अण्णाभाऊंना मिळालेला तो १ रुपया बैलगाडीच्या चाकासारखा होता..

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नुसतं हे नाव जरी समोर आलं तरी त्यांच्याशी संबंधित हजारो विषय खुले होतात. त्यात अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या असतील किंवा त्यांची दर्जेदार गाणी असतील.

 जग बदल घालुनी घाव,

सांगून गेले मला भीमराव

अण्णाभाऊंच्या या दोन ओळी त्याकाळात तुफ्फान गाजल्या होत्या. सोबतच

माझी मैना गावावर राहिली

माझ्या जीवाची होतीया काहीली

ही छक्कड संबंध महाराष्ट्रात अजरामर झाली आणि अजुनही तिची झिंग मराठी माणसात धुमसत आहे. दीड दिवसांची शाळा शिकलेले अण्णाभाऊ साहित्यरत्न ठरले, रशियाला गेले आणि तिथं जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले. एक गाणं किती मोठा परिणाम करतं याचं उदाहरण म्हणजे अण्णाभाऊंची गाणी.

ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ ऐन जोमात सुरू झाली होती तेव्हा मुंबईत अण्णाभाऊंची ‘ मैना ‘ शाहीर अमर शेख जेव्हा गायचे तेव्हा तिथं जमलेला जमाव त्यांना कोरस द्यायचा ही विलक्षण घटना होती.

असाच एक गाण्याचा किस्सा विश्वास पाटील यांनी आपल्या अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तां या पुस्तकात सांगितला आहे.

गिरणीत कामाला असताना अण्णाभाऊंच्या कविमनाने उभारी घेतली. तिथे ते गीतं आणि पोवाडे लिहू लागले. त्याचदरम्यान कम्युनिस्ट पक्षाचे मेळावे, मिरवणुका मुंबईत सुरू झाल्या होत्या तिकडे अण्णाभाऊ ओढले गेले. गोड गळा हे भांडवल सोबतीला असल्यामुळे अण्णाभाऊ शिवाजी महाराजांचे, बाजीचे पोवाडे गाऊन नाव प्रसिद्ध होत होते.

त्याच दरम्यान अण्णाभाऊंनी पानिपतच्या लढाईवरसुद्धा पोवाडे वजा एक सुंदर काव्यरचना केली. हा पोवाडा उभ्या गर्दीने ऐकला आणि सगळेच शांत झाले कारण अण्णाभाऊंच्या सुरांनी आसमंत दणाणून सोडला होता आणि तिथं उभ्या असलेल्या गर्दीच्या अंगावर शहारे होते.

अण्णाभाऊंची प्रतिभा पाहून आणि तो पानिपतचा पोवाडा वाचून तेव्हा देशपांडे नावाच्या एका गृहस्थाने खुश होऊन अण्णाभाऊंना एक रुपया बक्षीस दिला होता. 

तेव्हाचा एक रुपया म्हणजे सामान्य माणसाला बैलगाडीच्या चाकासारखा वाटायचा. कारण त्या काळी कऱ्हाड ते मुंबई या प्रवासाचे रेल्वे भाडे ७५ पैसे होते.

त्यामुळे काव्य लेखनाचा व्यवसाय बरा असं अण्णा भाऊंना तेंव्हा वाटलं होतं. एके दिवशी त्यांच्या हाती शिवरायांच्या चरित्राचे इतिहासाचे पुस्तक लागले. ते वाचता वाचता त्यांच्या कल्पनेतला घोडा चौफेर उधळू लागला आणि तिथून पुढे ऐतिहासीक पोवाड्यांचा झरा प्रकट होऊ लागला.

अशा या महान प्रतिभेच्या लेखकाने शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त गीत लिहिलं ते म्हणजे

दौलतीच्या राजा, उठून सर्जा

हाक दे शेजाऱ्याला र

शिवारी चला…..

अनेक अनुभव गाठीशी असलेले अण्णाभाऊ साठे एक अस्सल कवी होते. गाण्यांची चाल, शब्दांच मीटर यावर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यामुळे महाराष्ट्राचा एक कसदार आणि दर्जेदार गीतकार म्हणून अण्णाभाऊ प्रसिद्ध झाले. “आहे साहित्याची खाण, अण्णाभाऊंचं लिखाण…. “असं म्हणतात ते उगाच नाही. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.