ना पॉन्टिंग, ना कोहली… खरा मवाली क्रिकेटर होता अँड्र्यू फ्लिंटॉफ
रिकी पॉन्टिंगचं नाव ऐकलं की, आपल्याला सगळ्यात आधी राग येतो. फक्त पॉन्टिंगच नाही, तर त्याची सगळी ऑस्ट्रेलियन टीमच आगाऊ होती. पॉन्टिंग लक्षात राहिला कारण तो म्होरक्या होत्या. कायम तोंडात असलेलं चिंगम (च्युईंगम लिहिण्यात फील येत नाय), चांगले शब्द कमी आणि शिव्या जास्त, प्लेअर आऊट झालाय का नाही हे स्वतःच अंपायरला सांगणं, असले सगळे किडे करण्यात पॉन्टिंग बादशहा होता. क्रिकेट हा ‘जंटलमन्स गेम’ आहे, असं त्याला कुणी सांगितलं असतं, तर तो खडूस सासूसारखा हसला असता.
पॉन्टिंग इतका आगाऊ प्लेअर भारतात होणंच शक्य नाही, असं लय लोकांना वाटत होतं. मग आला विराट कोहली. एकतर कोहलीमध्ये दिल्लीपण ठासून भरलंय. इंग्लंडचे प्लेअर्स काढत नसतील, तितकी बेन स्टोक्सची आठवण आपला कोहली काढतो. चुकून कुणी भारताच्या खेळाडूंना स्लेज केलं, तर कोहली त्यांना सुट्टी देत नाही. या सगळ्यामुळं त्याची इमेज बनली.. मवाली.
पण खरं सांगायचं, तर ना पॉन्टिंग, ना कोहली… खरा मवाली क्रिकेटर होता अँड्र्यू फ्लिंटॉफ.
सहा फूट, तीन इंच उंची, कपटी डोळे, डोक्यात कायम राग आणि निम्मं आयुष्य कोल्हापूरच्या तालमीत काढल्यासारखी तब्येत, हे असलं धूड बॉलिंग, बॅटिंग किंवा फिल्डिंग कशासाठीही उभं राहिलं की डोक्यातच जायचं. फ्लिंटॉफ भारी क्रिकेटर नव्हता का? तर शेठ लय भारी होता. पण स्वभाव रागीट, स्लेजिंग करण्यात पीएचडी आणि थोबाडावर कायम मग्रुरी असा त्याचा अवतार.
ऑलराऊंडर असल्यानं त्याची दोन्ही डिपार्टमेंटमध्ये दहशत होती. त्याच्या बॉलिंगवर बॅटर चुकून हुकलाच, तर फ्लिंटॉफ त्याला डिवचल्या शिवाय राहायचा नाही. बरं बॅटर जरा क्रीझबाहेर आला की, हा बॉल फेकून मारणार. लागला बिगला तर पर्वा नाय. बॅटिंग करायला आला की, समोर स्पिनर असो किंवा फास्टर येड लागल्यागत हाणायचा. फिल्डिंगला थांबल्यावर तोंडाचा पट्टा सुरू झाला की, थांबायचं नाव नाही.
भारताविरुद्ध मॅच असेल, तर फ्लिंटॉफ क्रीझवर असेपर्यंत जिंकण्याचा विचारही डोक्यात यायचा नाही. चुकून लवकर कधी आऊट झालाच तरी बॉलरला खुन्नस देणं सोडायचा नाही.
पण भारतीयांना त्याचा सगळ्यात जास्त राग कधी आला असेल, तर वानखेडेवर. लास्ट ओव्हरमध्ये त्यानं कुंबळेला रनआऊट केलं आणि जवागल श्रीनाथला बोल्ड. इंग्लंडनं सिरीज जिंकली आणि त्याचा आनंद फ्लिंटॉफने टीशर्ट काढून साजरा केला. आता आपल्या वानखेडेवर इंग्लंडचा प्लेअर माज दाखवतो म्हणजे काय?
दादानं त्यांच्या लॉर्ड्सवर भारत जिंकल्यावर टीशर्ट काढला आणि फ्लिंटॉफचा माज मोडला.
आता युवराजचा किस्सा तसा तुम्हाला माहितीच आहे. फ्लिंटॉफनं युवराजला डिवचलं आणि स्टुअर्ट ब्रॉडला सहा सिक्सचा प्रसाद मिळाला. फटके ब्रॉडला पडले असले, तरी काड्या फ्लिंटॉफनंच केल्या होत्या.
हा किस्सा तर लय डेंजर आहे, २००५ मध्ये ॲशेस जिंकल्यानंतर इंग्लंडची टीम प्राईम मिनिस्टरला भेटायला गेली. भेट-बिट झाली, सगळे कार्यकर्ते निघाले आणि फ्लिंटॉफ भाऊ पंतप्रधानाच्या खुर्चीत हातात बिअर आणि टेबलवर पाय अशा पद्धतीनं बसला होता. वॉचमन त्याला उठवायला आला, तर भाऊ वॉचमनला म्हणाले, ‘मी हिरो आहे, इथून उठणार नाही… चल निघ.’
फ्लिंटॉफला इतका माज होता, त्याचं कारण म्हणजे त्याचा खेळ लई भारी होता. टीम कितीही संकटात असली, तरी फ्लिंटॉफ मॅच काढून देणार म्हणजे देणार. लांब छकडे मारण्याची ताकद त्याच्याकडे होतीच, पण गेम कसा फिरवायचा यात पण फ्लिंटॉफ बाप होता.
एखाद्या बॅटरचा वीक पॉईंट बाउन्सर असला, की फ्लिंटॉफ त्याच्या डोक्यावर एकदा तरी बॉल मारणार. कॅलिसला त्यानं टाकलेली ओव्हर आजही जगातल्या भारी ओव्हर्सपैकी एक मानली जाते. ॲशेस सारख्या प्रेशर असलेल्या सिरीजमध्येही त्याच्या बॅटिंगवर कणभरही फरक पडायचा नाही. मैदानातले आणि मैदानाबाहेरचे वाद सोडले, तर फ्लिंटॉफसारखा ऑलराऊंडर जगात शोधून सापडणार नाही.
क्रिकेटमधून रिटायरमेन्ट घेतल्यावर तो बॉक्सिंगमध्ये उतरला, एफवन रेसिंगही केली. दारू पिऊन राडेही केले. कुणाला शिकवायच्या फंदात तो पडला नाही. कसं वागायचं नाही हे ठरवायचं असेल, तर मैदानाबाहेरचा फ्लिंटॉफ आठवा आणि कसं खेळायचं हे ठरवायचं असेल, तर मैदानावरचा फ्लिंटॉफ बघा, इतकं साधं गणित.
इंग्लंडसारख्या टीममध्ये आपलं स्थान टिकवून ठेवणं आणि जगभरातल्या कुठल्याही टीमला डायरेक्ट नडणं फ्लिंटॉफनं लय वर्ष केलं. त्याच्या मवालीपणामागं रन्स आणि विकेट्सचे आकडे आहेत, आणि कधीच विसरता येणार नाही असा चेहऱ्यावरचा माजही.
हे ही वाच भिडू:
- सचिन आउट झाला म्हणून कैफच्या घरच्यांनी टीव्ही बंद केली पण पुढे इतिहास घडला.
- ऑस्ट्रेलिया पॅटर्नचा खरा बकासुर एकच, मॅथ्यू हेडन
- गांगुली वैतागून म्हणाला होता, सेहवागला कितीही समजावलं तरी तो स्वतःच्याच धुंदीत खेळायचा
English Summary: is an English television and radio presenter and former international cricketer. Flintoff played all forms of the game and was one of the sport’s leading all rounders, a fast bowler, middle order batsman and slip fielder. He was consistently rated by the ICC as being among the top international all-rounders in both ODI and Test cricket.
Web title: Andrew Flintoff: most controversial cricketer of England team