अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत होता पण माफी ऐवजी थेट व्हॉईसरॉयला ठार केलं !

आजही भारतात काळ्या पाण्याची शिक्षा म्हटल की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात अंदमानमधल्या जेलमध्ये ब्रिटीशांनी केलेल्या अत्याचाराच्या कथाच ऐकलेल्या असतात. कोलुच्या बैलाप्रमाणे तेलाच्या घाण्याला जुंपण्यासारखी मध्ययुगीन शिक्षा ही अंदमानमध्येच शेवट असावी.

ब्रिटीश सैन्यामध्ये असलेल्या भारतीयांनी केलेल्या १८५७ च्या उठावानंतर व्हिक्टोरिया राणीने भारतातील कंपनी सरकार रद्द करून आपला थेट अंमल सुरु केला. कंपनी सरकारच्या काळात झालेल्या चुका टाळण्याकडे तिचा भर होता. भारतीयांसाठी अनेक सुधारणा सुद्धा दिल्या गेल्या होत्या.

पण ज्यांनी उठाव केला त्यांना माफी नव्हती. इंग्लंडमध्ये राणीच्या आदेशांनुसार त्यांना कडक शिक्षा देण्यात येत होती. यासाठी निवड करण्यात आली होती अंदमान जेलची.

भारताच्या मुख्यभूमी आणि अंदमान याच्या मध्ये अथांग पसरलेला बंगालचा उपसागर होता. जहाजातून तिकडे गेलेला कैदी परत येण्याची शक्यता खूपच कमी असायची. म्हणूनच या जेल ला काळ्यापाण्याची शिक्षा म्हटल जायचं.

अशीच काळ्यापाण्याची शिक्षा भोगत होता शेर अली आफ्रिदी.

तो होता मुळचा पेशावरचा पठाण. त्याकाळच्या पंजाब पोलीस मध्ये त्याने काम केलेले. पठाणांची इंग्लिश सैन्यात भरती होत होती तेव्हा तो सुद्धा त्यात जॉईन झाला. एवढचा काय १८५७च्या उठावात इंग्रजांच्या बाजूने लढला देखील. तिथे शेर अलीने केलेल्या पराक्रमामुळे त्याचा सिनियर असलेल्या मेजर जनरल रेनील टेलरने एक घोडा, एक रिव्हॉल्व्हर आणि सर्टिफिकेट दिलेलं.

त्याकाळच्या सर्वसामान्य भारतीया प्रमाणे शेर अलीला सुद्धा वाटत होते की आता राणीचे सरकार आले, भारताची प्रगती होणार.

देशात रेल्वे सुरु होत होती. रस्ते बनत होते, आधुनिक कारखाने आले होते. आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळा सुरु होत होत्या आणि विशेष म्हणजे तिथे प्रवेश सगळ्या जातीच्या मुलांना होता. न्यायालये सुरु झाली होती.

इंग्रज सरकार हे कायद्याने चालते आणि ते आपल्या भल्यासाठी काम करत आहे असा समज शेर अलीसारख्या अनेकांना होता. शेर अलीने मेजर टेलर या गोऱ्या अधिकाऱ्याच्या चरणी आपली निष्ठा वाहिली होती. त्याचासुद्धा या पठाणावर आपली लहान मुलं सांभाळायला देण्या एवढा विश्वास होता.

पण शेर अलीच्या वैयक्तिक आयुष्यात काही घटना अशा घडल्या की त्याच आयुष्य बदलून गेल.

साल होत १८६७. पेशावरमध्ये दिवसा ढवळ्या एका हैदर नावाच्या पठणाचा खून झाला. अनेक वर्षाच्या कौटुंबिक भांडणातून हा खून झाला होता. खर तर टोळीयुद्ध पठाणांसाठी नवीन नव्हतं. पण यावेळी शेर अली आफ्रिदीच नाव यात समोर आलं.

शेर अलीच म्हणण होतं की,

मी हा खून केला नाही. आमच्या घरची भांडणे होती पण मी खून करायला माझा त्या व्यक्तीशी थेट संबंध नव्हता.

शेर अलीची केस कोर्टात उभी राहिली. त्याला वाटत राहिलं की आपण ब्रिटीश सैन्यात काम करतो, आपण प्रामाणिक आहे आपल्यावर अन्याय होणार नाही. पण तस झालं नाही. कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. शेर अलीच्या पायाखालची जमीनच सरकली.

बऱ्याच दादफिर्यादीनंतर त्याची शिक्षा कमी करून आजीवन सश्रम कारावासाएवढी कमी करण्यात आली. पण शेर अलीचा ब्रिटीश कायदे व्यवस्थेवरून विश्वास उडाला होता तो उडालाच.

काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी आफ्रिदीची रवानगी अंदमानच्या पोर्ट ब्लेअर जेलमध्ये करण्यात आली. जवळपास पाच वर्षे तिथली महाभयंकर शिक्षा भोगली. रोज होणारी मारहाण, बैलाप्रमाणे राबवणूक या मुळे शेर अलीची बदल्याची आग टोकाला पोचली होती. आपल्या देशात हे बाहेरचे लोक येऊन आपल्यालाच जनावराची वागणूक देत आहेत ही सल त्याला झोपू देत नव्हती.

तो हे कधीच तोंडावरून दाखवून द्यायचा नाही पण तो शांत पणे वेळेची वाट बघत होता.

काही वर्षांनी त्याची चांगली वर्तवणूक बघून त्याचे श्रम कमी करण्यात आले. त्याला जेलमध्ये न्हाव्याच काम मिळाल. त्यातून अगदी थोडे का असेनात त्याच्या नावावर पैसे पडू लागले. असच चालू राहिलं तर काही वर्षांनी त्याने अर्ज केला तर त्याची वागणूक बघून त्याची सुटका देखील होईल असे बाकीचे कैदी म्हणायचे.

फेब्रुवारी १८७२ मध्ये भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड मेयो अंदमान भेटीवर आला होता.

गव्हर्नर जनरल उर्फ व्हाईसरॉय हा भारताचा ब्रिटीश काळात प्रमुख असायचा. म्हणजे आजच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानाला जेवढे अधिकार आहेत त्याहून ही जास्त अधिकार व्हाईसरॉयला असायचे. लॉर्ड मेयो हा अतिशय तरुण असताना या पदावर आला होता.

मेयोच्या काळात अनेक सुधारणा सुरु झाल्या होत्या. भारताची पहिली जनगणना त्यानेच करवून आणली. रेल्वेच जाळ पसरवल. मेयो कॉलेजची स्थापना केली. काही जलसिंचनाच्या योजना सुरु केल्या. याचा अर्थ तो आपला हितचिंतक होता असे नाही तर

भारतातून जास्तीत जास्त कर, लुट, उद्योगासाठीचा कच्चा माल गोळा करून आपल्या मायदेशी कसा पाठवता येईल याचेच त्याचे प्रयत्न सुरु होते.

असा हा व्हाईसरॉय लॉर्ड मेयो भारत दौऱ्यावर होता. त्यात अंदमानमधील जेल व तिथल्या कैद्यांची परिस्थिती पाहण्यासाठी पोर्ट ब्लेअरची भेट सुद्धा आखण्यात आली. या भेटीत त्याने पोर्ट ब्लेअरचा कानाकोपरा फिरून काढला. नव्याने शहर बांधणीसाठी प्लॅन आखला.

अशाच एका संध्याकाळी लॉर्ड मेयो कुठल्यातरी पर्वतरांगेचे निरीक्षण करून परत आला. त्याची बोट धक्क्याला लागली.

सुरक्षिततेसाठी सोबत १२ बॉडीगार्ड होते. व्हाईसरॉयच्या स्वागतासाठी त्याची बायको तिथे उभी होती. लॉर्ड मेयो बोटीतून उतरला आणि काही पावले टाकली असतील नसतील तेवढ्यात अंधारातून काही तरी चमकल्यासारखे झाले.

विजेच्या वेगाने एक आकृती बाहेर आली आणि मेयोच्या पोटात चाकू खुपसली. घाव वर्मी लागला. भारताचा व्हाईसरॉय त्याच्या कडक सिक्युरिटीमध्ये असताना काही क्षणात यमसदनी धाडला गेला होता.  आणि हे केलं होतं शेर अली आफ्रिदीने.

या कृत्यानंतर पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न न करता तो तिथेच थांबून राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं.

अटकेनंतर जेलच्या फोटोग्राफ्ररनां त्याने हसत हसत पोज दिली. ब्रिटीश सरकार हादरून गेले. इंग्लंडच्या गादीवर बसलेली व्हिक्टोरिया राणीदेखील चिडली होती. यामागे कोण कोण आहे याचा शोध घेण्याचे आदेश सुटले.

अंदमान मधल्या जेलमध्ये असलेले त्याचे सहकारी सांगत होते की,

“शेर अली अफरीदी कहता था कि अंग्रेज देश से तभी भागेंगे जब उनके सबसे बड़े अधिकारी को मारा जाएगा और वायसराय ही सबसे बड़ा अधिकारी था। “

त्याने या घटनेच्या आदल्याच दिवशी आपल्या न्हाव्याच्या कामातून जो काही भत्ता जमा केलेला त्यातून मिठाई खरेदी करून अख्ख्या जेलमध्ये वाटलेली. शेर अली एकटाच होता आणि त्याने एकट्यानेच हे क्रांतीकार्य पार पाडले.

एका महिन्यात त्याला फाशी झाली. काही वर्षांनी अशी घटना घडू नये म्हणून अंदमानात अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था असलेला नवा सेल्युलर जेल बांधण्यास सुरवात झाली.

भारतात अनेक क्रांतिकारी होऊन गेले. प्रत्येकाचे उद्दिष्ट होते की आपल्या देशावर अन्याय करणाऱ्या ब्रिटीशांचा सर्वोच्च प्रतिनिधी असणाऱ्या व्हाईसरॉयला ठार करून इंग्लंडला हादरवून सोडायचे. पण कोणाला हे शक्य झाले नाही फक्त शेर अली आफ्रिदीला सोडून.

आपल्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी थेट व्हाईसरॉयला ठार मारनाऱ्या आणि त्यानंतर हसत हसत फाशीवर जाणाऱ्या पराक्रमी शेर अली आफ्रिदीच नाव इतिहासाच्या पानात कधी आढळत नाही किंवा अंदमान मध्ये त्याचे कोणतेही स्मारक नाही हे आपल्या देशाच दुर्दैव म्हटल पाहिजे.

हे ही वाच भिडू.

 

 

7 Comments
 1. बाळासाहेब says

  आत्ता महाराष्ट्रात आफ्रिदी चे स्मारक उभारण्यास हरकत नाही , कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सरकार आहे.

 2. हेमंत परब says

  फेब्रुवारी १९७२ नसून १८७२ असावी

 3. Sachin says

  Khupach Chan mahiti… pratyek Post vaclyshivay mi pudhe jauch shakt Nahi.really you are doing a great job…

 4. निलेश says

  साल महत्वाचे आहेत. त्यामुळे पोस्ट करताना article एकदा स्वतः वाचत जावा.

 5. Bipin Ukhaji Thorat says

  Really Great Information ???????? Vaise bhi Hamare is generation ko sach kam aur Zhoot jyada sunaya Jata hai. Shame shame! May be Muslim hai isliye to jyada popular nhi kiya Ali Afridi ko !! No matter i am proud of ” Ali Afridi” ????????????????????????

 6. Shaikh Raju Ahamad says

  Very nice information

 7. Roshan says

  Kutalya pustaka madhe vachal bhau tumhi he te pan sangitlat tar khup bar vatel .. aani tumacha lekha madhun swatantraveer savarkar yanna yacha virodhat bolalya sarakh vatatay.. sudhara ajun hi vel geleli nahi aahe

Leave A Reply

Your email address will not be published.