आणि आम्ही दूध पिऊन लिव्हरला सरप्राईज दिलं.

तसं बघायला गेलं तर आम्ही इंजिनियरिंग पहिल्या वर्षात सज्जनच होतो. पण त्याच वर्षीच्या ३१ डिसेंबरला आम्ही पहिल्यांदा सोमरस चाखलं. म्हणून काही आम्ही सज्जन उरलो नाही असं नाही पण आमच्या होस्टेल रेक्टरच मत तस झालं. आमची रवानगी होस्टेलच्या बाहेर झाली.

जग हॅपी न्यू इयर साजरी करत असताना आम्ही नवीन खोलीच्या शोधात फिरत होतो. एका दयाळू ब्रोकरच्या कृपेनं नवीन खोलीत आमची वळकटी रवाना झाली. इथं आमचा सज्जनपणा टिकून राहिला. त्याचं कारण आम्ही हुशार झालो होतो. ग्राफिक्स, M2 शिवाय वर्गातल्या पोरी यात पहिलं वर्ष कसं संपल कळालंच नाही.

नवीन वर्ष म्हणजे नवा अनुभव होता, सगळे आपआपल्या ब्रांच मध्ये विभागले गेले. पहिल्याच दिवशी लक्षात आलं की मेकॅनिकलच्या वर्गात पोरी नसतात. मागच्या वर्षीचे राहिलेले विषय शिवाय कोअर मेकॅनिकलचे विषय या मूळं जीव भंडावून गेला. आता म्हाताऱ्या साधूची(Old Monk) साथ कायमची सुरु झाली होती. वर म्हटल्याप्रमाणे शहाणं झाल्यामुळं सापडण्याचा प्रश्न नव्हता. घरमालकसुद्धा आम्हाला पकडण्याएवढे अनुभवी नव्हते.

गणपती येऊन गेले, दसरा येऊन गेला. सगळे दिवस सबमिशन, वायवा ओरल मध्येच संपून गेले. नाही म्हणायला कॉलेजमध्ये दांडिया होता पण आम्हाला कुठं खेळायला येतोय? मग आमच्यातला मराठी माणूस जागा झाला. असली गुज्जू थेरं करण्यापेक्षा मराठी सण साजरा केला पाहिजे याची चर्चा कम्प्युटर डिपार्टमेंटच्या पोरापोरीना ऐकू जाईल अशा आवाजात कट्ट्यावर बसून आम्ही करू लागलो.

पिएलचे दिवस होते. पिएल काय विचारू नका. ती परीक्षेच्या आधी अभ्यासासाठी म्हणून दिलेली सुट्टी असते असं म्हणतात. पण तिचा उपयोग फक्त जवळ येत असलेल्या परीक्षेचं टेन्शन वाढल्यामुळे झोपण्यासाठीच केला जातो. खरे इंजिनियर अभ्यास पेपरच्या आदल्या दिवशीच करतात. तर विषय हा होता की सण साजरा करायचा पण तो कोणता?

शेवटी आमच्या ग्रुपचे जोशीबुवा वदले, “आपण कोजागरी साजरी करायची.”  कोजागरी अगदी साग्रसंगीत साजरी करायची या निर्णयावर सभा बरखास्त झाली.आम्ही सगळे तयारीला लागलो. कॉलेज मध्ये आमचं नाव बल्क लिस्ट मध्ये असल्यामुळे प्रिन्सिपलनी दारात सुद्धा उभं केलं नाही. अखेर आमची रूम हाच व्हेन्यू ठरला. दोस्तमंडळीना आमंत्रण दिली. घरमालकांना परवानगी मागयला गेलो. काकांनी निम्मं वाक्य ऐकूनच नकार दिला. आतून काकुना आमचं कोजागरीचं बोलन ऐकू गेलं.

काकू म्हणाल्या, “अय्या कोजागरी? नक्की करा रे पोरानो. आपल्या टेरेसवर. आम्ही पण येतो.” काकूंच्या शब्दाबाहेर जाण्याची काकांची हिंमत नव्हती. आता इव्हेंटचा ताबा काकुनीं घेतला.  त्यांच्याच घरातला स्टोव्ह, मोठ्ठ पातेलं घेतलं. समोर एक गवळी मामा होते. त्यांना रिक्वेस्ट करून म्हैशीच ताजं आकडी दुधं आणलं. १० रुपयाची दुध मसाल्याची पुडी आणली. इलेक्ट्रॉनिकस डिपार्टमेंटच्या गण्याला मनोरंजनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याने रूम मधला कम्प्युटर टेरेस वर शिफ्ट केला. दोन बास आणले, त्याकाळी डीव्हीडी भाड्याने आणायची पद्धत होती. पठ्ठ्याने मर्डरची सीडी भाड्याने आणली. मग जोश्याला पाठवून कभी ख़ुशी कभी गम आणण्यात आलं.

रात्र झाली. चंद्र उगवला. दुध अजून आटलं नव्हत. घरमालकाच्या चौथीत शिकणाऱ्या पोराला दुध हलवायला बसवलो.सुरवातीला विरोध करणारे काका आता मात्र रंगात आले होते. त्यांनी कोजागरी की कोजागिरी?, कोजागरी चे खगोलशास्त्रीय महत्व, पुराणातला उल्लेख हे सगळ सांगून जाम बोअर केलं. शेवटी काकूंनी त्यांना थांबवलं. जोश्याला मस्त पैकी गझल म्हणयला लावली. “हे सुरांनो चंद्र व्हा ” म्हणताना त्याचा आवाज काय लागलेला आजही तसाच आठवतोय.

कॅलेंडर प्रमाणे मुहूर्ताची वेळ झाल्यावर काकूंनी दुध चंद्राला दाखवलं, प्रत्येकाला ग्लास मध्ये घालून दिल. आईशप्पथ सांगतो घरची आठवण आली. इंजिनियरिंगला आल्यापासून पहिल्यांदाच आमच्या ग्लासना दुधाचा स्पर्श झाला होता.  सवयीप्रमाण आपोआप ग्लासनी चियर्स केलं. काकांनी केलेल्या मोठ्या डोळ्याकडे दुर्लक्ष करत आम्ही आमचे ग्लास रिकामे केले. दुध भरपूर शिल्लक राहिलेलं. परत ग्लासचे राउंड भरण्यात आले. कम्प्युटरवर शांत गाणी सुरु होती. K3G आणी मर्डरच्या सिड्या तशाच धूळ खात पडल्या होत्या.त्या परत दुसऱ्या दिवशी उपयोगी पडल्या ही गोष्ट वेगळी.

मध्यरात्र होत आल्यावर घर मालकांची फॅमिली खाली गेली. टेरेसवर फक्त आम्हीच उरलो .

अशा अनेक थंडरात्री आम्ही त्या टेरेसवर जागून काढल्या होत्या मात्र त्या रात्रीची नशाच वेगळी होती. कधी नव्हे ते दुध पिऊन लिव्हरला आम्ही सरप्राईज दिल होतं. कोणीही जास्त काही बोलण्याच्या मूड मध्ये नव्हतं. ना पोरी भाव देत नसल्याचे विषय, ना परीक्षेच्या टेन्शनचे विषय. पहिल्यांदाच शुद्धीत बघत असल्यासारखं आकाशात चंद्र आणि तारे स्पष्ट दिसत होते. मन सुद्धा तसच निरभ्र झालं होत. असं म्हणतात की कोजागरीच्या दिवशी चंद्र्प्रकाशातून अमृतवृष्टी होत असते. खरं खोट काय माहित पण आमच्या साठी ती कोजागरीची रात्र अमृताच्या कुपीसारखी कायम आठवणीच्या कोपऱ्यात राहील.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.