संपुर्ण भारतातून राम मंदिरासाठी पहिली चांदीची वीट पाठवली होती ती आनंद दिघे यांनीच…

ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आनंद दिघे. हिंदूत्व आणि हिंदूत्ववादी विचार ठाण्याच्या घराघरात घेवून जाण्याचा काम आनंद दिघेंनी केल्याचं सांगितलं जातं. आनंद दिघेंची लोकप्रियता इतकी अफाट होती की, त्यांच्या एका हाकेवर ठाणेकर रस्त्यावर उतरत असे.
ठाणे शहराच्या मध्यभागी भरणाऱ्या टेंभीनाक्यावर त्यांचा आनंद दरबार चालायचा. या दरबारामध्ये अडल्यानडलेल्या लोकांना मदत केली जायची त्यामुळेच आनंद दिघेंची लोकप्रियता अफाट होती.
आनंद दिघे कडवट हिंदूत्ववादी नेते होते..
जितकी आनंद दिघेंची लोकप्रियता होती तितकेच ते हिंदूत्ववादी नेते म्हणून देखील ओळखले होते. रोजची पुजा-अर्चा, व्रत हे त्यांच्यासाठी नित्याचीच बाब होती. टेंभीनाक्यावरील नवरात्र उत्सवाला त्यांनी मोठ्ठे रुप दिले.
कल्याणमधील हाजीमंगल गड हा हा हिंदूंच्या नवनाथांच श्रद्धांस्थान असल्याचा त्यांचा दावा होता. त्यातूनच माघी उत्सव सुरू करुन मलंगगड या नावाची सुरवात त्यांनी केली. तर आज मुंबई आणि ठाण्यात प्रसिद्ध असणाऱ्या दहिहंडी उत्सवास मोठ्ठं रुप देण्याचं क्रेडिट देखील आनंद दिघेंनाच जात..
आनंद दिघेंच्याच नेतृत्वात अयोद्धेच्या राम मंदिरासाठी भारतातून पहिली चांदीची वीट अयोद्धेला पाठवण्यात आली होती.
साल होतं १९८७
तोपर्यन्त बाबरी मशिद म्हणावी तितकी चर्चेत नव्हती. किंबहूना बाबरी मशिद तेव्हा पाडण्यात आली नव्हती. पण अयोद्धेत राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला होता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा देखील राम मंदिर उभारण्यासाठी पाठिंबा होता. अशा काळात आनंद दिघेंनी अयोद्धेत राम मंदिर होणारच हा संकल्प केला व त्यावरून ठाण्यात जनमत उभारण्यास सुरवात केली होती.
राम मंदिर उभारण्यासाठी लोकसहभागातून चांदीची वीट अयोद्धेला पाठवण्याचा निर्धार करण्यात आला..
चांदीची वीट पाठवायची हा निर्धार तर झाला होता पण त्यासाठीचा खर्च देखील मोठ्ठा होता. हे काम लोकसहभागातून करण्याचा विचार झाला. त्यासाठी ठाण्यातील प्रत्येक घरातून रोख पैसे न घेता चांदी घेण्याचा विचार समोर आला. एकामागून एक लोक आपल्या घरातील चांदी देत गेले.
अगदी झोपडपट्टीतून देखील राम मंदिरासाठी चांदी देण्यात आली. एकएक करत तब्बल सव्वा किलोची चांदी काही दिवसातच जमा झाली आत्ता प्रश्न होता तो वीट तयार करण्याचा.
टेंभीनाक्यावरच कन्हैयाभाई रावल ऊर्फ कन्हुभाई यांचे सराफ दुकान होते. त्यांच्याकडे ही सव्वाकिलो चांदी देण्यात आली. ही चांदी वितळवून त्याला विटेच स्वरुप दिलं ते कन्हुभाईंनीच. त्यांनी चांदीला विटेचा आकार देवून त्यावर जय श्री राम कोरून घेतलं.
टेंभी नाक्यावर मोठ्ठा उत्सव पार पडला
चांदीची वीट पाठवण्यासाठी आठ दिवसांचा उत्सव आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं. पण इथे चांदीच्या वीटची सुरक्षा महत्वाची होती. अशा वेळी चांदीची वीट अयोद्धेला पाठवायची आणि इकडे दुसऱ्या चांदीच्या वीटेची विधिवत पूजा आठ दिवस सुरू ठेवायची असा विचार करण्यात आला पण दुसरी चांदीची वीट तयार करणं आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षेच्या विचारातून शक्य नव्हतं.
त्यानंतर चंदनाचे लाकूड घेवून त्यावर चांदीचा पत्रा मारण्याची कल्पना समोर आली त्यानूसार चंदनाच्या लाकडास चांदीचा पत्रा मारलेली वीट टेंभीनाक्यावर सलग आठ दिवस पुजली जात होती. ठाण्याच्या प्रत्येक घरातून या प्रतिकात्मक वीटेची विधिवत पूजा करण्यात आली.
गजानन पट्टेकर महाराज यांनी दोन्ही वीटांची विधीवत पुजा पार पाडली. तर खरी चांदिची वीट अयोद्धेला राम मंदिराच्या उभारणीसाठी रवाना करण्यात आली..
हे ही वाच भिडू
- धर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात?
- फक्त आनंद दिघेंच्या सांगण्यावरून बाळासाहेब त्या आदिवासी खेड्यात प्रचाराला आले.
- धर्मवीर आनंद दिघे यांच्या अफाट लोकप्रियतेचं काय कारण होतं?