अंदमान बेटावरील सेंटीनेली आदिवासी त्सुनामीच्या प्रलयामध्येही सुरक्षित कसे वाचले?

नुकताच सातपाटील कुलवृत्तांत या पुस्तकाच्या निमित्ताने जेष्ठ लेखक रंगनाथ पठारे आपल्या बोल भिडूच्या भेटीला आले होते. त्यांनी उपस्थितांच्या भाषाविषयक प्रश्नाला उत्तर देताना बोलता बोलता सेंटीनेली आदिवासी त्सुनामीच्या दुर्घटनेतही कसे काय सुखरूप वाचले या विषयी एक गंमत सांगितली.

ती तुम्हाला व्यवस्थित विस्कटून सांगतो.

पूर, महापूर, ,चक्रीवादळ, भूकंप ही नैसर्गिक संकटे आहेत. यात काही प्रमाणात मानवी हस्तक्षेप सुद्धा असतो पण सायन्स अजून एवढ डेव्हलप झालेलं नाही की या आपत्तीनां रोखता येईल. इतकच काय त्यांचा धोका कितपत असू शकतो याची पुर्वसूचना देण्याची यंत्रणा देखील म्हणावी तेव्हढया सक्षमतेमुळे उभी राहू शकलेली नाही. अनेक संशोधकांचे यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. पण दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आपत्तीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो.

गेल्या काही वर्षातील सर्वात भयंकर नैसर्गिक आपत्ती म्हणजे  २००४ साली हिंदी महासागरात आलेली त्सुनामी.

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुमात्रा बेटांमध्ये जवळपास ९ ते ९.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. एवढ्या महाप्रचंड भुकंपामुळे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर या समुद्रांमध्ये त्सुनामी आली. बघता बघता १०० फुट एवढ्या उंचीच्या लाटा निर्माण होऊन त्या किनार्याना धडकू लागल्या. त्सुनामी आली होती.

जवळपास चौदा देशांना या लाटांचा फटका बसला. दोन अडीच लाख लोकांचा मृत्यू झाला. जखमी किती झाले याची तुलनाच नाही. अनेक गावे वाहून गेली, कित्येक बेटे लुप्त झाली. चेन्नईच्या सुप्रसिध्द मरीना बेटावर खेळणारी अख्खीच्या अख्खी व्हॉलीबॉलची टीम वाहून गेली.

त्सुनामी येणार याची पुर्वसूचना देणारे केंद्र हिंदी महासागरात उपलब्ध नसल्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी वेळ मिळाला नाही. ज्यांना पुर्वसूचना मिळाली होती त्यांना तीव्रता न कळाल्यामुळे त्यांनी त्याला सिरीयस घेतले नाही.

त्सुनामीमुळे झालेल्या नुकसानातून परत उभे राहण्यासाठी जगभरातून मदत आली. या दुर्घटनेत हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठीच कित्येक दिवस गेले. परत गावे, लोकांची संसारे उभी रहात होती, तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात आले की अंदमानच्या सेन्टनली बेटावरच्या आदिवासींच काय झालंय.

सेंटनली जमातीबद्दल तुम्हाला ठाऊकचं असेल. अंदमान निकोबार बेटसमूहाच्या नॉर्थ सेंटीनल बेटावर या प्रजातीतील लोक आढळतात.

भारत सरकारने ही प्रजाती संरक्षित म्हणून घोषित केलेली असून नॉर्थ सेंटीनल बेट देखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. या लोकांचा बाह्य जगाशी कसलाही संबंध नाही. ते अजूनही अश्मयुगीन काळाप्रमाणे जगतात. मानवी उत्क्रांतीची कोणतीही चिन्हे त्यांच्यापर्यंत आली नाहीत. कधी आधुनिक जगातील कोणी व्यक्ती त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केली तरी शत्रू समजून सेंटीनली त्यांना मारून टाकतात.

२००४च्या त्सुनामीमुळे अंदमानला सुद्धा जोरदार फटका बसलेला होता. या बेटावरील जवळपास २००० लोक मृत्यूमुखी पडले होते. पाच हजार लोक गायब झाले होते. प्रचंड नुकसान झाले होते. सेंटीनली बेटावर सुद्धा यापेक्षा वेगळी परिस्थिती असणार नाही याची खात्री होती. तरी पाहणी करावी म्हणून भारतीय कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले.

हे हेलिकॉप्टर जेव्हा  सेंटीनेली बेटाच्या वरून उडत होते तेव्हा त्याच्या अनिल थाप्लीयाल या वैमानिकाला दिसत होते की सबंध भागाला त्सुनामीने जोरदार तडाखा दिलेला आहे. याबेटावर एकही सजीव प्राणी जिवंत असण्याची शक्यता नाही असा विचार त्याच्या मनात चमकला.

एव्हड्यात एक बाण सुंसु करत त्याच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने आला. कोस्टगार्डच्या पायलटला धक्का बसला. निरखून पाहिल्यावर त्याला दिसले एक उंच तगडा सेंटीनेल आदिवासी हातात धनुष्यबाण घेऊन हेलिकॉप्टरचा पाठलाग करत आहे. हेलिकॉप्टरमधल्या इतरांनी त्याचे फोटो काढले आणि हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरच्या दिशेने परत गेले.

परत गेल्यावर त्यांनी जगाला बातमी दिली, महाभयंकर त्सुनामीच्या तडाख्यातही सेंटीनलीचे आदिवासी सुखरूप आहेत.

हे एक प्रकारचे आश्चर्य होते. न भुतोनभविष्यती अशा या प्रलयात कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानापासून अलिप्त असणारे हे आदिवासी वाचलेच कसे या वरून प्रचंड संशोधन करण्यात आलं तेव्हा एक वेगळीच माहिती समोर आली.

असं म्हणतात की अनेक प्राण्यांना नैसर्गिक संकटे येण्यापूर्वी त्याची पुर्वकल्पना येते. गावाकडेही आपण पाहिलं आहे की भुकंपापूर्वी कुत्रे वगैरे जनावरे ओरडू लागतात. त्यांना अशा या प्रलयाबद्दल वास आधीचं लागतो आणि ते सुरक्षित जागी आसरा घेतात. नेमक तसच सेंटीनली आदिवासींच्या बाबतीतही झाले होते.

आशिष रॉय या पर्यावरणतज्ञाने सांगितले की,

“त्यांच्या जवळ वाऱ्याचा वास ओळखण्याची क्षमता आहे. समुद्राची खोली त्याच्या आवाजावरून ओळखतात. त्यांचे सिक्स्थ सेन्स काम करत जे त्यांना अशा दुर्घटनेपासून वाचवते.”

याचाच अर्थ हजारो वर्षे आधी कित्येक पिढ्यांच्या पूर्वी मानवाकडेही प्राण्याप्रमाणे नैसर्गिक संकटे ओळखण्याची क्षमता होती. पण कालांतराने आपण जेवढे तंत्रज्ञानाने समृद्ध झालो, तेव्हढे निसर्गापासून दूर झालो. निसर्गाची भाषा आपल्या शरीराची भाषा देखील आपल्या विस्मृतीत गेली. तंत्रज्ञानावर विसंबून राहिल्यामुळे हा फटका आपल्याला बसला आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.