शांतारामबापूंचा पठ्ठ्या मदतीला धावून आला अन् पिंजरा सुपरहिट झाला.. 

बाईचा नाद लय वाईट. या नादापायी चांगली चांगली माणसं बरबाद झाली. १० एकर पासून फुकून खाणाऱ्यांची सुरवात होते ती अगदी शेकडाच्या एकरात जाते ती उगीच नाही. प्रेमभंगाची कथा सांगणारा पिंजरा हा सिनेमा. यात गुरूजी बाईच्या नादाने स्वत:ची वाताहात करून घेतात हे दाखवलय.

पण  प्रत्यक्षात पिंजरा एका गुरूची गुरूदक्षिणा देणाऱ्यासाठी तयार करण्यात आलेली अजरामर कलाकृती होती. 

व्ही. शांताराम अर्थात शांताराम बापूंच नाव कोणाला माहित नाही. अगदी बॉलिवूडला जितेंद्र सारखा अभिनेता देण्याचं क्रेडिट शांताराम बापूंना जातं. पिंजरा या सिनेमाने मराठी चित्रपट सृष्टीला श्रीराम लागूंसारखा अभिनेता देण्याचं श्रेय देखील त्यांच्याकडेच जातं.. 

पण तेव्हा शांताराम बापूंचा फॉर्म मोडलेला. जल बिन मछली, नृत्य बिन बिजली असा एक आपटलेल्या सिनेमामुळे शांताराम बापू खर्चात पडलेले. कमी वेळात चांगली कमाई करून देणारा सिनेमा काढावा या विचारात ते होते… 

तेव्हा त्यांना एक जून नाव आठवलं, ते नाव होतं अनंत माने 

अनंतर माने यांनी प्रभात मध्ये शांतारामबापूच्या हाताखाली बिनपगारी सुरवात केली होती. ते साल होतं १९३४-३५ चं. तेव्हा अनंत माने अगदी तरुण पोरगं होते. आणि आत्ताचा काळ होता १९७१ चा.  किमान चाळीस वर्षांचा काळ लोटला होता. या मधल्या काळात अनंत माने हे स्वकर्तृत्वावर पुढे आले होते.. 

त्यांनी जवळपास त्या वेळी ४० चित्रपटांच दिग्दर्शन केलं होतं. सागत्ये ऐका १३१ आठवडे, एक गाव बारा भानगडी ६० आठवडे, केला इशारा जाता जाता ७१ आठवडे, सवाल माझा ऐका ६० आठवडे असे वेगवेगळे सुपरहिट विक्रम त्यांच्या नावावर होते.. 

शांताराम बापूंना या वेळी अनंत मानेंची आठवण आली. झालेल्या खर्चातून सोडवणूक करण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या कथेला अनंत मानेच न्याय देवू शकतील असा विश्वास शांताराम बापूंना होता. त्यांनी तात्काळ अनंत मानेंना बोलावून घेतलं.. 

आपल्या गुरूजींनी बोलावून घेतल्याने अनंत माने खूषीत होते. भेट झाली.

शांताराम बापूंनी अनंत मानेंना सांगितलं, माझ्याकडे कथा आहे. मुळच्या ब्लू एंजल आणि नोरा प्रेण्टिस या दोन इंग्लिश सिनेमावर आधारलेली ही कथा. यात प्रेमभंगामुळे माणसाचे काय हाल होतात ते दाखवलं आहे. असाच सिनेमा आपल्याला करायचा आहे. म्हणजे सिनेमा तू करणार. कथा, कलाकार, तंत्रज्ञ सगळं तू ठरवं. नायिका फक्त संध्या राहिल एवढी अट बापूंनी घातली.. 

आपल्या गुरूंनी इतक्या वर्षानंतर आपणावर जबाबदारी टाकल्याने अनंत माने खुषीत होते. 

शांताराम बापूंनी दिलेल्या आयड्यावर त्यांनी काम सुरू केलं. एक ड्राफ्ट तयार करुन ती कथा बापूंना ऐकवली. लागलीच कथा पसंत पडली. पुढे शंकर पाटील, शांतारामबापू आणि अनंत माने यांनी सिनेमाचे संवाद-पटकथा यांवर चर्चेतून मार्ग काढला. हाताशी एक खमकी स्टोरी आल्याच्या आनंदात हे तिघेही होते.

दिग्दर्शकांची जबाबदारी अनंत माने यांच्यावर टाकण्यात आली. पण आपल्या गुरूच्या उपस्थितीत ही जबाबदारी पेलण्यास त्यांनी नकार दिला. शांताराम बापूंनी दिग्दर्शक व्हावं आणि मी सहाय्यक दिग्दर्शक होईल अस त्यांनी सांगितलं. आत्तापर्यन्त एकाहून एक सुपरहिट सिनेमे देणारे अनंत माने चक्क या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक झाले. 

शिक्षकाच्या भूमिकेसाठी काचेचा चंद्र आणि नटसम्राट नाटकातून प्रसिद्ध होणाऱ्या श्रीराम लागू या नवख्या अभिनेत्याची निवड करण्यात आली. पण त्यांनी १५ हजार रुपये मानधन मागितलं. सिनेमाची कथा दाखवल्यानंतर मात्र ते मिळेल त्या रक्कमेत सिनेमा करण्यास तयार झाले. तर अनंत माने यांचाच शोध असणाऱ्या निळू फुलेंची दूसऱ्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. 

दूसरीकडे जगदीश खेबुडकरांची गीतकार तर राम कदम यांची संगीतकार म्हणून निवड करण्यात आली. 

कोल्हापूरातील शांताकिरण स्टुडियोत भल्या पहाटेपासून शुटिंग सुरू कऱण्यात आले. खेबुडकरांच सांगायचं तर खेबुडकरांनी सिनेमासाठी एकूण ११० गाणी लिहली होती. त्यातील प्रत्येक गाण्याला सहा ते सात चाली लावण्याचं काम राम कदम यांनी केलं होतं. यातून ६-७ गाणी निवडण्यात आली होती. यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत पहिलाच रंगीत सिनेमा इये मराठीचिये नगरी आला होता. पण तो आपटला होता. खऱ्या अर्थाने रंगीत चित्रपटसृष्टीचं दार उघडणारा सिनेमा म्हणजे पिंजराच ठरणार होता. 

सिनेमा रिलीज झाला आणि त्या काळात रौप्यमहोत्सव साजरा झाला. अगदी लाखात कमाई झाली. अस सांगितलं जात की त्या काळात सिनेमाने ३४ लाखांची कमाई केली होती. हा तोच काळ होता जेव्हा सिनेमाचं तिकीट आठआणे-रुपाया असायचं. अशा काळात ३४ लाख कमावले होते.. 

सिनेमाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला जेव्हा शांताराम बापू उभा राहिले तेव्हा ते म्हणाले,

हे यश माझं नाही तर अनंत माने यांच आहे.. 

जागतिक किर्तीच्या आपल्या गुरूकडून मिळालेली ही अनंत मानेंसाठी खरी गुरूदक्षिणा होती. तर शिष्य गुरूसाठी काय करुन दाखवू शकतो हा देखील तोच क्षण होता.   

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Rekha gaikwad says

    Very good think.our storyline

Leave A Reply

Your email address will not be published.