100 रुपये महिना कमावणाऱ्याचा स्टार्टअप आज लाखोंची उलाढाल करतोय

कष्ट केलं की, एक ना एक दिवस यश मिळतचं असं म्हणतात. पण या यशात चांगल्या विचारसरणीची जोड असेल तर त्यात वाढ ही होतचं असते. यातचं एक उदाहरण म्हणजे चेन्नईचे बी. एल. बेंगानी. ज्यांनी आपल्या मेहनतीने आयुष्यात यश तर मिळवलेच, पण पर्यावरण वाचवण्याचा अनोखा मार्गही शोधून काढला.

आता प्लायवूड हे सहसा: झाडांच्या लाकडापासून तयार होतं. पण बेंगानी हे प्लायवूडचा व्यवसाय तर करतातयेत, पण एकही झाडं न तोडता. आणि या व्यवसायातून त्यांची कंपनी करोडोंची उलाढाल सुद्धा करतेय.

म्हणजे कसं ना भात आणि गव्हाची पिकं घेतल्यानंतर शेतकरी उरलेला पेंढ्या जाळतात, कारण त्याचा दुसरा उपयोग होत नाही असं त्यांना वाटतं. त्याच वेळी, अनेक राज्यांमध्ये या पेंढ्यांच्या जाळामुळे निघणारा धूर हे वायू प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना सारखी विनंती करत की या पेंढ्या जाळू नका. पण आजही त्यामुळे होणारे नुकसान अनेकांना समजू शकलेले नाही. 

पण बेंगानी यांच्यासारख्या पर्यावरण संवेदनशील माणसांना या समस्येचं गांभीर्य समजलं, आणि नुसतं समजलतं नाही तर ते सोडवण्याचा नवा मार्गही शोधला.

 बेंगानी यांनी एक स्टार्टअप सुरू केला आहे, ज्यामध्ये ते पेंढ्यांपासून प्लायवूड बनवण्याचे काम करतात. बी.एल.बेंगानी हे चेन्नईमध्ये स्टार्टअप इंडोवुड डिझाइन टेक्नॉलॉजीचे संस्थापक आहेत. या स्टार्टअपमध्ये 61 वर्षीय बेंगानी यांच्या सोबत मुलगा वरुण बेंगानी आणि मुलगी प्रियांका कुचेरिया सुद्धा आहेत.

बेंगानी यांनी सुरू केलेल्या या स्टार्टअपमध्ये प्लायवूड तयार करण्यासाठी भाताच्या पेंढ्यासारखा अॅग्री -वेस्ट वापरला जातो. या इको फ्रेंडली नैसर्गिक फायबर कंपोझिट बोर्डचा उपयोग फर्निचर, घराची सजावट किंवा इतर वस्तू बनवण्यासाठी करता येतो.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बेंगानी यांनी म्हटलं की, ते मूळचे राजस्थानचे. 1972 मध्ये ते आपल्या कुटुंबासह कोलकाता येथे गेले. त्यांचे वडील ज्यूट मिलमध्ये काम करायचे. त्या काळात त्यांचे कुटुंब निम्न मध्यमवर्गीय कुटुंबासारखे जगत होते. कुटुंबाची परिस्थितीमुळे बेंगानी यांना दहावीपासूनचं काम करावं लागलं.

ते दिवसभर काम करायचे आणि कामामुळे त्याचा अभ्यास चुकू नये म्हणून त्यांना नाईट कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. अशा प्रकारे ते अभ्यासासोबतच काम करू लागले. त्यांनी ऑफिस बॉय म्हणून कामाला सुरुवात केली. ज्यासाठी त्यांना महिन्याला फक्त 100 रुपये मिळायचे. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी काम केले. पण कामासोबतच त्यांचा अभ्यासही सुरू राहिला आणि त्यांनी बी.कॉम. पूर्ण केलं. 

बी.कॉम. पूर्ण केल्यानंतर, बेंगानी काही चांगल्या नोकरीच्या शोधात होते आणि या शोधात ते कोलकाताहून चेन्नईला गेले. 1987 मध्ये बेंगानी यांना चेन्नईतील एका कंपनीत अकाउंटंटची नोकरी मिळाली. या कामानंतर बेंगानी यांना प्लायवूड कंपनीत मार्केटिंगचे काम सांभाळण्याची संधी मिळाली.

मजबुरीमुळे बेंगानी यांना एकामागून एक नोकऱ्या सोडायला लागल्या. पण प्रत्यक्षात त्यांना नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. काम करत असताना सुद्धा स्वतःच्या कामाचे स्वप्न बेंगानी विसरले नाहीत. यामुळेच काही वर्षे प्लायवूड उद्योगात काम करण्याचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी उघडण्याचा निर्णय घेतला.

पण आर्थिकदृष्ट्या ते तितके सक्षम नव्हते, पण असे असतानाही स्वत:वर विश्वास ठेवून त्यांनी रिस्क घ्यायचं ठरवलं. मेहनत केली तर नक्कीच यश मिळेल याची त्यांना खात्री होती. आणि नशिबाने त्यांना साथ दिली.

बेंगानी यांनी 1997 मध्ये इतर देशांतील उच्च दर्जाचे प्लायवूड बोर्ड विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतः बोर्ड बनवण्यास सुरुवात केली. 2001 मध्ये त्यांनी स्वतःचा कारखाना काढला. बोर्ड बनवण्यासाठी ते बर्माहून कच्चा माल आणायचे.

पुढे 2010 मध्ये बेंगानी यांचा मुलगा या कामात पार्टनर बनली. कोटय़वधींची उलाढाल देत कंपनी चांगली चालली होती, पण असे असतानाही 2014 मध्ये बेंगानी यांनी हा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. ही एक अतिशय जोखमीची चाल असली तरी त्यामागे बेंगानी यांची चांगली विचारसरणी होती, त्यामुळे ते धोका पत्करण्यास घाबरत नव्हते.

अखेरीस 2015 मध्ये बेंगानी यांनी त्यांची कंपनी दुसऱ्या गुंतवणूकदाराला दिली आणि स्वत: वेगळ्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली.

बेंगानी यांचा मुलगा वरुण यांच्या म्हणण्यानुसार असे करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची पर्यावरणाविषयीची वाढती संवेदनशीलता. बेंगानी आणि त्यांच्या मुलांना प्लायवूडचे काम करायचे होते पण त्यासाठी झाडे तोडायची नाहीत. झाडं न कापता लाकूड कुठून मिळणार आणि लाकडांशिवाय प्लायवूड कसं बनवायचं हे ऐकायला विचित्र वाटतं.

पण अडीच वर्षांच्या रिसर्चनंतर बेंगानी आणि त्यांच्या मुलाने लाकडांशिवाय प्लायवूड बोर्ड बनवण्याचा मार्ग शोधला. त्यांनी नैसर्गिक फायबर, अॅग्री-वेस्ट आणि इतर काही पदार्थांचे मिश्रण करून हाय क्वालिटीचे प्लायवूड बोर्ड तयार करण्यास सुरुवात केली. इतर प्लायवुड प्रमाणे, ते घर, हॉटेल, कॅफे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी फर्निचर बनवण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात.

महत्त्वाचे म्हणजे या प्लायवूडची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते बनवण्यासाठी निसर्गाला कुठल्याही प्रकारची इजा करावी लागत नाही. ते बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया साधी सोपी आहे. अहिंसेवर विश्वास असणाऱ्या बेंगानी यांना आपल्या कामात सुद्धा हे तत्त्व पाळायचं होतं.

या कंपनीतील आणखीन एक पार्टनर म्हणजे बेंगाली यांची मुलगी प्रियांकाने सांगितले की,

त्यांची कंपनी सध्या फक्त भात गिरण्यांमधून हे प्लायवूड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेंढ्या विकत घेत आहे. कारण कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटणे आणि पेंढ्या खरेदी करणे शक्य होत नाही.

पण , त्यांची पुढची योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्याकडून पेंढ्या विकत घेणे आहे , ज्यामुळे शेतकर्‍यांना या स्टार्टअपचा फायदा होईल.

सध्या बेंगानी त्यांच्या नवीन स्टार्टअपची वार्षिक उलाढाल म्हणालं तर कोट्यवधींची आहे पण कोरोना महामारीचा फटका त्यांच्या व्यवसायालाही बसला आहे. सध्या यांच्यासोबत 40 जणांची टीम काम करत आहे. त्यांना पुढे अजून आपला व्यवसाय वाढवायचा असून यातून अनेकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून द्यायचा आहे.

 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.