जर्मनीमध्ये हिटलर पेक्षा जास्त काळ सत्तेत आहेत पण त्या आजही छोट्या फ्लॅट मध्ये राहतात…

जगातल्या सगळ्यात जास्त लोकप्रिय नेत्यांपैकी एक असलेल्या अँजेला मर्केल यांनी जर्मनीच्या चॅन्सलर पदावरून पायउतार झाल्या आहेत. जर्मनीमध्ये या महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने मर्केल युगाचा समारोप झाला आहे. १६ वर्षे जर्मनीचा कारभार त्यांनी सांभाळला होता. २००५ पासून जर्मनीच्या राजकारणात सलग विजयी त्या होत राहिल्या.

एक राजकारणी म्हणून मर्केल यशस्वी तर होत्याच पण त्यांचं साधं राहणीमान हा जास्त चर्चेचा विषय होता.

अँजेला मर्केल या सुशिक्षित आणि उच्चशिक्षित राजकारणी आहेत. फिजिसिस्ट आणि क्वांटम फिजिक्समध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. लाइमलाईट पासून चार हात दूर आणि फॅशन वैगरेच्या भानगडीत न पडणाऱ्या अँजेला मर्केल या त्यांच्या साध्या राहणीमानामुळे लोकप्रिय होत्या.

युरोपातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनीला सांभाळणाऱ्या अँजेला मर्केल यांनी आपल्या कार्यकाळात कधीच आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांना मोठ्या पदावर नेमलं नाही.

देशाच्या महत्वाच्या पदावर असूनही अँजेला मर्केल यांच्याकडे इतर नेत्यांप्रमाणे अजूनही खाजगी गाडी, प्लेन नाहीए. इतकंच कायतर सरकारी बंगलासुद्धा नाही. आपल्या साध्या स्वभावामुळं जर्मनीच्या लोकांमध्ये त्यांना विशेष स्थान होतं.

अँजेला मर्केल यांच्या कपड्याच्या स्टाइलवरून आणि हेअरस्टाइलवरून त्यांना अनेकदा प्रश्न विचारण्यात यायचे. त्याबद्दलचाच एक किस्सा.

आपल्या कपड्यांची आणि केसांची स्टाईल अँजेला मर्केल यांनी कधीच बदलली नाही. यावरूनच एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता की दरवेळी जेव्हा आम्ही तुम्हाला बघतो याच ड्रेसमध्ये तुम्ही असता, एवढा एकच ड्रेस तुमच्याकडे आहे का? यावर मर्केल यांनी दिलेलं उत्तर होतं, मी लोकसेवक आहे, मॉडेल नाही.

मर्केल या स्वतःची कामे स्वतःच करतात. एका प्रेस कॉन्फरन्समध्ये अँजेला मर्केल यांना विचारण्यात आलं होतं कि घरात जेवण बनवायला, घरकाम करायला कोणी मोलकरीण आहे का? तेव्हा त्या म्हणाल्या होत्या माझ्या घरात एकही मोलकरीण नाही आणि तिची गरजही नाही. मी आणि माझे पती आम्ही दोघे मिळून घरकाम करतो. चॅन्सलर पदावर असतानाही एका साध्या अपार्टमेंटमध्ये त्या राहत होत्या.

२००५ साली जेव्हा अँजेला मर्केल चॅन्सलर पदासाठी निवडुन आल्या तरी त्यांनी आपलं घर कधी सोडलं नाही आणि इतकंच काय तर त्यांच्याकडे ना कधी विला होता, ना कधी गार्डन ना कधी स्विमिंग पूल होता. इतकं साधं राहणीमान त्यांचं पदावर असताना सुद्धा होतं.

अँजेला मर्केल या पर्यायवरणाबाबतीतही जास्त जागरूक होत्या. एका बाजूला अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस क्लायमेट डीलमधून स्वतःच्या देशाला वेगळं केलं होतं मात्र अँजेला मर्केल यांनी जगभर पर्यावर्णाबद्दल जागरूकता निर्माण केली होती. 

राजकीय वातावरणात अँजेला मर्केल यांच्या निस्वार्थ वृत्तीची चर्चा कायमच होत असायची. जेव्हा जेव्हा देश अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा मर्केल यांनी देशाला सावरलं आहे. त्यांच्या आज घडीला देशाच्या चॅन्सलर पदावरून पायउतार झाल्याने जर्मन मधील बऱ्याच लोकांना दुःख झालं आहे. त्यांच्या देशातल्या जनतेने त्यांच्या कामाप्रती सन्मान म्हणून ६ मिनिटे बाल्कनीत उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचा गौरव केला.

दीर्घकाळ चॅन्सलर पदावर असतानाही लोकांमध्ये तितकीच क्रेझ अँजेला मर्केल यांची होती. जगभर त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे काय असतं याच उदाहरण म्हणजे अँजेला मर्केल.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.