भाजपने आपल्याच मंत्र्याला जीवे मारण्याचा कट रचलाय का …?
अनंत कुमार हेगडे आठवताहेत का…? नसतील आठवत तर काळजी करू नका, आठवण करून द्यायला आम्ही आहोतच. तर हे अनंत कुमार हेगडे म्हणजे तेच ग्रहस्थ ज्यांनी काही दिवसांपूर्वी ब्राम्हण परिषदेतील आपल्या भाषणात “आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहोत” असं वादग्रस्त विधान केलं होतं. उत्तर कन्नडमधून ५ वेळचे खासदार असणाऱ्या अनंत कुमार हेगडे यांच्या अंगीचे हेच कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्यावर केंद्र सरकारमधील कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली असावी. तर या हेगडेंनी आता आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय. आम्ही नाही सांगतोय हा हेगडेंचा आरोप आहे. आधी त्यांचं हे ट्वीट बघून घ्या-
आता मूळ किस्सा असा की, मंगळवारी म्हणजेच १७ एप्रिल रोजी रात्री कर्नाटकातील रेनेबेरू तालुक्यातील हालगेरीजवळ हेगडे यांच्या लवाजम्यातील गाडीचा अॅक्सिडेंट झाला. एका ट्रकने हेगडे यांच्या संरक्षक ताफ्यातील गाडीला धडक दिली. ज्या गाडीला धडक बसली त्या गाडीतील मंत्रीमहोदयांच्या सपोर्ट स्टाफमधील व्यक्तीच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. हेगडे यांच्या ताफ्याला धडक देणाऱ्या ट्रकचा फोटो सुद्धा त्यांनी ट्विटरवर टाकला. ‘नासेर’ नावाच्या ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो नॉर्मल स्थितीत होता. त्याने मद्यसेवन केलं असल्याचं कुठलंही लक्षण नव्हतं, ही माहिती हेगडे यांनीच ट्वीटच्या माध्यमातून दिली. भाजपच्या अनेक आमदार आणि खासदारांनी देखील या घटनेचा निषेध करताना आपण हेगडेंच्या पाठीशी असल्याचं सांगणारे ट्वीट केले.
मंत्रीमहोदयांचं असं म्हणणं की, हा अपघात नसून घातपाताचा प्रकार होता. आपल्यालाच जीवे मारण्यासाठीचा प्रयत्न होता. ‘नासेर’ हे ट्रक ड्रायव्हरचं नाव तसंच तो प्यायलेला नसून नॉर्मल स्थितीत होता, हे ट्वीटच्या माध्यमातून सांगून मंत्रीमहोदयांनी त्या दृष्टीने व्यवस्थित प्लॉट रचला होताच. पण या ‘तथाकथित’ जीवे मारण्याच्या षडययंत्राबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.
आता थेट केंद्रीय मंत्र्याला जीवे मारण्याचा कट म्हंटल्यानंतर संपूर्ण यंत्रणा जोरात कामाला लागली. मंत्र्यांनी गाडीचा फोटो टाकलेला होता ज्यावर गाडीचा नंबर देखील होता आणि ट्रक ड्रायव्हर देखील पोलिसांच्या ताब्यात होता. त्यामुळे अगदी सहजच पोलिसांना गाडीच्या मालकाची इत्यंभूत माहिती मिळाली. ट्रकच्या मालकाचं नांव होतं ‘नागेश’ जो की चिकमंगळूर जिल्ह्यातील कोप्पा येथील रहिवाशी आहे. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण चौकशीतून मिळालेल्या पुढच्या माहितीतून ट्रकचा मालक नागेश हा कोप्पा तालुक्यातील भाजपच्या ब्लॉकचा अध्यक्ष असणाऱ्या रमेशचा भाऊ असल्याचं उघड झालं. साहजिकच ही माहिती समोर आल्यानंतर मंत्रीमहोदयांच्या तथाकथित जीवे मारण्याच्या षडयंत्रातील हवाच निघून गेली. शिवाय त्यांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद कुठलंही कारण न देता रद्द करण्यात आली.