मोदींप्रमाणेच बेनझीर भुट्टो आणि बच्चनला देखील ‘करण थापर’ यांनी घाम फोडला होता.
इंग्रजी माध्यमातील आघाडीचे आक्रमक आणि निर्भीड पत्रकार म्हणून करण थापर यांचं नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहितीच असेलच. करण थापर आपल्याकडे सर्वाधिक चर्चिले गेले ते २००७ सालच्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या त्यांनी घेतलेल्या ३ मिनिटांच्या मुलाखतीसाठी.
या मुलाखतीमध्ये थापर यांनी नरेंद्र मोदींना गुजरात दंगलीसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर नरेंद्र मोदींची बोबडीच वळली होती. पिण्यासाठी पाणी मागून, ‘दोस्ती बनीरहे’ असं सांगत मोदी फक्त ३ मिनिटातच ही मुलाखत अर्ध्यावर सोडून निघून गेले होते.
या प्रसंगापासून करण थापर यांच्याबरोबर निर्माण झालेलं वैर नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत विसरलेले नाहीत. त्या प्रसंगानंतर मोदींनी कधीच करण थापर यांना मुलाखत दिली नाही.आता तर देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झालेल्या मोदींनी भाजपच्या कुठल्याही नेत्याला थापर यांच्याशी न बोलण्याची तंबीच दिलीये.
करण थापर यांचा किस्सा छेडण्याचं प्रयोजन असं की काही दिवसांपूर्वीच त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालंय. ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट- द अनटोल्ड स्टोरी’.
‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ हा त्यांचाच ‘सीएनएन-आयबीएन’साठीचा मुलाखतींचा कार्यक्रम. या पुस्तकात त्यांनी अनेक किस्से लिहिलेत. मोदींनी भाजपच्या नेत्यांना आपल्याशी न बोलण्याच्या सूचना दिल्याविषयी देखील त्यांनी याच पुस्तकात लिहिलंय.
बेनझीर भुत्तो म्हणाल्या होत्या, “लग्नापूर्वीच्या ‘सेक्स’मध्ये चुकीचं काहीच नाही”
करण थापर यांच्या कॉलेज जीवनातला हा किस्सा.
१९७७ साली थापर केंब्रिजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे त्याच वेळी ऑक्सफर्डच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदावर पुढे चालून पाकिस्तानच्या पंतप्रधान बनलेल्या बेनझीर भुत्तो यांची वर्णी लागली होती.
एका दिवशी जेव्हा थापर आणि भुत्तो यांची भेट झाली तेव्हा भुत्तो यांनी एक चर्चेचा प्रस्ताव ठेवला. लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधाविषयी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठीचा हा प्रस्ताव होता. भूत्तोनी ज्यावेळी थापर यांच्यासमोर हाप्रस्ताव ठेवला, त्यावेळी थापर यांनी भुत्तोंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
थापर यांनी भुत्तोंना थेटच प्रश्न केला,
“मॅडम, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात या प्रस्तावावर अंमलबजावणी करण्याची हिंमत तुमच्यात आहे का..?”
थापर यांच्या या प्रश्नावर सगळीकडेच हशा पिकला. भुत्तोंनी मेहफिल शांत होऊ दिली आणि आता पलटवार करण्याची वेळ त्यांची होती. प्रचंड हजरजबाबी असलेल्या भुत्तोंच्या उत्तरानंतर जमलेल्या मंडळीमध्ये पहिल्यापेक्षा मोठा हास्यकल्लोळ माजला. भुत्तोंचं प्रत्युत्तर होतं,
“हो. नक्कीच, पण तुमच्यासोबत नाही”
लग्नानंतर अमिताभ बच्चन रेखाच्या प्रेमात होते..?
अमिताभ बच्चन यांची एक मुलाखत करण थापर यांनी घेतली होती. मुलाखत ऐन रंगात आलेली असताना थापर यांनी अमिताभ यांना प्रश्न विचारला,
“तुम्ही लग्नानंतर कुणाच्या प्रेमात पडलात का..?”
या अनपेक्षित प्रश्नाने गोंधळलेल्या अमिताभ यांनी नकारार्थी उत्तर दिलं.
त्यानंतर थापर यांचा पुन्हा तोच प्रश्न,
“रेखाच्या सुद्धा नाही..?”
अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन बाजूलाच बसलेल्या होत्या. सहाजिकच हा प्रश्न अमिताभ यांना आणखीनच अडचणीत टाकणारा होता.
“नाही, रेखाच्या सुद्धा नाही” अमिताभ यांचं उत्तर.
पण यावर समाधानी होतील ते करण थापर कसले..? हाच प्रश्न घेऊन त्यांनी आपला मोर्चा शेजारी बसलेल्या जया बच्चन यांच्याकडे वळवला आणि त्यांना विचारलं,
“अमिताभ जे काही सांगताहेत, त्यावर तुमचा विश्वास आहे..?”
जया बच्चन यांच्या मनात त्यावेळी काय असेल ते माहित नाही, पण त्यांनी आपला आपल्या पतीवर पूर्ण विश्वास असल्याचं थापर यांना सांगितलं. पण या प्रश्नानंतर मुलाखतीत जे काही तणावाचं वातावरण निर्माण झालं, ते अगदी मुलाखतीनंतरच्या जेवणापर्यंत कायम राहिलं. चिडलेले अमिताभ डायनिंग टेबलवर थापर यांच्याशी एक शब्द देखील बोलले नाहीत.
वाजपेयी यांच्या विरोधातील लेखामुळे थापर यांच्या आई त्यांना ‘इडियट’ म्हणाल्या होत्या..
दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देशाच्या पंतप्रधान पदावर असतानाचा एक किस्सा करण थापर लिहितात. त्यावेळी थापर यांनी वाजपेयी यांच्याविरोधात एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी वाजपेयींवर खूप टीका केली होती.
एकदा थापर वाजपेयींना भेटले. त्यावेळी त्यांनीच अटलजींना सांगितलं की संबंधित लेख वाचून त्यांच्या आईने त्यांना ‘इडीयट’ म्हंटलं होतं. थापर यांच्याकडून हा किस्सा ऐकल्यानंतर अटलजी फक्त हसले होते.
पाकिस्तानी राजदूताच्या प्रेमापोटी अडवाणींना रडू कोसळलं होतं..
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहोम्मद अली जिन्ना यांचा उल्लेख ‘सेक्युलर’ म्हणून केल्याने भारतीय राजकारणात माजलेल्या मोठ्याच गोंधळाचे आपण सगळेच साक्षीदार राहिलेलो आहोत. त्याच अडवाणींचा पाकिस्तानचे भारतातील तत्कालीन राजदूत अश्रफ जहांगीर यांच्याविषयीच्या प्रेमाचा एक किस्सा थापर लिहितात.
थापर यांच्यानुसार २००० साली ज्यावेळी जहांगीर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त म्हणून रुजू झाले त्यावेळी थापर यांनीच त्यांची भारताचे तत्कालीन उप-पंतप्रधान लालकृष्णअडवाणी यांच्याशी गुप्त भेट घडवून आणली होती. या भेटीनंतर अडवाणी आणि जहांगीर यांच्यात पुढे अनेक भेटी झाल्या.
त्यांच्यातील सततच्या भेटींमुळेच त्यावेळी भारत आणि पाक यांच्यात काही काळ संबंध सुधारले होते. भारताने मे २००१ मध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना भारत-भेटीचं निमंत्रण दिलं होतं, त्याचं बरचंस श्रेय अडवाणी-जहांगीर भेटींनाच जातं, असं अडवाणींना वाटत असल्याचं त्यांनी थापर यांना सांगितलं होतं.
वर्षभराने ज्यावेळी काश्मीरमधील हिंसेच्या प्रकरणात भारताने जहांगीर यांना पाकिस्तानात परतजायचा आदेश दिला, त्यावेळी अडवाणींच्या पत्नीने थापर यांच्या माध्यमातून जहांगीर दाम्पत्याला आपल्या घरी चहापाण्यासाठी निमंत्रित केलं होतं.
या भेटीनंतर ज्यावेळी निरोपाचा क्षण आला त्यावेळी अडवाणींना इतकं गहिवरून आलं की जहांगीर यांच्याशी झालेल्या गळाभेटीत अडवाणींना रडू कोसळलं होतं, असं देखील थापर लिहितात.
Yaach thapar sahebana Balasahebani gham fodla hota. Interview available on youtube.
Balasaheb is tiger