४ वेळा आमदार राहिलेल्याची बायको अखेरपर्यंत पत्र्याच्या खोलीतच राहिली…
हल्ली आमदार, खासदार, मंत्र्यांच्या बायकांचा थाट बघितला तर एखाद्याला महाराणीला लाजवेल असा असतो. म्हणजे दिमतीला सगळं कसं हजर असतं. खाण्यापिण्याची, सोन्यानाण्याची, कपड्यालत्त्याची कशाकशाची कमतरता नसते यांना.
पण कोल्हापुरात एक असं व्यक्तिमत्व होत, ज्यांची आपल्या मूल्यांप्रती तत्त्वनिष्ठा पाहिली तर कोणाचंही मन सहज हेलावून जाईल. या होत्या माई उर्फ हेमलता कारखानीस.
कोल्हापूरचे चारवेळेचे आमदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्र्यं. सी. उर्फ त्र्यंबक सीताराम कारखानीस यांच्या पत्नी.
आमदार पत्नी मी, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू ? नवरा आमदार आणि एस.टी. स्टॅंडवर बोरगावकडे जाणाऱ्या एस.टी.ची वाट मी कशी बघत थांबू ? नवरा आमदार मग आमदार निवासात न राहता मी म्हाडा कॉलनीत सिमेंट पत्र्याच्या छताखालच्या तीन खोल्यांच्या घरात कशी राहू?
हे प्रश्नच कधी मनाला शिवू न दिलेल्या या माई
हेमलता कारखानीस या दिवंगत आमदार त्र्यंबक सीताराम कारखानीस यांच्या पत्नी. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून १९५७ ला शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि नंतर सलग तीन वेळा कोल्हापूर शहर मतदारसंघातून आमदार राहिले.
सलग चार वेळा निवडून आलेले आमदार कर्तृत्ववान असतीलच असे नाही. पण कोल्हापूरचे हे आमदार कारखानीस म्हणजे विधानसभेचे वाघ होते. ते विधानसभेत बोलायला उठले तर आय. सी. एस. अधिकारी गांगरून जायचे. कारखानीसांनी एखाद्या प्रश्नात लक्ष घालायचे ठरवले तर ते मुळापासून त्यात घुसायचे आणि सरकारकडून ठोस उत्तर किंवा ठोस आश्वासन घेऊनच भाषण थांबवायचे.
दूध का दूध पाणी का पाणी करणाऱ्या या आमदाराची बायको पण अशीच कणखर स्वभावाची होती. बाईसाहेब, माईसाहेब, वैनीसाहेब, स्टार्चची साडी, दिमतीला ड्रायव्हर, नोकर, कार्यकर्ते असंल आयुष्यच जगल्या नाहीत माई.
या बाईने आमदाराची बायको म्हणून नव्हे तर कारखानीस या एका ध्येयवादी माणसाची बायको म्हणून जीवन व्यतीत केले. १९५७ ला हे जोडपे कपिलतीर्थाजवळ निंबाळकरांच्या वाड्यातील एका खोलीत राहत होते. १९५७ नंतर ते पंचगंगा तालमीजवळ परीट गल्लीत राहायला गेले. त्यानंतर तीन वेळा कोल्हापूरचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले.
आमदार म्हणून मिळालेले मानधन नेहमीच गरजूंना मदत म्हणून वाटल गेलं. त्यामुळे घरात नेहमीचीच चणचण. पण हेमलता कधी कुरबुरल्या नाहीत. आपला नवरा जेवढा एकनिष्ठ आहे तेवढं आपल्यालाही राहता आलं पाहिजे म्हणून जशी परिस्थिती आहे तसंच जगायचं ठरवलं त्यांनी.
म्हणजे घरात चांगलंचुंगलं खायला कधीच नाही. रेशन यायचं ते रेशनींगच्याच दुकानातून. वेळप्रसंगी त्या रेशनच्या रांगेत उभे राहायच्या. गहू आला काय? साखर आली काय? म्हणून दुकानदाराला विचारायला जायच्या. त्यावेळी दुकानदार त्यांच्यावर डाफरायचा.
त्या दुकानदाराला माहीतच नव्हतं, की आपण जिच्यावर डाफरतोय ती कधीकाळी विधानसभा गाजवलेल्या आमदाराची बायको आहे. जी आपल्यावर ओढवलेल्या वेळेमुळे दुकानाच्या दारात गिऱ्हाईक म्हणून हातात पिशवी आणि रेशन कार्ड घेऊन उभी आहे.
कारखानीसांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे स्वतःचे घरच नव्हते.
१९९२ मध्ये म्हाडा कॉलनीत घर मिळावे म्हणून हेमलतांनी अर्ज केला. अर्ज मिळविण्यासाठी पहाटे तीन वाजता त्यांनी आपल्या मुलाला रांगेत उभे केले. त्या आपल्या मुलासमवेत म्हाडा कॉलनीतल्या (हॉकी स्टेडियमसमोर) अगदी साध्या घरात राहत होत्या. त्यांच्या नव्या पिढीतल्या शेजाऱ्यांनाही माहीत नव्हतं, की या बाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता.
पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही. कोल्हापूर शहर अलीकडे राजकीयदृष्टय़ा खूपच संवेदनशील झाले आहे. लहानमोठय़ा घटनांचे राजकीय पडसाद जनजीवनावर उमटत असतात आणि शहरभर फलकबाजी सुरू होते. पण या व्रतस्थ बाईचा मृत्यू झाल्यानंतर डिजिटल राहू द्या ओ पण साध्या कोल्हापूरकरांना समजलं ही नाही.
पत्र्याच्या छप्पर असलेल्या तीन खोल्यांच्या म्हाडाच्या घरात राहणाऱ्या आणि आमदारकीच मानधनदेखील गरजूंना वाटून टाकणाऱ्या त्र्यंबकरावांचा संसार करताना त्यांनी दाखविलेली निष्ठा अजोड आणि दुर्मीळ अशीच आहे. प्रसिद्धीपासून आयुष्यभर दूर राहिलेल्या माई अखेरच्या श्वासापर्यंत त्या व्रताला जागल्याच.
हे ही वाच भिडू
- भारताला शूटिंगमध्ये पहिल्यांदा एशियन गोल्ड मेडल कोल्हापूरच्या लेकीने मिळवून दिलंय
- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा पाया आपल्या कोल्हापूरातून रचला गेला
- म्हणून कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे