दो बिघा जमीन गाजवणाऱ्या बलराजना खेड्यातील व्यक्तीचा रोल येणार नाही असं कारण देऊन नाकारलं होतं…

बलराज सहानी उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत अभिनेते होते. अभिनय करण्यापूर्वी ते काही काळ बीबीसी वर कार्यरत होते. अतिशय अभ्यासू असे ते कलावंत  होते. भारतात आल्यानंतर ते ‘इप्टा’ या संस्थेसोबत काम करत होते. विमल रॉय यांच्या गाजलेल्या ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटातील शंभू महातोचा रोल त्यांना कसा मिळाला? ही फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 

१९५१ साली ज्यावेळी बिमल रॉय आपल्या ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटाची तयारी करत होते.

 त्यावेळी विमल रॉय एका सहायकाने बलराज सहानी यांचे प्रमुख भूमिकेसाठी नाव सुचवले. बिमल रॉय यांनी बलराज सहानी यांना भेटायला बोलावले. बिमलदांनी आपल्याला भेटायला बोलावले आहे याचा त्यांना खूप आनंद झाला आणि लंडनमध्ये शिवलेला भारी सूट घालून ते बिमलदांच्या भेटायला मोहन स्टुडिओ मध्ये पोहोचले. 

त्यांना असे सुटाबुटात पाहिल्यानंतर बिमलदा एकदम चक्रावून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी देखील दिसली. ते त्यांच्या सहाय्यकाकडे वळून म्हणाले,” माझी काय चेष्टा करताय का? कोणत्या माणसाला तुम्ही माझ्यासमोर उभे केले?” नंतर बिमलदा बलराज सहानी यांना म्हणाले ,”माफ करा सहानी साहेब. आमच्या माणसाकडून चूक झाली. ज्या भूमिके करता मी तुम्हाला बोलवले होते ती भूमिका तुम्ही करू शकणार नाही. माफ करा.”

बलराज यांना हा मोठा अपमान वाटला पण तरीही त्यांनी विचारले,” भूमिका काय आहे?” त्यावर चिडून बिमलदा म्हणाले,” मी तुम्हाला सांगितले ना ती भूमिका तुम्हाला अजिबात सूट होणार नाही! एका अशिक्षित, दरिद्री आणि खेडूत व्यक्तीची भूमिका आहे!” त्यावर बलराज म्हणाले ”अशी भूमिका मी यापूर्वी देखील केली आहे!” 

आता आश्चर्यचकित होण्याची पाळी बिमलदा यांची  होती. ते म्हणाले,” कोणत्या सिनेमात?” त्यावर बलराज म्हणाले, “ के ए अब्बास यांच्या ‘धरती के लाल’ या चित्रपटात!” चित्रपटाचे नाव ऐकून बिमलदा आश्चर्य चकीत झाले.त्यांनी विचारले ,” 

 या चित्रपटात तुमची कुठली भूमिका होती?” त्यावर बलराज  म्हणाले, “निरंजनची! या सिनेमाचे शंभू मित्र सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यांनीच  माझी निवड केली होती.” शंभू मित्राचे नाव ऐकल्यानंतर बिमलदा  यांना मोठे कौतुक वाटले. त्यांनी बलराज साहेबांना बसायची विनंती केली कारण शंभू मित्र हे त्या काळात फार मोठे नाव होते. या नावाची जादू बिमलदांना ठाऊक होती. 

शंभू मित्र कुणा ऐऱ्या गैऱ्याला आपल्या सिनेमात घेणार नाही याची त्यांना जाणीव होती!

त्यांनी आपले सहाय्यक ऋषिकेश मुखर्जी यांना तिथे बोलावलं आणि बलराज सहानी  यांची स्क्रीन टेस्ट यांना फाटके धोतर, मळका सदरा आणि डोक्याला मुंडासे अशा अवतारात स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर रात्री बिमल रॉय यांनी ‘धरती के लाल’ हा चित्रपट मुद्दाम मागवून बघितला. त्यातील बलराज  यांचा अभिनय पाहिला. दुसऱ्या दिवशी त्यांना बोलावून त्यांनी सन्मानाने शंभू महातोचा रोल त्यांना ऑफर केला! 

१६ जानेवारी १९५३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दो बिघा जमीन’ या सिनेमाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात मनाचे स्थान पटकावले. cult classic म्हणून हा सिनेमा जगभर आजही अभ्यासला जातो. या सिनेमाला कांस फिल्म फेस्टिवल आणि कार्लोवी वेरी फिल्म फेस्टिवल मध्ये पारितोषिक मिळाले.

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.