‘आनंद’ सिनेमाची स्टोरी सुचण्यामागे राज कपूरच्या जीवनातला एक प्रसंग होता.

साधारण १९५१-५२ च्या सुमारास राजा नवाथे ‛आह’ हा सिनेमा बनवत होते. हिरो होता राज कपूर. अर्थात प्रोड्युसर सुद्धा तोच होता. या सिनेमाचे एडिटर होते हृषीदा, म्हणजेच ऋषिकेश मुखर्जी.

शंकर-जयकिसन, नर्गिस, मुकेश ही राज कपूरची सगळी दोस्त मंडळी सिनेमात काम करत होती. खुद्द राजा नवाथे एकेकाळी राज कपूरचे असिस्टंट डायरेक्टर होते. एकदम फ्रेंडली वातवरणात आर. के. स्टुडियोमध्ये खेळीमेळीत शुटींग चालू होते. अचानक एक दिवस बातमी आली की राज कपूरला हृदयविकाराचा झटका आलाय. सगळ शुटींग थांबल. राज कपूर दवाखान्यात अॅडमिट झाला.

अटॅक मोठा नव्हता. काही दिवस विश्रांती घेतली,  उपचार करून घेऊन राज कपूर परत शुटींगवर हजर झाला. हा परत आलेला राज कपूर पूर्वीप्रमाणेच हसरा, खेळकर, चेष्टेखोर आणि उत्साही होता. जणू काही झालेच नाही अशा थाटात त्याने परत आपल्या कामाला सुरुवात केली.

हे सगळ हृषीदा जवळून बघत होते. राज कपूरचा उत्साह बघून ते कमालीचे आश्चर्यचकित झाले! त्याकाळात त्यांच्या डोक्यात कायम आपला भावी सिनेमा, त्याची स्टोरी याच्याबद्दल विचार चालायचा. जवळ जवळ मृत्यूच्या भोज्ज्याला शिवून आलेल्या राज कपूरचे हे रूप बघून त्यांच्या डोक्यात एक कथानक जन्माला आले. स्टोरी होती,

‘जीवघेणा आजार झालेला रुग्ण शेवटपर्यंत स्वतः आनंदी राहून इतरांनाही कायम आनंदी ठेवतो आणि स्वतः हसत हसत मृत्यूला कवटाळतो’,

पुढेमागे आपण डायरेक्टर झालो तर, या कथानकावर खुद्द राज कपूरलाच घेऊन पिक्चर बनवायचा असं त्यांनी त्याच क्षणी मनात ठरवल. इतकच नाही तर राज कपूरला कथा ऐकवून त्याचा होकारही घेऊन ठेवला. शिवाय, हा आपला पहिलाच चित्रपट असल्याने तो भारी आणि ग्रँड व्हावा म्हणून दिलीपकुमार आणि देव आनंद या बाकीच्या सुपरस्टारनाही या चित्रपटात भूमिका देण्याचे त्यांनी मनाशी पक्क केल.

आह तयार झाला, रिलीज झाला. आग, बरसात, आवारा सारखे यश त्याला मिळाले नाही.

ऋषिकेश मुखर्जी मात्र आता आपल्या फिल्मच्या मागे लागले. सगळी जुळवाजुळव सुरु केली. मात्र कसलेही आर्थिक पाठबळ नसणाऱ्या एका नवशिक्या एडिटरला थेट सिनेमा बनवणे इतके सोपे नसते. परंतु ४-५ वर्षांत हृषीदा ‘मुसाफिर’ सिनेमा बनवून चित्रपट निर्माते-दिग्दर्शक झालेही.

पण राज कपूरच्या चित्रपटाचा योग काही येत नव्हता. मात्र जेव्हा कथानकावर बनणाऱ्या सिनेमाची म्हणजेच आनंदची तयारी फायनल होत आली तोवर एक-दीड तपाचा काळ उलटून गेला होता. बऱ्याच गोष्टी कमालीच्या बदलल्या होत्या. मुख्य म्हणजे राज कपूरचे वय आणि शरीरयष्टी तरुण हिरोला साजेशी राहिलेली नव्हती.

आता नवा आणि सूट होणारा हिरो शोधण आलं. हा सिनेमा कॉमेडी नसला तरी हिरो हा खेळकर स्वभावाचा असल्याने किशोरकुमार आणि  मेहमूदला घ्यायचं ठरलं. किशोरकुमारने होकार ही दिला होता. पण गोंधळ असा झाला की हृषिदा त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले पण किशोर कुमारच्या वॉचमनने त्यांना घरात आत शिरू दिल नाही.

झालं असं होत की किशोरकुमारचे पैसे एका बंगाली प्रोड्युसरने बुडवले होते आणि म्हणून त्याने आपल्या वॉचमन ला सांगितलं होतं की ते बंगाली सद्गृहस्थ आले की त्यांना आत सोडू नको. योगायोगाने हृषिदा देखील बंगाली होते. गेट किपरने गडबडीत त्यांनाच हाकलून लावलं.

हृषिदा भडकले. बंगाली मध्ये शिव्या घालत तिथून निघून गेले. त्यांनी किशोर कुमारची आनंद मधून सुट्टी केली. एवढच काय त्यांनी सिनेमामध्ये किशोरदांना गाऊ दिल नाही.

पुढे मग शशी कपूर, संजीव कुमार वगैरे ना विचारण्यात आलं पण मानधनाचा आकडा बघून कोणीच तयार होईना. अखेर हृशिदानी धाडस केलं आणि थेट राजेश खन्नाला विचारलं. खर तर राजेश खन्नाचे आराधना वगैरे सिनेमे नुकतेच सुपरहिट झाले होते. तो पुढचा सुपरस्टार म्हणून गणला जात होता. राजेश खन्नालासुद्धा ऋषिकेश मुखर्जी सारख्या वेगळ्या पठडीच्या दिग्दर्शकासोबत काम करायचं होतं. त्याने कमी पैशातही काम करण्यासाठी होकार दिला.

या चित्रपटाला रूढ नायिका नव्हती, म्हणून त्या भूमिकेसाठी कोणाला निवडायचे हा प्रश्न नव्हता. कथेत मोजकीच पात्र असल्याने अन्य भूमिकांत नवा आलेला अमिताभ बच्चन, सुनिता सन्याल, रमेश देव, सिमा यांची निवड केली. ललिता पवार, असित सेन, दुर्गा खोटे, दारा सिंह, ब्रम्ह भारद्वाज आणि जॉनी वॉकर यांची पाहुणे कलाकार म्हणून निवड झाली.

स्वतः हृषीदानीं गुलजारच्या सहाय्याने पटकथा लेखन केले. गेली अनेक वर्षे या कथेवर चिंतन-मनन झालेले असल्याने संपूर्ण चित्रपट त्यांच्या डोळ्यांसमोर होता. त्यामुळे पटकथा आटोपशीर आणि बांधेसूद झाली. सर्वसाधारणपणे व्यावसायिक गरज म्हणून नायिकेचे पात्र निर्माण करण्याचे आणि त्या भूमिकेत तत्कालीन लोकप्रिय अभिनेत्रीला चमकावण्याचा मोह कुठल्याही दिग्दर्शकाला झाला असता, पण हृषीदानी तो मोह टाळला. प्रत्येक प्रसंग विचारपूर्वक घालून त्याचे ताकदीने चित्रीकरण करण्यास त्यांनी कसूर केला नाही.

आपल्या आयुष्याचे काही महिनेच उरले असून त्यानंतर आपला मृत्यू अटळ आहे, हे मनोमन ओळखून आनंदाने आणि जिंदादिलाने वागणाऱ्या आनंदची भूमिका राजेश खन्नाने आपल्या सहज सुंदर, उत्स्फूर्त आणि अकुत्रिम अभिनयाने अजरामर करून ठेवली आहे. या भूमिकेचे त्याने सोने केले आहे. येता जाता सतत स्वतः हसणारा, दुसऱ्यांंनाही हसवणारा, जाईल तेथे आपल्या वागण्या-बोलण्याने कायम प्रसन्नतेचा शिडकावा करणारा हा तरुण कॅन्सरचा रुग्ण वाटतच नाही. हे. त्याच्या खास शैलीत, ऋजु आवाजात त्याने मारलेल्या ‘बाबूमोशाय!’ या हाका त्या वेळेस तरुण-तरुणींत चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. ही राजेश खन्नाची निःसंशय सर्वोत्कृष्ट भूमिका !

असं म्हणतात की राज कपूर हृषिदाना बाबू मोशाय म्हणायचे म्हणून त्यांनी हेच संबोधन सिनेमात देखील वापरलं. एवढच नाही तर राज कपूर यांना ट्रिब्युट म्हणून ऋषिकेश मुखर्जी यांनी त्यांच नाव सिनेमाच्या श्रेय नामावली मध्ये देखील घातल.

हे सगळ झालं पण अमिताभ बच्चनचं काय?

असं म्हणतात की देवयानी चौबळ म्हणून एक पत्रकार होत्या. राजेश खन्ना त्यांचा चांगला मित्र होता. त्याच पहिल्या होत्या ज्यांनी राजेश खन्ना ला सुपरस्टार म्हटल होतं. त्यांनी या सिनेमाच्या प्रिमियर शो नंतर अमिताभची अक्टिंग, त्याचा आवाज ऐकून राजेश खन्नाला सांगितलं होतं की,

“ये लडका आगे जाके तुम्हे कॉम्पीटेशन बनेगा.”

राजेश खन्ना ने ते कितपत सिरीयस घेतलं ठाऊक नाही पण देवयानी चौबळचे शब्द पुढे जाऊन अगदी खरे ठरले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.