त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली अन ‘संसदेने’ जिवंतपणीच श्रद्धांजली वाहण्याचा पराक्रम केला…

व्हाट्सअप, फेसबूकवर एक बातमी पसरू लागली,

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन.

आता त्यांचं खरंच निधन झालं आहे का याची शहानिशा न करता लोकांनी मेसेज फॉरवर्ड करायला सुरुवात केली, फेसबुक वीरांनी पोस्ट लिहिल्या. अगदी मोठमोठे नेते, अभिनेते देखील यात फसले आणि त्यांनी श्रद्धांजली वाहून टाकली.

पण विक्रम गोखले हे ज्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ऍडमिट आहेत. रुग्णालयाने स्पष्टीकरण दिल आणि सांगितलं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ४८ तासानंतर त्यांना व्हेंटिलेटर वरून काढणार आहेत. 

आता अफवा पसरवणारे आणि अंधपणे मेसेज फॉरवर्ड करणारे तोंडावर पडले आहेत. असाच एक घोळ इतिहासात झाला होता आणि त्यात चक्क तत्कालीन पंतप्रधानांच्या सह संपूर्ण संसद फसली होती.

२३ मार्च १९७९ .

दुपारचे १ वाजून १० मिनिटं झाली होती. आकाशवाणीवरचं नियमितपणे सुरु असलेलं प्रसारण एका महत्वाच्या उद्घोषणेसाठी थांबवण्यात आलं होतं. घोषणा होती जेष्ठ समाजवादी नेते आणि स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांच्या निधनाची.

आकाशवाणीवरच्या उद्घोषणेनंतर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष के.एस. हेगडे यांना ही बातमी दिली.

पंतप्रधानांकडून मिळालेल्या बातमीनंतर लोकसभा अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाला या घटनेची कल्पना दिली. सभागृहाने २ मिनिटे मौन बाळगून देशाच्या या महान सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण केली आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आलं.

जेपींच्या निधनाच्या बातमीने देश शोकसागरात बुडाला होता. जेपींचे चाहते, आपल्या फोटोग्राफरसह वृत्तपत्रांचे पत्रकार आणि अनेक नेते मुंबईतील जसलोक हॉस्पीटलमध्ये जमा होऊ लागले होते. सगळ्यांनाच आपल्या या ‘लोकनायक’ नेत्याचं अंत्यदर्शन घ्यायचं होतं, पत्रकारांना ही मोठी न्यूज कव्हर करायची होती.

जसलोक हॉस्पिटलसमोर लोकांची वाढणारी गर्दी पाहून त्यावेळी हॉस्पिटलमध्येच असलेले जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बाहेर आले होते. चंद्राशेखर जी काही घोषणा करणार होते त्यामुळे जमलेल्या लोकांना अजून एक धक्का बसणार होता. चंद्रशेखर यांनी जसलोक हॉस्पीटलच्या लाऊडस्पीकरवरून माहिती दिली की,

“जेपींची तब्येत अत्यावस्थ असली तरी जेपी अजून जिवंत आहेत.”

चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार जनता पार्टीच्या सरकारने आणि पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठी ‘घोडचूक’ केली होती.

जयप्रकाश नारायण या भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्वास जिवंत असतानाच पंतप्रधानांनी आणि संसदेच्या सभागृहाने श्रद्धांजली वाहिली होती. केवळ भारताच्याच नव्हे, तर जगाच्या राजकारणात पहिल्यांदाच एखाद्या जिवंत व्यक्तीला देशाच्या संसदेने श्रद्धांजली वाहून झाली होती.

नेमकी चूक कुठे झाली होती…?

जेपींच्या निधनाच्या पूर्वीच त्यांना श्रद्धांजली वाहण्याची ही घोडचूक सरकारच्या हातून घडण्यामागे सरकारचे नाक आणि कान समजली जाणाऱ्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’कडून मिळालेली चुकीची माहिती जबाबदार होती.

‘इंटेलिजन्स ब्युरो’चे संचालक एस.एन.माथुर यांना मुंबईतील ऑफिसमधून जेपींच्या निधनाच्या बातमीचा सिग्नल मिळाला होता आणि त्यानंतर त्यांनीच पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना फोन करून ही बातमी कळवली होती.

असं असलं तरी ही घटना म्हणजे जनता सरकारच्या असंवेदनशिलतेचा कळसच होता.

संसदेतून जेपींना श्रद्धांजली वाहण्यापूर्वी एकदा जेपी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यापासून त्यांच्यासोबत असणाऱ्या जनता पार्टीच्या अध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर यांच्याकडून या बातमीची खातरजमा करून घेतली गेली असती, तरी सरकारची ही नाचक्की टाळता येणं शक्य झालं असतं.

पंतप्रधान मोरारजी देसाई आणि जेपी. 

खरं तर जेपींचं एकूणच प्रकरण पंतप्रधान मोरारजी देसाईंनी अतिशय कोडगेपणाने आणि असंवेदनशीलतेने हाताळलं होतं. मोरारजी देसाईंना जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेपासून स्वतःला धोका आहे असं सारखं वाटायचं. मुळात मोरारजी सत्तेत आले होते, तेच जेपीमुळे. तरीही मोरारजी त्यांच्याशी फटकून असायचे.

मोरारजींच्या मनात जेपीविषयी काय होतं याचा अंदाज मोरारजींनी जेपीविषयी बोलताना दिलेल्या २ विधानांवरून लावता येतो. एकदा मोरारजी म्हणाले होते की,

“जेपींचा प्रोब्लेम असाय की त्यांना  ‘महात्मा’ व्हायचंय!”

जेपीच्या मृत्यूसंदर्भातील हा दुर्दैवी किस्सा घडून गेल्यानंतर त्याच वर्षीच्या ८ ऑक्टोंबर रोजी जेपींचं निधन झालं. जेपींच्या शेवटच्या दिवसात जवळपास सर्वच प्रमुख नेते जेपींना भेटून गेले होते. एवढंच काय तर आपले सर्व राजकीय मतभेद विसरून इंदिरा गांधी देखील बेलछीहून परत येताना जेपींची भेट घेऊन गेल्या होत्या.

जेष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलं होतं की आपण जेपींना पाटण्याला जाऊन जेपींना भेटून येण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी मोरारजी म्हणाले होते,

“मी कधी गांधींनाही भेटायला गेलो नव्हतो, हे जेपी आहेत कोण..?

जनता पार्टीच्या सरकारने जिवंत असतानाच जेपींना श्रद्धांजली वाहून त्यांना मारून टाकलं होतं, पण ही काही पहिली वेळ नव्हती जेव्हा जनता सरकारने जेपींना मारलं होतं. जेपींची शिडी बनवून सत्तेवर आलेल्या जनता सरकारने त्या प्रत्येकवेळी जेपींना आणि त्यांच्या आदर्शांना मारलं होतं, त्यावेळी वैयक्तिक स्वार्थासाठी जनता पार्टीमधील नेत्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांना पायदळी तुडवत ‘जनता सरकार’चा प्रयोग फासण्याचा पाया खोदला होता.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.