खास “बोलभिडू” च्या वाचकांसाठी 

१) अमरिश पुरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 

अमरिश पुरी संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. देशभक्तीच्या दाखल्याने ते रोज संघाच्या शाखेमध्ये जात असल्याच ते आपल्या द अॅक्ट ऑफ लाईफ पुस्तकात सांगतात. ते म्हणतात, “ तेव्हा मी संघाच्या प्रत्येक कामात सहभागी होत असे. नंतरच्या काळात गांधीहत्या झाली. म. गांधीच्या हत्येचे आरोप संघावर आले. त्यानंतरच्या काळात माझी विचारसरणी बदलत गेली आणि मी संघातून नकळत बाहेर पडत गेलो. 

२) हिरो ते व्हिलन. 

वास्तविक अमरिश पुरींच स्वप्न हिरो व्हायचं होत. पण त्यांचा चेहरा दगडासारखा दिसतो अस सांगून एका दिग्दर्शकाने त्यांना नकार दिला होता. त्यानंतर त्यांना नाटकांकडे आपला मोर्चा वळवला. 

Screen Shot 2018 06 22 at 8.09.41 PM

३) सत्यदेव दुबे तालमीतला हिरो. 

इब्राहिम अल्काजी यांनी त्यांना १९६१ मध्ये नाटकांमध्ये आणलं. त्यानंतरच्या काही वर्षात अमरिश पुरी सत्यदेव दुबे यांच्यासोबत काम करु लागले. सत्यदेव दुबे यांच्या तालमित त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले.अमरिश पुरींनी देखील अनेकदा त्यांनी दुबेचा उल्लेख माझे गुरू असाच केला आहे. 

४) मुलाखत न देणारा माणूस.  

अमरिश पुरी कधीच ऑडिओ आणि व्हिडीओ मुलाखत देत नसत. त्याचं कारण त्याचा आवाज अस सांगितल जात. त्यामुळेच आज आपणाला अमरिश पुरी यांच्या मुलाखती पहायला मिळत नाहीत. जास्तीत जास्त ते मासिकांना मुलाखती देत असत. त्यातही जे मासिक त्या मुलाखतीची कवर स्टोरी करतील अशाच मासिकांना ते आपली मुलाखत देत असत. शिवाय अशी मुलाखत देतानासुद्धा ते आपला आवाज रेकार्ड होणार नाही याची काळजी घेत असत. 

५) स्टीवन स्पीलबर्गला भारतात बोलवणारे अमरिश पुरी.   

अमरिश पुरीच्या अभिनयाचा डंका हॉलिवूडपर्यन्त गेल्या नंतरची हि गोष्ट. अमरिश पुरीचं नाव ऐकून साक्षात स्टीवन स्पीलबर्ग यांनी त्यांना स्क्रिनटेस्टसाठी अमेरिकेत येण्याच आमंत्रण दिलं. मात्र अमरिश पुरी यांनी ते नाकारलं आणि स्टिवन स्पीलबर्गला गरज असेल तर त्यांनीच भारतात येवून स्क्रिनटेस्ट घ्यावी असा निरोप पाठवला. मग काय स्टिव्हन स्पीलबर्ग भारतात आला आणि अमरिश पुरींना आपल्या इंडियाना जोन्स एंड द टेंपल ऑफ डूम या सिनेमासाठी त्यांनी सिलेक्ट केलं. 

६) सर्वात जास्त मानधन घेणारा व्हिलन. 

अमरिश पुरींचा उल्लेख सर्वात जास्त मानधन घेणारा व्हिलन असा केला जातो. ते त्यांच्या काळात एक कोटी मानधन घेत असत. डायरेक्टर ओळखीचा असेल तरच हि रक्कम कमी होत असे. रमेश सिप्पी यांच्या फिल्म त्यांनी फक्त कमी मानधनामुळे सोडल्याची उदाहरणे आहेत. 

७) वयाच्या चाळीसाव्या वर्षी राजीनामा देवून सिनेमात. 

अमिरश पुरी वयाच्या चाळीसाव्या वर्षी रेशमा औंर शेरा या सिनेमातून चित्रपटात आले. तेव्हा ते राज्य विमा निगम मध्ये नोकरी करत असत. त्यांनी जेव्हा नोकरीचा राजीनामा दिला तेव्हा त्यांची २१ वर्ष नोकरी पुर्ण तर झालीच होती शिवाय ते क्लास वनचे अधिकारी देखील होते.

आज अमरीश पुरी यांची जयंती. अशा या महान कलाकाराला अभिवादन म्हणून गुगल सर्च इंजिनने ही त्यांचे डूडल आपल्या वेबसाईटवर टाकले आहे. 

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.