रात्रीच्या अंधारात ऐकू येणारी, हाकामारी. खरच असतय का तसलं काही ?

काही दिवसांपुर्वी चित्रपटगृहात स्त्री नावाचा सिनेमा आलेला. हॉरर प्लस कॉमेडी असणाऱ्या सिनेमाची लाईन होती हाकामारी. आत्ता हाकामारी म्हणजे काय तर रात्रीच्या अंधारात अचानक तुमच्या नावाने हाक ऐकू येते. कधी मोकळ्या रस्त्यांवर तर कधी घराच्या दारावर.

90 च्या दशकात बंगळुरू व आसपासच्या परिसरात हि अफवा तुफानावर होती. या चेटकिणीच्या प्रभावामुळे अनेक लोक गायब झाल्याची अफवा देखील त्याकाळी पसरवण्यात आली होती.

चेटकीणीच्या भीतीने घाबरलेले लोक या चेटकिणीपासून आपलं आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचं रक्षण करण्यासाठी “नाले बा” हे वाक्य घरावर लिहीत असत ज्यामुळे ती चेटकीण त्या परिवाराला व घरातील सदस्यांना कुठल्याच प्रकारची इजा करत नसे.

याच अफवेने खान्देश व मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये बऱ्यापैकी भीतीदायक वातावरण तयार झालं होतं. ही अशी अफवा होती जिच्यामुळे अनेकदा रात्री लोक घराबाहेर पाऊल टाकायला घाबरत असत. गावपाडे रात्री १० वाजेपर्यंत सामसूम होत असत. फक्त रात्रभर कुत्र्यांचा व वटवाघुळांचा आवाज आणि अंगावर शहारे आणणारी भीती असायची. 

दोन ते तीन वर्ष लोकांच्या मनावर हाकामारीच्या अफवेने गारुड घालून ठेवलं होतं.

अगदी नावाप्रमाणेच ‘हाकामारी’ रात्री बेरात्री लोकांच्या घरासमोर येऊन उभी राहायची आणि घरातील प्रमुख व्यक्तीचं नाव घेऊन त्याला एका स्त्रीच्या आवाजात हाक मारायची. जर त्या पुरुषाने हाकामारीच्या अफवेला “ओ” दिली तर मात्र त्या व्यक्तीची खैर नसायची.

असं म्हणतात की ‘हाकामारी’ त्या व्यक्तीला उचलुन स्मशानभूमीत न्यायची आणि मग दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती संदिग्ध  अवस्थेत एखाद्या झाडावर उलटी लटकलेली आढळून यायची. एक तर त्या व्यक्तीची बोबडी वळलेली असायची नाहीतर ती व्यक्ती मनोरुग्णाप्रमाणे व्यवहार करू लागायची.

हाकामारीच्या भुताने अबालवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये भीतीची निर्मिती केली होती. या हाकामारीच्या अफवेमुळे बुवा-बाबा,तांत्रिक-मांत्रिक लोकांचं फार फावलं होतं. त्यांचासाठी ‘हाकामारी’ एक बिझनेस मॉडेल बनलं होतं. लोकांना गंडे-दोरे विकण्यापासून ते लोकांच्या घरात वास्तुशांतीपर्यंत या सगळ्या गोष्टी हे बाबा लोक करून द्यायचे आणि त्यातून बक्कळ पैसा कमवायचे.

बऱ्याचवेळा चर्चेदरम्यान लोक म्हणायचे की हाकामारीची अफवा देखील या बाबा लोकांचीच उत्पत्ती आहे. कदाचित ते खरं देखील असेल. कारण बऱ्याच अफवांचे जनक हे बाबा लोकच असतात. याच  लोकांमुळे अशा अफवांना हवा मिळते आणि लोकांमध्ये भीती निर्माण होऊन यांच्या धंद्याला चांगले दिवस येतात.

हाकामारीच्या अफवेबाबत एक आजून मजेशीर बाब आहे. 

अनेक लोकांच्या मते, भारतीय प्रशासनानेच मुद्दामहून गावोगावी हाकामारीची अफवा  पसरवली होती. त्याचं कारण काय तर साधारणतः १५-२०  वर्षांपूर्वी लोकांच्या घरात शौचालय नव्हते. जनजागृती मोहिमा राबवून सुद्धा लोक घरात शौचालय बांधत नव्हते. अश्यावेळी या हाकामारीच्या अफवेमुळे भीतीपोटी लोक रात्री बेरात्री रानात शौचाला जायला घाबरत असत. त्यामुळे अनेक लोकांनी घरातच शौचालय बनवून घेतले होते.

असं असलं तरी या बाबीत फारसं तथ्य वाटत नाही. शिवाय प्रशासनाने देखील यावर प्रतिक्रिया द्यायचं टाळलं होतं.

बऱ्याच वर्षांपूर्वीची ही हाकामारीची कथा. आज काळ पालटला आहे. अशाप्रकारच्या अफवांवर आज कुणी फारसा विश्वास ठेवणार नाही. पण तरी देखील एखाद्या रात्री जेव्हा भुता-खेतांच्या गप्पा निघतात त्यावेळी ही हाकामारीची कथा ऐकून काळजाचा ठोका चुकल्यावाचून राहत नाही.

नचिकेत शिरुडे.  

Leave A Reply

Your email address will not be published.