राष्ट्रपतींनी मीना कुमारीला विचारलं होतं, “तुझा बॉयफ्रेंड कसा आहे ..?”

बॉलीवूडमध्ये ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारी यांचं वैयक्तिक आयुष्य देखील अतिशय दुखात गेलं. नकोशी म्हणून जन्माला आलेल्या या मुलीला तिचे  वडील, अली बक्श हे जन्मतःच अनाथाश्रमालयाच्या  पायऱ्यांवर ठेऊन आले होते. पण आई इकबाल बेगम यांनी आपली नाराजी दर्शविल्याने ते मीना कुमारीला परत घरी घेऊन आले.

घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट. त्यामुळे बालपणापासूनच मीना कुमारीने  चित्रपटांमध्ये बालकलाकरांच्या भूमिका करायला सुरुवात केली. त्यातून घर खर्चासाठी पैसे मिळत असत. विजय भट्टचा ‘लेदर फेस’ हा मीना कुमारी यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. मोठी बहिण आधीच चित्रपटसृष्टीत होती.

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती ‘बच्चो का खेल’मधून मुख्य नायिकेच्या भूमिकेत आली. त्यानंतर ‘दायरा’ चित्रपटाच्या वेळी मीना कुमारी कमाल अमरोही यांच्या प्रेमात पडली. मीना कुमारीची कमाल अमरोही सोबतची जवळीक अर्थातच तिच्या वडिलांना पसंत पडली नाही. शेवटी वडिलांच्या विरोधात तिने गुपितपणे कमाल अमरोही बरोबर लग्न केलं. कमाल अमरोहीचं आधीच लग्न झालेलं असतानाही.

लग्न तर झालं पण तिची दुखातून सुटका झाली नाही. कमाल अमरोहीने तिच्यावर अनेक बंधनं लादली. चित्रपटसृष्टीतील तिची लोकप्रियता जसजशी वाढू लागली तसतसे त्यांचे दोघांचे संबंध बिघडायला लागले. संबंध इतके विकोपाला गेले की शेवटी मीना कुमारीने कमाल अमरोहीचं घर सोडलं.

दरम्यानच्या काळात ती धर्मेंद्रच्या संपर्कात आली. मीना कुमारी त्यावेळी स्टार होती आणि धर्मेंद्र आपल्या करीअरच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षात होता. मात्र मीना कुमारीच्या सानिध्यात आलेल्या धर्मेंद्रला तिच्या शिफारसीमुळे अनेक चित्रपट मिळाले. धर्मेंद्रच्या करिअरची गाडी रुळावर यायला लागली.

धर्मेंद्र आणि मीना कुमारी या दोघांमधील जवळीक देखील वाढायला लागली. त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील व्हायला लागल्या. या चर्चा फक्त मर्यादित वर्तुळातील गॉसिपिंगच्या पातळीवरच राहिल्या नाहीत. दिल्लीतील एका कार्यक्रमात तर खुद्द तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीच मीना कुमारीला विचारलं होतं,

“तुझा बॉयफ्रेंड कसा आहे..?”

असं सांगितलं जातं की राष्ट्रपती राधाकृष्णन यांचा हा प्रश्न धर्मेंद्रविषयी होता.

मीना कुमारीच्या धर्मेंद्रसोबतच्या अफेअरच्या बातम्या कमाल अमरोही पर्यंत गेल्यानंतरच त्यांनी धर्मेंद्रला ‘पाकिजा’मधून काढून टाकत राज कुमारला नायकाच्या भूमिकेत घेतलं होतं.  पण धर्मेंद्रसोबत देखील तिचे संबंध फार काळ टिकले नाहीत. धर्मेंद्रच्या जाण्यानंतर मात्र दुखात बुडालेल्या मीना कुमारीने दारूचा आसरा घेतला. जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळी ती दारू प्यायची.

अजूनपर्यंत ‘पाकिजा’ आला नव्हता. कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या बिघडलेल्या संबंधामुळे ‘पाकिजा’ खूप वर्षांपासून रेंगाळला होता. पण सुनील आणि नर्गिस दत्त यांनी ‘पाकिजा’ शूट झालेलं फुटेज बघितलं आणि त्यांनी मीना कुमारीला चित्रपट पूर्ण करण्यासाठी तयार केलं.

१९५६ साली शुटींगला सुरुवात झालेला ‘पाकिजा’ फेब्रुवारी १९७२ मध्ये रिलीज झाला आणि सुपरडुपर हिट झाला. या चित्रपटाने कमाल अमरोहीला बॉलीवूडच्या इतिहासात अजरामर करून ठेवलं पण पुढच्या काहीच महिन्यांमध्ये म्हणजेच ३१ ऑगस्ट १९७२ रोजी मीना कुमारीचं ब्लड कॅन्सरने निधन झालं.

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. योगेश गांधी says

    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन असे विचारतात हे शक्यच नाही. विद्वान शिक्षक आहेत शिवाय सिनेमे पाहिले असण्याची शक्यता शून्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.