म्हणून राजस्थानात आजही ५६ नंबरला अशुभ मानलं जात

“छपनिया काल रे छपनिया काल,

फेर मत आइयो म्हारी मारवाड़ में।

आइयो जमाइड़ो धड़कियाँ जीव,

काँ ते लाऊँ शक्कर, भात, घीव, जमाइड़ो?

फेर मत आइयो म्हारी मारवाड़ में।

 

मारवाडात  गायिलेलं हे लोकगीत राजस्थानातल्या भीषण अवस्थेचा पुरावा आहे. ज्याला ‘छापनिया अकाल’ असं म्हंटल जात.  ज्याची धास्ती अजूनही लोकांमध्ये आहे. आता  छापनिया अकाल म्हणजे काय तर १९५६ मध्ये  पडलेला दुष्काळ. जो राजस्थानातली जुनी लोक क्वचितच विसरू शकतील. 

दुष्काळ म्हंटल कि, अन्न, पाणी आणि चाऱ्याची  कमतरता. या सगळ्याचा परिणाम म्हणजे उपासमार आणि  साथीचे रोग, ज्यामुळं माणसाबरोबर जनावरांच्याही जीवाला धोका. देशात १८९९ ला असाच भयंकर दुष्काळ पडला होता.  ज्यात सगळ्यात जास्त फटका बसला होता तो राजस्थानला. राजस्थानमधल्या जयपुर, जोधपुर आणि बीकानेरच्या भागात मोठा दुष्काळ पडला होता.

हा दुष्काळ विक्रम संवत १९५६ मध्ये पडला होत, ज्यामुळे राजस्थानातले लोक त्याला आपल्या भाषेत  ‘छप्पनिया अकाल’ म्हणतात. इंग्रजांच्या गजेटेरियर मध्येही ‘द ग्रेट इंडियन फॅमिन १८९९’ नावाने हा दुष्काळ नोंदवला गेलाय.

१२२ वर्षांपूर्वी राजस्थानच्या बर्‍याच भागात पावसाचा एक थेंबही पडला नव्हता. राजस्थानात पावसाअभावी, पावसाळ्याच्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या  शेतकऱ्यांना पिकही पेरता आली नाहीत. या काळात ना धान्य तयार झालं ना जनावरांना चारा मिळाला. ज्या भागात पिण्यासाठी पावसाच्या पाण्याची साठवण अवलंबून असते अशा भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता भासू लागल्यानं लोकांनी पलायन करायला सुरुवात केली.

लोक आपल्या पोरांना विकायला मजबूर झाली 

यावेळी जिवंत राहण्यासाठी धान्य ही सर्वात मौल्यवान वस्तू बनली होती. मटक्यात लपून ठवलेलं धान्य चोरी व्हायला सुरुवात झाली. खायला काहीतरी मिळावं या  बदल्यात लोक आपल्या पोरांनासुद्धा विकायला लागली.   दुष्काळानं  प्रत्येक भागात, प्रत्येक  स्तरावर तांडव करायला सुरुवात केली.  घराघरात बारकी पोर, म्हातारी माणसं एवढं काय तर तरणीताठी लोक सुद्धा भूखेनं तडफडत होती.  कित्येक दिवस खायला मिळालं नसल्यानं प्रत्येकजण एकदम कमकुवत बनवलं होत. 

प्यायला पाणी नसल्यानं डिहायड्रेशनमुळं लोकांचा जीव जायला लागला. मरूस्थलच्या ५०-५२ डिग्री सेल्सियसच्या तापमानात उपासमारीने पलायन करणाऱ्या लोक आणि प्राण्यांचा रस्त्यातचं जीव जायला लागला. लोकांना गवत, साप आणि मूंगूस खायला भाग पडलं. लोक अक्षरश झाडाची कोरडी साल वाटून खायला मजबूर झाले. या उपासमारीने तर काहींना नरभक्षक सुद्धा बनवलं.

या संकटात सर्वसामान्यच काय तर राजपूत वाडेही होरपळून निघाले. मेवाडचे राजे महाराजे सुद्धा या दुष्काळात झगडताना दिसले. 

यानंतर मेवाडच्या राजांनी दुष्काळात दिलासा मिळावा यासाठी  अनेक कामे केली, ज्यामध्ये मोफत अन्नाची व्यवस्था करणं सर्वात महत्वाचं होत. राजांनी आपल्या प्रजेसाठी ठिकठिकाणी आश्रयस्थान उघडले जेणेकरून भुकेलेल्यांना तिथं  खाऊन आपला जीव वाचवता येईल, पण त्याकाळी  वाहतुकीची मर्यादित साधनं आणि संचार माध्यमाचा  अभाव असल्यामुळे लोकांपर्यंत संपूर्ण मदत पोहोचू शकली नाही.

यात लोकांसाठी मोफत जेवणाच्या  सोयीमूळ अनेक राजांची तिजोरी खाली झाली आणि ते कर्जात  बुडाले. राजाच्या आदेशावरून अनेक शेठमंडळींनी सुद्धा आपल्या धान्याचे भांडार उघडले. पण भयंकर दुष्काळापुढं ते सुद्धा खाली झाले.

या दुष्काळात उपासमारीने वर्षभरातच लाखो लोकांचा जीव घेतला होता.

१८९९ मध्येच लॉर्ड कर्जन यांची भारतात व्हॉईसरॉय पदावर नियुक्ती झाली. या दरम्यान ब्रिटन सरकारच्या अंतर्गत यणाऱ्या प्रदेशांत दुष्काळाने झोडपलेल्या  लोकांसाठी मदत शिबीर खोलली गेली. पण त्यात जवळपास २५ % लोकांनाच मर्यादित मदत मिळाली. ‘छप्पनिया दुष्काळ’ हा भारतासाठी मोठा नरसंहार असल्याचं  सिद्ध झालं.

४०- ४५ लाख लोकांचा उपासमारीने जीव गेला होता. 

या दुष्काळामुळं ब्रिटिश भारतातल्याच म्हणजे ब्रिटिश शासित प्रदेशातलीच १० लाख लोक उपासमारी आणि त्याच्याशी संबंधित आजारामुळं मेली होती.  इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हा एकदा ४०-४५ लाखांजवळचा होता. हा दुष्काळ विक्रम संवत १९५६ मध्ये पडल्याने आजही राजस्थानातल्या बऱ्याच भागात ५६ आकडा अशुभ मानला जातो.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.