अंबानींची धाकटी सून म्हणून राधिकाच्या नावाची चर्चा २०१८ पासूनच!
अंबानी कुटूंबातलं लग्न म्हणजे राजेशाही थाट! अगदी मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिच्या लग्नातला थाट तर तुमच्या लक्षात असेलच की. म्हणजे, तो थाट इतका होता की, तुम्ही किंवा मीच काय पण कुणीच ते विसरू शकत नाही. अगदी बॉलिवूडमधले मोठ मोठे स्टार्स या लग्नात जेवण वाढताना दिसले. आता लवकरच हे सगळं पुन्हा दिसू शकतं.
आज मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंट हिच्याशी साखरपुडा झाला आणि लवकरच लग्नसोहळा सुद्धा पार पडणार आहे. दरम्यान या दोघांच्या लग्नाच्या चर्चा २०१८ पासूनच सुरू होत्या.
नेमकं कधी आणि कश्यामुळं राधिका-अनंतच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या?
राधिका मर्चंट ही २०१८ मध्ये इशा अंबानीच्या लग्नातसुद्धा दिसली होती. म्हणजे ती लग्नामध्ये नाचताना दिसली आणि अंबानी परिवाराच्या अगदी जवळ होती. तेव्हाच बऱ्याच मीडिया रीपोर्ट्सने इशा आणि अंनंत यांचं लग्न होणार असल्याच्या बातम्या दिल्या होत्या.
त्यानंतर मग, २०१९ मध्ये इशाच्याच लग्नात राधिकाने अनंतचे वडील मुकेश अंबानी यांच्यासोबत ठेका धरल्याचे व्हिडीओ समोर आले होते. मग, पुन्हा अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या चर्चा आणि अफवा सुरू झाल्या.
पण या सगळ्या बातम्यांनी जोर धरला तो आता २०२२ च्या जून महिन्यात. त्याचं झालं असं की, जियो वर्ल्ड सेंटरमध्ये राधिकाचा भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम झाला. आता मीडियाने घेतलेली दखल ही राधिकाची किंवा तिच्या नृत्याविष्काराची नव्हती तर, तिने ते नृत्य हे मुकेश अंबानी आणि त्यांच्या परिवाराच्या उपस्थितीत सादर केलं होतं ही होती.
तिचा हा कार्यक्रम होता तो अरंगेत्रम. आता हे अरंगेत्रम काय असतं तर, भरतनाट्यम या नृत्यप्रकारातलं शिक्षण पुर्ण झालं की अरंगेत्रम करायचं असतं आणि मग, या अरंगेत्रम कार्यक्रमातूनच ती व्यक्ती रंगमंचावर पदार्पण करते.
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यासुद्धा भरतनाट्यम नृत्य शिकल्यात.
आता बघुया ही राधिका मर्चंट कोण आहे?
एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची ती मुलगी आहे. तिने प्राथमिक शिक्षण हे मुंबईतच घेतलं. मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडिएल वर्ल्ड स्कूलमध्ये तिने शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर, तिने बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून आयबी डिप्लोमा पूर्ण केला.
राधिका मर्चंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटीक्स आणि अर्थशास्त्रात पदवी मिळवली.
त्यांतर ती भारतात परतली आणि तिने इस्प्रावा या भारतातल्या मोठ्या रीयल इस्टेट कंपनीजपैकी एक असलेल्या कंपनीत सेल्स एक्झिक्यूटीव्ह म्हणून जॉब करायला सुरूवात केली. आता मुळात एका कंपनीच्या सीईओची मुलगी असूनही दुसऱ्या कंपनीत जॉब केल्यामुळे तिचा मेहनती स्वभाव दिसतो.
सध्या ती एनकोर हेल्थकेअरच्या डिरेक्टोरियल बॉडीवर आहे.
याशिवाय राधिकाचं प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. ती प्राण्यांसाठी काम करणाऱ्या काही एनजीओजसाठीही काम करते. राधिकानं जवळपास ८ वर्ष भरतनाट्यमचं शिक्षण घेतलंय. श्री निभा आर्ट्सच्या गुरू भावना ठाकर यांची ती भरतनाट्यममध्ये शिष्या आहे.
अनंत आणि इशाचा हा प्रेमविवाह आहे. दरम्यान, राधिका ही नीता अंबानी आणि इशा अंबानी यांच्याही अतिशय मर्जीतली आणि जवळची आहे असंही काही रिपोर्ट्स सांगतात. दरम्यान, ४-५ वर्षांपासून सुरू असलेल्या या दोघांच्या चर्चा खऱ्या असल्याचं आज समजलं असलं तरी लग्न नक्की कधी होणार हे अजून जाहीर झालेलं नाही.
इशा अंबानींच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी ज्याप्रकारे शाही सोहळा पार पाडला होता, तसाच काहीसा सोहळा पुन्हा पाहायला मिळेल इतकं नक्की.
हे ही वाच भिडू:
- नातवंडांच्या खुशीत अंबानी गाडी, बंगले, कपडे-लत्ते दान करण्यापेक्षा फक्त सोनंच का दान करत आहेत ?
- अंबानी- अदानी ग्रुपमध्ये झालेलं “नो पोचिंग करार” काय आहे ?
- घरात आधी वाटण्यांमुळे झालेला राडा नको म्हणूनच अंबानींनी रिलायंसच्या अशा वाटण्या केल्यात